महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,00,482

छत्रपति शिवाजी महाराज जावळीच्या खोऱ्यात

Views: 7753
4 Min Read

छत्रपति शिवाजी महाराज जावळीच्या खोऱ्यात…

जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी छत्रपति शिवाजी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची… महाबळेश्‍वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला – मुरारबाजी देशपांडे,
तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!’’
जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्‍या चंद्रराव मोर्‍यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्‍वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्‍यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोर्‍यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. ‘चंद्रराव’ हा मोर्‍यांचा पिढीजात किताब होता.

आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोर्‍यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे ‘चंद्रराव’ झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोर्‍यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला लागले आणि चंद्रराव मोर्‍यांनी महाराजांविरुद्ध सवतासुभा मांडला. चंद्रराव मोरे महाराजांचे उपकार विसरले.

दौलतीचा खांब होण्याऐवजी मोर्‍यांनी दौलतीलाच आव्हान दिले. ‘‘…तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले? आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्‍वर! त्याच्या आणि बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. येता जावळी, जाता गोवळी?’’ राजगडाच्या सदरेवर मोर्‍यांनी उद्दामपणे लिहिलेले पत्र पंतांनी राजांना वाचून दाखविले. हा मग्रुरीचा जबाब ऐकून महाराज संतापले. मोर्‍यांना अखेरची संधी मिळावी म्हणून महाराजांनी पुन्हा एक पत्र मोर्‍यांना धाडलं ‘जावळी खाली करोन, हात रुमालांनी बांधून भेटीस येणे!’ पण चंद्रराव व हणमंतराव गुर्मीला आले. कारणच तसे होते. कारण त्यांच्या ताब्यात होते जावळीचे खोरे!

जावळी म्हणजे वाघाची जाळी. जावळीचे खोरे म्हणजे महाबिकट मुलुख. जावळीच्या खोर्‍यात उतरणे म्हणजे मृत्यूच्या खाईत उतरण्यासारखे होते. याच जावळीच्या आणि आपल्या पायदळाच्या गुर्मीत मोर्‍यांनी राजांना उलट उत्तर पाठविले ‘‘…जावळीत येणारच तर यावे. दारूगोळा मौजूद आहे. जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही!’’

मोर्‍यांच्या पत्राची थैली राजगडाच्या सदरेवर उघडली गेली आणि महाराजांच्या संतापाचा कडेलोट झाला. महाराजांनी ओळखलं, मोर्‍यांस मारल्याविना स्वराज्य साधत नाही. जावळी स्वराज्यात येत नाही. जगतगुरू तुकोबा मोरे स्वराज्य ‘प्रतिपश्चंद्रलेखेव’ होण्याकरिता महाराजांना मदत करीत होते आणि जावळीचे मोरे स्वराज्याच्या मुळावरच उठले होते.

मराठ्यांचे दुर्दैव, दुसरं काय! महाराजांचे कान्होजी जेधे, हैबतराव शिळीमकर, संभाजी कावजी कोंढाळकर, नांदलनाईक यांना तातडीचे हुकूम सुटले. निवडक धारकरी जावळीच्या कीर्र जंगलात घुसले. एकदम भयंकर कालवा उठला. चर्तुबेट, जोर, शिवथर आणि खुद्द जावळीवर एकाचवेळी मराठ्यांचा छापा पडला.

चंद्रराव, प्रतापराव, हणमंतराव आणि सगळी मोरे मंडळी धावली. दोन्ही बाजूंकडून मराठेच आपापसात लढू लागले, पण स्वराज्यासाठी त्यांचा नाइलाज होता. कापाकापी सुरू झाली. किंकाळ्यांनी जावळी कोंदली. संभाजी कावजी कोंढाळकरांनी हणमंतराव मोरे ठार केला. प्रतापराव मोर्‍यांनी लपत छपत विजापूरचा रस्ता धरला. खासा चंद्रराव जावळी हातची जातेय हे पाहून रायरीकडे पळाला.

जावळी काबीज झाल्यावर जावळीजवळचे चंद्रगड, मकरंदगड, सोनगड, चांभारगड हेही किल्ले स्वराज्यात सामील झाले. जावळीची जागा कमालीची बिकट तेवढीच अजिंक्य! महाराजांनी आपला खजिना ठेवण्याकरिता हीच जागा पसंत केली. जावळी खोर्‍याला खेटून असलेल्या पारघाटाच्या नाकासमोरील भोरप्या डोंगरावर महाराजांनी तटा-बुरुजाचे शेलापागोटे चढविले आणि तयार झाला जावळी खोर्‍याचा रखवालदार ‘#किल्ले_प्रतापगड’! याच प्रतापगडाने आणि जावळीच्या खोर्‍याने महाराजांना अफझलयुद्धात प्रचंड यश मिळवून दिले.

असे हे जावळीचे खोरे महाबळेश्‍वराच्या पश्‍चिमेकडे आहे. महाबळेश्‍वराहून कोकणात म्हणजे महाडकडे उतरणार्‍या गाडीरस्त्याच्या दोन्ही बाजूस जावळीचे खोरे आहे. महाबळेश्‍वर उतरून प्रतापगडाकडे जाण्याच्या रस्त्याच्या उजव्या बाजूस जावळीचा फाटा आहे. येथून जवळच मोर्‍यांची जावळी आहे. गावात मोर्‍यांच्या कुलदैवतांचे मंदिर आहे. जवळच मोर्‍यांच्या गादीचे ठिकाण आहे.\

पक्का घाटी
Leave a Comment