महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,658

शिवरायांची पहिली लढाई

By Discover Maharashtra Views: 2089 9 Min Read

शिवरायांची पहिली लढाई –

गनिमी कावा‘ म्हटलं कि शिवाजी महाराज हे नाव डोळ्यासमोर येतं आणि शिवाजी महाराज म्हटलं कि ‘गनिमी कावा‘. २५ जुलै १६४८ ला मुस्तफाखानाच्या आदेशावरून बाजी घोरपडेंनी आपल्या चुलत भावाला, म्हणजे शहाजी राजांनाच कैद केलं. शिवाजी महाराजांची उमर यावेळी जेमतेम १८ वर्षांची. अश्यातच आदिलशहाने फतहखानला सोबत भलीमोठ्ठी फौज देऊन शिवाजी महाराज आणि त्यांच्या ‘हिंदवी स्वराज्याच्या’ कळीला चिरडायला पाठवल. आदिलशहाच्या या मुरलेल्या योध्याशी झुंजायचा शिवाजी महाराजांचा हा पहिलाच प्रसंग, पण या पाहिल्याच लढाईच एका मुरब्बी, अनुभवी आणि निष्णात योद्ध्याप्रमाणे नियोजन करून शिवाजी महाराजांनी हे दाखवून दिलं की या महाराष्ट्राच्या, सह्याद्रीच्या भावी छत्रपतींच आगमन झालेलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत महाराजांनी या लढाईचं आणि या प्रसंगाच एका कसलेल्या सेनापतीप्रमाणे आणि प्रजापालनदक्ष राजाप्रमाणे कसं नियोजन केलं होतं पाहुयात आजच्या भागात.शिवरायांची पहिली लढाई.

हा लेख व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

मुस्तफाखान शहाजी राजांचा खासा द्वेश करायचा. आदिलशहाने हुकूम देताच त्याने लगेच राजांना कैद केली. आदिलशहाने फरादखानाला शहाजी राजांचे थोरले पुत्र संभाजी राजांवर बंगळुरात तर फतहखानाला शिवाजी महाराजांवर महाराष्ट्रात हल्ला करायला पाठवलं. या हल्ल्याला आपण दोन दृष्टिकोनातून समजून घ्यायचा प्रयत्न करूयात.

१. फतहखानाने त्याची लष्करी आघाडी कशी उभी केली ते पाहू

२. आणि मग शिवाजी महाराजांनी ‘गनिमी काव्याचा’ डाव कसा टाकला होता ते अभ्यासू. हे समजून घेण्यासाठी आपण शिवाजी महाराज आणि फतहखानाच्या हालचाली गुगल मॅपवर’ पाहुयात.

बरं फतहखान हा कोणी नवशिका हशम प्यादं नव्हता तो अदिलशाहीतला एक मुरब्बी सरदार होता. आदिलशहाने त्याच्याबरोबर ५००० ची फौज दिली होती. फ़तहखानाला वाटायचं की एक तर हा पोर (म्हणजे शिवाजी महाराजा बरं का?) उणापुरे १८ वर्षांचे आणि त्याच स्वराज्य म्हणजे ४-६ गडांचा आणि १०-१२ आदिलशहाशी बेईमान करणाऱ्या सरदारांनी मांडलेला भातुकलीचा खेळ त्याला बुडवायला असा कितीसा वेळ लागणार? ‘माशीला चिरडायला तोफेची काय गरज?’ असं सारखं फतहखानाला वाटे. त्यात त्याला कळलं की शिवाजी महाराज पुरंदर गडावर आहेत तेव्हा लगेच त्याने शिरवळ जवळ बेलसरला आपल्या फौजेचा तळ ठोकला. ही बेलसरची जागा त्याने उगाच निवडली नव्हती. इथे छावणी केल्यावर त्याला पाण्याचा अविरत पुरवठा होणार होता जो फौजेसाठी महत्वाचा होता आणि मोहीम सुरु असेपर्यंत बेलसरवर असल्यामुळे त्याचा विजापूरशी संपर्कही तुटणार नव्हता. म्हणजे संकटकाळी जास्तीची कुमक आणि फौजेच्या रोजच्या उदरनिर्वाहासाठी पाणी वगैरे ची योग्य सोय फ़तहखानाने केलेली होती. हेच जर शिवाजी महाराज पुरंदरगडावर असताना फतहखानाने राजगडावर राजधानी म्हणून हल्ला केला असता तर तो दोन्ही बाजूने महाराजांच्या कचाट्यात सापडला असता, हाही विचार करून तो बेलसरलाच थांबला. बेलसरला तळ ठोकल्यावर फतहखानाने बाळाजी हैबतरावांना शिरवळचा ‘सुभानमंगळ’ गड घ्यायला पाठवलं. याच्यामागे त्याचे २ उद्देश होते

१. शिवाजी महाराजांच लष्कर किती पाण्यात आहे ते बघणं म्हणजेच त्यांची लष्करी ताकद हे पाहणं

२. आणि सुभानमंगळ मिळाला की तिथून शिवाजी महाराजांना मिळणारी मदत बंद करणं

बाळाजी हैबतरावांनी सुभानमंगळवर हल्ला करताच फार काही प्रतिकार न करता शिवाजी महाराजांच्या सैन्याने हा गड आदिलशाही फौजेला मिळू दिला. आता फतहखान एकदम निश्चिन्त होता. तो त्याच्या लष्करी चाली अगदी पटाईत योद्ध्यासारख्या खेळला होता. पण फतहखानाला कुठे माहित होतं की तो बेलसरला आला नव्हता त्याला महाराजांनी तिथे आणलं होतं.

