भारताच्या इतिहासातील शिवछत्रपतींचे नेमके स्थान…..
भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक आदर्श जन्माला आले.अनेकांनी आपल्या कर्तुत्वाने काळाच्या शिलालेखावर आपला इतिहास लिहिला.महाराष्ट्राचा विचार केला असता इथल्या प्रत्येक राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर शिवचरित्राचा प्रभाव नेहमीच राहिला आहे..महाराजांची तुलना काहि समकालीन सिकंदरशी करतात तर काही नेपोलियन बोनापार्टशी.काही जण तर महाराजांना अवतारी पुरुष मानून श्रीकृष्ण आणि श्रीरामाच्या रांगेतही महाराज मांडतात .
मग प्रश्न उरतो की भारताच्या मध्ययुगाच्या इतिहासात महाराजांचे नेमके स्थान काय ? मुसलमानी सत्ताविरुद्ध झगडणारा एक हिंदू सेनानी.कि मग परकिय सत्ताधारी वर्गाला अव्हान देणारा एक स्वकीय नायक; किंवा जदुनाथ सरकार म्हणतात तसा “राष्ट्र निर्माता”.पानसरेंनी गृहित धरलेला “साम्यवादी राजा” अथवा धर्मनिष्ठांना अभिप्रेत असलेला हिंदूधर्माभिमानी .
महाराजांचे मध्ययुगातले राजकीय स्थान कायमच अस्थिर राहिले तरीही त्यांच्या पराक्रमाची डोळस दखल केंद्रिय इस्लामी सत्ते ने घेतली.महाराजांच्या कर्तुत्वाचा उल्लेख करुन इराण च्या शहाने औरंगजेबाची “आलमगिरी” मिजास उतरवली. अगदिच बेदखल करण्यासारखे
भूभागाचे स्वामित्व,सांपत्तिक स्थिती शत्रू पक्षापेक्षाहि खालावलेली.स्वकियांनी पुकारलेले बंड,खचलेली रयतेची मानसिकता हे सत्तेचे यशस्वी निकष अनूकूल नसताना महाराजांनी स्वराज्य उभे केले.
महाराजांच्या थोरवीचा वेध घेत असताना पूर्वइतिहासाकडे नजर टाकणे जरुरीचे आहे.ग्रीकांच्या आक्रमणानंतर भारताचा सामरिक संघर्ष थेट मुस्लीम आक्रमकांशी झाला.ह्या वेळेपर्यंत भारताच्या शासक मनावर कायम,नितिमत्ता,नैतिकता ,अभयदान ह्यांचाच पगडा होता.त्या योगे मुस्लिम आक्रमकांनी छळ,कपट,क्रौर्य ह्याद्वारे तत्कालीन जनतेचे नितीधैर्यच खचवले.भारतीय लढवय्ये आणि पराक्रमाबद्दल कधीच कमी नव्हते .पण ह्या नितीच्या अतिरेकामुळे परकिय मुस्लिमांनी युद्धात हारुन अभयदाने घ्यावेत पुन्हा संघर्ष करावा हेच प्रकार दिसतात.
ह्या मुस्लिम शासकां विरोधात आपला इतिहास पराभवाचा आहे .हिंदू राज्यकर्त्याने युद्ध करावे मुस्लिम आक्रमकाने ते साम दाम दंड भेद वापरुन जिंकावे.पण शिवछत्रपतींच्या इतिहासाने नेमकी भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली.महाराजांनी शत्रूला दगा जरुर दिला पण मित्राला अडचणीत कधीच आणले नाही.शत्रूपक्षात स्वताचा चाहतावर्ग निर्माण करणारा हा ऐकमेवाद्विततीय राजा.आदिलशाहितील रुस्तमेजमा,कुतुबशाहीतील आकण्णा -मादण्णा,आग्रा अटकेत महाराजांची बाजू वजीर आसदखान मांडतो.मराठ्यांच्यावर चालून आलेला जयसिंह आदिलशाहिवर आक्रमण करतो. हे महाराजांच्या मुत्सद्देगिरीचं यश आहे.
मध्ययुगामध्ये सरसकट शत्रूपक्षाच्या कत्तली करणारे जसे राज्यकर्ते आहेत तसेच आपल्या अहंकारापोटी स्वसैन्याचा अट्टहासाने नाश करणारे सुद्धा आहेत.प्रत्येक युद्ध प्रसंगात महाराज मनुष्य हानी टाळताना दिसतात.शिक्षा झालेला रांझ्याच्या पाटलाची व्यवस्था हि महाराज लावतात.गुलामगिरी आणि माणसाची। खरेदी विक्री बंद व्हावी म्हणून कठोर कायदे करतात.जगाच्या पाठीवर मनुष्याच्या मूलभूत हक्कांची चर्चा होण्या अगोदर महाराज हे निर्णय घेत आहेत.
कोणत्याही आदर्श नायकाच्या निकषात स्त्रीदाक्षिण्य येतेच.आपण अकबराचा महान म्हणून उल्लेख करतो तेव्हा मीना बाजाराचे वास्तव विसरतो .अशोकाची “तिष्यरक्षिता ” हि त्याच्या हौसेचा भाग होती.औरंगजेब जेव्हा कठोर शासक म्हणून सामोरा येतो तेव्हा त्याच्या वासनेची साक्ष त्याचा जनानखाना देतो .महाराजांचं स्त्री दाक्षिण्याचं कौतुक खाफीखान सारखा मुगलांचा पगारी इतिहासकार करतो.”कल्याणच्या सुभेदाराची सून “हे प्रकरण पुरावा हिन जरी धरले तर हि दंतकथाच राजाच्या मनोभूमिका निर्मळ होती ह्याची ग्वाही देईल.महाराजांच्या बद्दलच्या अफवा सुद्धा नैतिकतेच्या आहेत हे सुद्धा माझ्या राजाचे मोठेपण आहे.
काही राष्ट्रात समाज सुसंस्कृत घडावा म्हणून काल्पनिक आदर्श उभे केले जातात .पण आमच्या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक स्वातंत्र्य सेनानी आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात.कवी प्रदीप त्यांच्या “झाकी हिंदुस्तान कि ” ह्या आजरामर कव्यात महाराजांसाठी समर्पक शब्दयोजना करतात.
देखो मुल्क मराठों का ये
यहाँ शिवाजी डोला था
मुगलों की ताकत को जिसने
तलवारों पे तोला था
हर पर्बत पे आग जली थी
हर पत्थर एक शोला था
बोली हर हर महादेव कि
बच्चा बच्चा बोला था ||
| जय शिवराय |
– सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख
प्रांत बारा मावळ