महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,21,886

शेतकरी सुखी तर राजा सुखी

By Discover Maharashtra Views: 1515 2 Min Read

शेतकरी सुखी तर राजा सुखी –

शेती.. हिंदुस्थानाचा कणा. आपली अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असल्यामुळे शेतीला पूर्वापार महत्व होते आणि आताही आहे. यादव साम्राज्य धुळीस मिळवल्यानंतर मुसलमान आक्रमकांनी महाराष्ट्रावर अनन्वित अत्याचार केले. या सर्व धामधुमीत शेतकऱ्यांवर कायम अन्याय होत होता. शत्रू सैनिक उभी पिकं कापून नेत, सैन्याची जनावरं शेतात चरायला सोडत, शेतकऱ्यांची घरंदारं लुटली जात. थोडक्यात ह्मणजे या सत्ता संघर्षात शेतकरी कायमच भरडला जात असे. शिवाजी राजांनी उभारलेल्या स्वराज्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीला लढाया पुजलेल्या होत्या. शक्यतो शत्रूच्या प्रदेशात जाऊन लढाई करायची हे धोरण जरी शिवाजी राजांनी अवलंबले होते तरी अनेक वेळेला शत्रू सैन्य स्वराज्यातील शेतकऱ्यांवर जुलूम जबरदस्ती करून शेतकऱ्यांचे बरेच नुकसान करत असे. शेती व्यवसाय असा धोक्यात आला तर स्वराज्याला काही महसूल मिळणार नाही आणि स्वराज्याची आर्थिक बाजू कमकुवत होऊन स्वराज्याची घडी मोडेल याची जाण शिवाजी राजांना होती. यामुळेच त्यांचे लक्ष रयतेच्या कल्याणकडे कायम असे. शेतकरी सुखी तर राजा सुखी हि त्यावेळची अर्थनीती होती. यानुसारच महाराजांनी स्वराज्यातील शेतकऱ्याला आर्थिक साहाय्य द्यायचे धोरण आखले होते.

इ.स.१६७६ सालच्या मामले प्रभावळीचा सुभेदार रामाजी अनंत यास लिहिलेल्या एका पत्रात शिवाजीराजे लिहितात “या कलमास जरी दोन लाख लारी पावेतो खर्च करिसील, आणि कुणबिया कुनब्याची खबर घेऊन त्याला तवानगी ये ती कीर्द करिसील, आणि पडजमीन लाऊन दस्त जाजती करून देसील तरी साहेबा कबूल असतील.”

अर्थ:- “या कलमास (पत्राच्या सुरुवातीस शेतकऱ्याला कसली कसली मदत द्यावी याबद्दल सुभेदारास सूचना आहेत) जरी दोन लाख चांदीच्या नाण्यांऐवढा खर्च करशील आणि प्रत्येक शेतकऱ्याची विचारपूस करून त्याला स्वतःच्या उमेदीवर जगे पर्यंत धीर देशील आणि पडीक जमिनी लागवडीस आणून त्यांचे कागद त्या शेतकऱ्यांना करून देशील तरीही साहेब (शिवाजी राजे) या गोष्टीला तयार असतील.”

स्वराज्यातील धामधुमीच्या काळातही शेतकऱ्यांच्या अडचणींकडे बारीक लक्ष ठेवणारा आणि शेतकऱ्यांच्या विकासाकरिता पाहिजे तेवढा खर्च करण्यास तयार असलेला असा हा जाणता राजा.

संदर्भ:- शिवचरित्र साहित्य खंड ९, लेखांक ५५.

Prasad Pathak

Leave a Comment