आता बघुयात महाराजांचं हे पाहिलंच युद्ध असलं तरी महाराज गनिमी काव्याचा एक मास्टरपीस कसा साकारत होते. शिवचरित्रसाहित्य खंड १ नुसार, फ़तहखान यायच्या काही दिवस आधीच शिवाजी महाराजांना पुरंदरगड महादजीपंतांनी दिला. हे महादजीपंत आणि शहाजी राजे यांची जुनी मैत्री होती आणि त्याच मैत्रीला जागून महादजीपंतांनी हा गड शिवरायांच्या हवाली केला. शिवाजी महाराजांना माहित होतं की ते पुरंदरला आहेत हे कळताच फ़तहखान सुद्धा पुरंदरलाच येईल यामुळे महाराजांचे दोन फायदे झाले

१. गनिमी काव्याच्या नियमानुसार शिवाजी महाराजांनी त्यांची युद्धभूमी स्वतः निवडली आणि फ़तहखानला पुरंदरला ओढलं. पुरंदर हा काही साधा सुधा गड नव्हता. जर योग्य तयारी केली तर हजारोंच सैन्यसुद्धा या पुरंदरसमोर निरर्थक होतं

२. आणि दुसरा फायदा की त्यावेळी शिवरायांचं हिंदवी स्वराज्य छोटं होतं आणि पुरंदर हा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या सीमेवरचा एक भक्कम किल्ला होता. म्हणजेच शिवरायांनी आपल्या रयतेचा विचार करून या आदिलशाही सैन्याच्या वादळाला हिंदवी स्वराज्याच्या सीमेबाहेरच थोपवलं. सिद्दी जोहरच्या वेळीसुद्धा महाराजांनी अशीच प्रजादक्षता दाखवली होती

फ़तहखानाच्या सैन्याने म्हणजेच बाळाजी हैबतरावांनी सुभानमंगळवर हल्ला करताच शिवाजी महाराजांच्या सैन्याने तो गड जास्त न लढवता तो सहज देऊन टाकला, कारण शिवाजी महाराजांना या लढाईच केंद्र सुभानमंगळ ठेवायचं नसून पुरंदर ठेवायचं होत आणि त्याच बरोबर हा गड फ़तहखानाला सहज देऊन त्याला आणि त्याच्या सैन्याला बेसावध करायचं होतं. आणि यामुळे नेमकं तसच झालं आधीच ज्या फ़तहखानाला ‘एव्हढुश्या शिवाजी साठी एव्हढं मोठ्ठ सैन्य’ कशाला असा जो प्रश्न पडत होता त्याला यामुळे आणखीनच गर्व चढला.

तो बेसावध होताच शिवाजी महाराजांच्या सैन्याने हल्ला करून हा सुभानमंगळ गड एका झटक्यात परत मिळवला. फ़तहखानाच्या, बाळाजी हैबतराव नावाच्या सरदाराला महाराजांच्या मावळ्यांनी इथूनच यमसदनाला पाठवलं. सुभानमंगळला आदिलशाही फौजेचा झालेला पराभव फ़तहखानाला कळण्या आगोदरच महाराजांच्या दुसऱ्या तुकडीने फ़तहखानाच्या बेलसरला असलेल्या बेसावध छावणीवर हल्ला करून फ़तहखानाला अजूनच डिवचलं. या हल्ल्याचे तपशील आपण मागच्या भागात पहिले, ते पहिले नसतील तर व्हिडिओत उजवीकडे वरच्या कोपऱ्यात लिंक दिलेली आहे. या हल्ल्यात शिवाजी महाराजांचे काही मावळे जरी धारातीर्थी पडले असले तरी, एव्हढुसं मुंगीएव्हढं मराठ्यांचं सैन्य आपल्यावर टोळधाडी घालतय हे बघून फ़तहखानाची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यात त्याला ‘सुभानमंगळ’ गडावरून पळून आलेल्या त्याच्या सैन्याने त्यांच्या पराभवाची आणि बाळाजी हैबतरावाच्या धारातीर्थी पडण्याची कथा ऐकवल्यावर तर फ़तहखानाचा स्वतःवरचा ताबाच सुटला. शिवाजी महाराजांना अपेक्षित होता अगदी तसाच परिणाम फतहखानावर झाला. सुडाने पेटलेल्या फ़तहखानाने पुढचा मागचा विचार न करता सरळ पुरंदर गडावर जिथे शिवाजी महाराज होते त्या गडावर हल्ला केला.

