शिवराय भूकंप आणि धूमकेतू –
मध्यंतरी शिवकाळ आणि खगोलीय घटना या विषयाचा अभ्यास करत होतो. त्याचवेळी माझा याच विषयावरचा एक लेख आपल्या रुद्र आर्टच्या ‘रौद्रपर्व’ या दिवाळी अंकासाठी दिला होता. यामध्ये दोन खूप महत्त्वाचा गोष्टी होत्या ज्या मला आवर्जून सांगाव्याशा वाटतात, त्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा देहावसान झालं, तेव्हा भूकंप झाल्याच्या आणि धूमकेतू दिसल्याच्या घटना समकालीन साहित्यात आहेत. याबद्दल मी माझ्या काही इतिहास अभ्यासक मित्रांनाही विचारपूस केली होती. पण उपलब्ध पुराव्यांनुसार माझा एकंदरीत अंदाज आहे की या दोन्ही घटना खऱ्या असाव्यात.शिवराय भूकंप आणि धूमकेतू.
समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात एक नोंद करून ठेवली आहे, जी या श्लोकातून कळते, ती म्हणजे ‘अकस्मात मागे भूमिकंप झाला, नभामाजी तारेंसी शेंडा निघाला’! याचा अर्थ, अचानक भूकंप झाला आणि आकाशामध्ये ताऱ्याला शेंडी असलेली एक गोष्ट दिसून आली. मी दासबोध वाचलेलं नाही, त्यामुळे मला वैयक्तिक समर्थांच्या साहित्यात ही ओळ मिळण्याचा संबंध नाही. पण अॅस्ट्रोनॉमर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सचे प्रोफेसर रमेश कपूर यांच्या कॉमेट टेल्स फ्रॉम इंडिया (एन्शिएन्ट टू मेडिएव्हल) या रिसर्च पेपरमध्ये समर्थांच्या या ओळीची नोंद आहे, जी फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता.
दुसरी गोष्ट म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद लिखित सभासद बखरीमध्ये शिवरायांच्या निधनाची नोंद करण्यात आली आहे. सभासद लिहितात की, ‘राजीयांचे देहावसान झाले, ते दिवशीं पृथ्वीकंप जहाला, गगनी धूमकेतू उदेला. उल्कापात आकाशाहून जाला. रात्री जोड इंद्रधनुष्ये निघाली.’ आता या दोन्ही गोष्टींमध्ये पाहायचं झालं तर भूमीकंप आणि पृथ्वीकंप हे भूकंपाच्या संदर्भातीलच दोन्ही शब्द आहेत, याशिवाय ‘नभामाजी तारेंसी शेंडा निघाला’ आणि ‘गगनी धूमकेतू उदेला’ या गोष्टी धूमकेतूशी साधर्म्य दाखवतात. ही झाली साहित्याची बाजू !
पण १६८० साली एका मोठा धूमकेतू ज्याला ‘न्यूटन्स कॉमेट’, ‘कर्च्स कॉमेट’ किंवा ‘द ग्रेट कॉमेट’ म्हणतात, तो पृथ्वीजवळून गेला होता, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. टेलीस्कोपद्वारे शोधला गेलेला हा पहिला धूमकेतू होता. या धूमकेतूचा शोध जर्मन खगोलशास्त्रज्ञ गॉटफ्राईड कर्च याने लावला होता. फोटोंमध्ये एक चित्रसुद्धा आहे जे डच पेंटर लिव्ह वर्श्यूआयर याने काढला होतं. पण इथे एक गोष्ट अडते की हा धूमकेतू कर्चने १९ नोव्हेंबर १६८० ला शोधला होता आणि हा शेवटचा १९ मार्च १६८१ ला दिसला होता. महाराजांचं देहावसान एप्रिलमधलं आहे तर हा धूमकेतू एप्रिलमध्ये कसा दिसू शकतो हा प्रश्न उद्भवतो. पण पाहायला गेलं तर धूमकेतू हे महिनोमहिने विजीबल असतात. १९८६ ला हॅलेचा धूमकेतू सहा महिने विजीबल होता. तसेच कर्चने धूमकेतू शोधला म्हणजेच टेलीस्कोपने पहिल्यांदा पाहिला. तसही हा धूमकेतू नेकेड आय दिसतच होता. त्यामुळे ‘द ग्रेट कॉमेट’ जवळपास वर्षभर विजीबल असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तो भारतातूनही निश्चितच दिसला असावा.
दुसरी गोष्ट मला अचंबित करणारीच मिळाली. ती म्हणजे २ एप्रिल १६८० रोजी महाडमध्ये भूकंप झाल्याची नोंद ‘कॅटलॉग ऑफ अर्थक्वेक्स (=>M.०.३) इन पेनिनसुलर इंडिया’ यात करण्यात आली आहे. हे कॅटलॉग एटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डने (AERB) प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये भारतात १४व्या शतकापासून झालेल्या भूकंपाची नोंद आहे आणि २ एप्रिल १६८० मध्ये महाड, महाराष्ट्रमध्ये भूकंप झाल्याची तारीख स्पष्ट दिसत आहे. याचा अर्थ शिवरायांच्या निधनावेळी भूकंप झाल्याची आणि धूमकेतू दिसल्याची या दोन्ही घटना घडल्या असाव्यात, असा अनुमान लावता येतो. सांगायचं एवढंच की, शिवकाळात भूकंप झाल्याची आणि धूमकेतू दिसल्याचा हा थोडा आगळा वेगळा पुरावा मिळाला आणि तो मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. तरीही जाणकारांनी आणि इतिहास अभ्यासकांनी माहिती द्यावी.
View Original Post
रॉबर्ट आर्म यांच्या हिस्टोरीक फ्रागमेंट्स (Historical Fragments) या पुस्तकात असलेलं शिवरायांचं चित्र
सभासद बखरीतील उल्लेख
रमेश कपूर लिखित कॉमेट टेल्स ऑफ इंडियामधील उल्लेख
कॅटलॉग ऑफ अर्थक्वेक्स (=>M.०.३) इन पेनिनसुलर इंडिया
महाडमध्ये भूकंप झाल्याचा उल्लेख
डच पेंटर लिव्ह वर्श्यूआयरने काढलेलं ‘द ग्रेट कॉमेट’चं चित्र
जर्मन खगोलशास्त्रज्ञ गॉटफ्राईड कर्च
– सागर जाधव ©