शिवालय तीर्थ, वेरुळ –
जागतिक वारसा असलेल्या वेरुळ लेणी आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरांमुळे वेरुळ हे पर्यटकांनी कायम गजबजलेले असते. मंदिरात असलेल्या शिलालेखाकडे अभ्यासक सोडले तर कोणी बघत पण नाही. पण पर्यटकांच्या गर्दीचा लवलेश नसलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे वेरुळमध्ये आहेत. अहिल्याबाई होळकरांच्या स्मृती जपणारे शिवालय तीर्थ, लक्ष विनायक मंदिर, मालोजीराजे यांची गढी व शहाजी राजांचा पुतळा, वेरुळ गावातील अष्टभुजा विष्णूमूर्ती, डोंगरावर असलेले श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर इ. वेरुळमधील काही अपरिचित ठिकाणे.
शिवालय तीर्थ नावाने ओळखले जाणारे कुंड प्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिरापासून अंदाजे ४००-५०० मीटर अंतरावर आहे. हे कुंड १८५ मीटर x १८५ मीटर आकाराचे आहे. पुराणांमध्ये उल्लेख असलेल्या या जलाशयाचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी शके १६९१ (इ. स. १७६९) मध्ये केला आणि तेथील भिंतीवर शिलालेखरुपात तशी नोंद करून ठेवली आहे.
ही बारव बांधण्याच्या मुख्य हेतू मानवी वस्तीची पाण्याची गरज भागवणे हा आहे. त्याचबरोबर बारवेचे पावित्र्य टिकून राहावे म्हणून बारवेमध्ये मंदिरे बांधून त्यात देवतांची प्रतिष्ठा करण्यात आली आहे.
एकात एक लहान होत जाणारे सहा टप्पे आणि संरक्षक भिंतीचा सातवा टप्पा अशा एकूण सात टप्प्यात या बारवेचे सुबक बांधकाम केले आहे. बारवेत प्रवेश करण्यासाठी संरक्षक भिंतीमध्ये चार दिशांना चार प्रवेश आहेत. संरक्षक भिंतीच्या आतील बाजूस वस्त्र बदलण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यात एक याप्रमाणे दोन खोल्या बांधलेल्या आहेत. तसेच भिंतीमध्ये दिवे लावण्यासाठी कोनाड्यांची रचना केली आहे. संरक्षक भिंतींच्या पूर्व बाजूस अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या जीर्णोद्धाराची नोंद म्हणून उठावाचा शिलालेख कोरून ठेवला आहे.
वाचन –
श्री शके १६१९ विरोधी (स)वत्सरी माघ सुदि
नाग बुध दिनि होळकर कुलाल वा
लकल्पवल्ली श्री अहल्ला बाईने श्री
तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धा
र केला असे श्री र स्तु शिवमाकल्प
अर्थ: श्री शके १६१९ विरोधी संवत्सर माघ शुद्ध बुधवार या दिवशी श्री अहिल्याबाई होळकर यांनी तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धार केला.
शिलालेख –
शिलालेखात तिथीचा उल्लेख नसल्यामुळे नक्की तारीख सांगता येत नाही. शिलालेखात असलेल्या माघ शुद्ध बुधवार या उल्लेखावरून पिल्लई जंत्रीनुसार पंचमी (३१ जानेवारी १७७०) किंवा द्वादशी (७ फेब्रुवारी १७७०) या दिवशी जीर्णोद्धार पूर्ण झाले. महेश तेंडूलकरलिखित “मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्वात” या पुस्तकात दिलेला माघ सुदिनाग बुध दिनि म्हणजेच माघ महिन्यातील सुदिन बुधवार असा अर्थ घेतल्यास शुद्ध पक्षाबरोबर वद्य पक्षातील बुधवारी येणाऱ्या पंचमी (१४ फेब्रुवारी १७७०) आणि एकादशी (२१ फेब्रुवारी १७७०) या तिथींचा पण विचार करावा लागेल. तिथीचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे या वरील चार तारखांपैकी एका तारखेला जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे.
शिलालेखाचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अहिल्याबाई होळकर असा स्पष्ट उल्लेख. अहिल्याबाईंचे जे इतर शिलालेखात उपलब्ध आहेत त्यात त्यांचा उल्लेख मल्हारराव होळकरांची सून किंवा मल्हाररावांचा मुलगा खंडेराव याची पत्नी असा केलेला आहे.
प्रत्येक दिशेला पूर्व बाजूने असलेल्या तेरा पायऱ्या उतरून आपण बारवेच्या पहिल्या टप्प्यावर येतो. या टप्प्यावर चारही कोपऱ्यात बुरुजसदृश्य अष्टकोनी आकाराचे बांधकाम केले आहे. पहिल्या टप्प्यावरून दुसऱ्या टप्पा आणि दुसऱ्यावरून तिसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी प्रत्येकी सात पायऱ्या बांधलेल्या आहेत. चौथ्या टप्प्यावर जाण्यासाठी जाण्यासाठी सात पायऱ्या आहेत. या टप्प्यावर चार कोपऱ्यात आणि बाजूंवर आठ शिखरयुक्त छोटी देवळे आहेत. या देवळांची शिखरे भूमिज, नागर इ. विविध शैलीमध्ये आहेत. या प्रत्येक देवळात शिवलिंगाबरोबर महिषासुरमर्दिनी, गणपती, लक्ष्मी-नारायण इ. देवतांच्या प्रतिमा आहेत.
पाचव्या आणि सहाव्या टप्प्यात पाण्याचे कुंड आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर कुंडातले पाणी आणि संपूर्ण परिसराची सफाई केली जाते. त्रिपुरी पौर्णिमेला येथे उत्सव साजरा केला जातो. बारवेच्या पूर्व प्रवेशाजवळ सती समाध्या आहेत.
घृष्णेश्वर मंदिरातील शिलालेख –
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर नक्की कोणत्या काळात बांधले गेले हे माहिती नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी व विठोजी भोसले आणि अहिल्याबाई होळकर यांच्याकाळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. तसेच मालोजी यांनी वेरूळ येथील तिमणभट बिन दामोदरभट शेडगे यांना अभिषेक व पूजाअर्चेची व्यवस्था सांगून त्यांची नेमणूक केली होती. घृष्णेश्वर मंदिराच्या भिंतीवर एकाशेजारी एक असे तीन उठावाचे शिलालेख कोरून ठेवले आहेत. त्यापैकी दुसऱ्या शिलालेखात मालोजी व विठोजी यांचे नाव वाचायला मिळते. या शिलालेखात ते स्वत:ला दास म्हणतात. तसेच पहिल्या शिलालेखात उल्लेखलेला सेवक येकोजि जैतोजि भोसले आणि तिसऱ्या शिलालेखातील सेवक आऊजि गोविंद हणवत्या यांच्याबद्दल कोणतेही संदर्भ उपलब्ध नाही आहेत.
वाचन –
सेवक येकोजि जैतो
जि भोसळा
दास माळोजि बाबाजी
व विठोजि बाबाजी भो
सळे
सेवक आऊजि गो
विंद हणवत्या
संदर्भ –
महाराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि पारंपारिक जलव्यवस्थापन, ले. अरुणचंद्र शं. पाठक , अपरांत, पुणे, २०१७.
मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्वात, ले. महेश तेंडूलकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१५.
पंकज समेळ