महाराजांना नेमकं हेच हवं होतं. पुरंदर या आक्रमणासाठी एकदम सज्ज होता. फ़तहखानाच्या सैन्यात सगळ्यात पुढे मुसेखान होता, डावीकडे फलटणचे निंबाळकर तर उजवीकडे राजे घाटगे होते. फ़तहखान सैन्याच्या मागच्या बाजूस होता. शिवभारत म्हणतं की यातले बरेच लोक डोंगर कधीच चढले नव्हते तर बरेच केवळ पालखीनेच प्रवास करत असत. आता अश्या लोकांनी डायरेक्ट पुरंदर सारख्या दुर्गेश्वरावर हल्ला केला असेल तर त्यांची काय गत झाली असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. हे सैन्य तोफांच्या टप्प्यात पोहोचताच तोफा त्यांच्यावर आग ओकू लागल्या, बंदुकीच्या गोळ्या त्यांच्यावर बरसू लागल्या, अग्निबाणांनी बऱ्याच सैन्याला होरपळून काढलं, तर मराठ्यांच्या लाडक्या शास्त्राने म्हणजे दगड, धोंड्यांनी कित्येकांच्या छाती, डोकी आणि काय मिळेल ते फोडलं.

आपल्या सैन्याची वाताहत होतेय हे पाहून मुसेखानाने त्वेषाने मराठ्यांवर हल्ला चढवला. या मुसेखानावर शिवरायांचा गोदाजी जगताप तुटून पडला. यांच्या द्वंद्व युद्धच एकदम फिल्मी वाटेल असं वर्णन शिवभारतात आहे. शिवभारत म्हणतं हल्ला करता करता या गोदाजीने सरळ भालाच या मुसेखानाच्या छातीत खुपसला. हा मुसेखान पण काही कमी नव्हता आग्या वेताळच तो, त्याने छातीतून भाला काढला आणि त्याचे तुकडे करून फेकून दिला. मुसेखानाने तलवारीचे वार गोदाजीवर करायला सुरु केली आणि गोदाजीच्या डाव्या खांद्यावरच घाव घातला. दोघेही ऐकेनात, तुंबळ युद्ध झालं. अखेर आपल्या वाघाने गोदाजीने तलवारीचा एक जोरदार वार मुसेखानाच्या खांद्यावर केला आणि तो खांद्यापासून मध्यभागापर्यंत कापला गेला. मुसेखानाचे दोन तुकडे झाले. मुसेखान पडताच आधीच घाबरलेल्या आदिलशाही सैन्याचं अवसानच गळालं आणि फ़तहखानासकट सगळं आदिलशाही सैन्य दाही दिशांना पळत सुटलं.

हे शिवरायांचं पाहिलं युद्ध होतं. अर्थातच पुरंदरावरून शिवाजी महाराज या युद्धच सेनापतित्व सांभाळत होते. महाराज केवळ १८ वर्षांचे होते, त्यांच्यासमोर आदिलशाहीचा एक अनुभवी योद्धा आणि ५००० च सैन्य होत. यावेळी महाराजांचेच वडील कैदेत असल्याने त्यांच्यावर दडपण येईल अशीच परिस्थिती होती. या युद्धच सेनापतित्व सांभाळणाऱ्या शिवरायांना हे युद्ध फक्तच लढायचं नव्हतं तर जिंकायच पण होतं. शिवाजी महाराजांनी नुकताच ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन करण्याचा घाट घातला होता. अश्यात या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांना जर पराभवाला सामोरं जावं लागलं असतं तर कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातही शिवरायांबद्दल अविश्वास निर्माण होऊ शकला असता. पण महाराजांनी हे आव्हान या तीनही आघाड्यांवर पेललं. ‘गनिमी काव्याचा’ एक उत्तम डाव तर महाराजांनी टाकला, समर्थपणे आणि संयम ठेवून नेतृत्वही केलं आणि हे सगळं करत असताना स्वतःवर कधी दडपण येऊ दिलं नाही. आपलं स्वतःचच नाही तर आपल्या सैन्याचं मनोधैर्यही टिकवून ठेवलं. या युद्धामुळे आदिलशाहीला शिवाजी महाराजांनी खुलं आव्हान दिलं आणि ‘हिंदवी स्वराज्य’ हे आदिलशाहीचा एक औपचारिक शत्रू राष्ट्र बनलं. ही लढाई शिवाजी महाराजांसाठी सोप्पी नव्हती. पण शिवाजी महाराजांनी एका मुत्सद्दी, मुरब्बी राजकारण्याप्रमाणेच नाही तर योद्ध्याप्रमाणेही आपल्या सगळ्या कामगिऱ्या पार पडल्या आणि आदिलशहाच्या सैन्याला चारी मुंड्या चीत केलं. धन्यवाद.

Suyog Sadanand Shembekar

Leave a Comment