शिवभूषण!!
पुस्तक लेखमाला क्रमांक – १३
२००८ या वर्षीच्या दिवाळीत स्टार प्रवाह वर श्री नितिन देसाई दिग्दर्शित आणि डॉ अमोल कोल्हे अभिनित “राजा शिवछत्रपती” ही दैनंदिन मालिका चालू झाली होती. सुरुवातीलाच अजय अतुल यांच्या संगीतातील आणि आवाजातील “इंद्र जिमी जंभ पर” हे एकदम खड्या आवाजातले शिर्षक गीत ऐकायला यायचे. अंगावर अगदीच रोमांच उभे राहायचे. शिवचरित्र अभ्यास करताना हळूहळू लक्ष्यात यायला लागले की ते शिर्षक गीत म्हणजे कवी भूषण यांचे छंद काव्य आहे.मग त्यानंतर कवी भूषण यांच्या संदर्भात माहिती घेणे चालू केले.शिवभूषण.
कवी भूषण हे मूळ कानपुर येथील त्रिविक्रमपूर या गावातील ब्राम्हण कुटुंबातील. अकबराच्या दरबारातील नवरत्न असलेल्या हुशार बिरबलाचेही हेच गाव.याच गावी श्री काशिविश्वेश्वरचे बिहारीश्वर महादेव मंदिर आहे. भूषण ही पदवी होती.त्यांचे मूळ नाव अज्ञातच आहे.
त्यांचा ब्रज भाषेवर प्रचंड अभ्यास आणि प्रभुत्वही होते. औरंगझेब ला त्याच्याच दरबारात त्याच्याविषयी केलेल्या कटू काव्यामुळे त्यांना मारण्यासाठी औरंगजेब ने तलवार उपसली होती. पण अभयपत्र असल्याने कवी भूषण यांची तेथून सुटका झाली.
त्यानंतर राजा शिवछत्रपती यांची कीर्ती ऐकून कवी भूषण १६७० च्या आसपास किल्ले रायगडावर श्री शिवछत्रपतींच्या भेटीला आले. काही इतिहासकार किल्ले रायगड भेटीत कवी भूषण हे मंदिरात श्री शिवछत्रपती यांना किल्ले रायगड च्या पायथ्याशी भेटले असा उल्लेख करतात.
कवी भूषणाने रायगडावर बसून ‘शिवभूषण’ हा एक काव्यग्रंथ रचला.कवी भूषणाने अलंकारांची लक्षणे सांगून त्यांची उदाहरणे दिली आहेत ती त्या ग्रंथाचा नायक छञपती शिवाजी महाराजांवर रचलेली आहेत.असा हा अनोखा ग्रंथ आहे.तर असा हा ग्रंथ तब्बल ३ वर्षे नी लिहून पूर्ण झाला.म्हणजे संदर्भ ग्रंथानुसार हा ग्रंथ १ जून १६७३ साली पूर्ण करून कवी भूषणाने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना किल्ले रायगडावर समर्पित केला अशी नोंद आहे!
कवी भूषणाने शिवभूषण ग्रंथाच्या सुरवातीस गणेश वंदना सादर केली आहे. नंतर तुळजा भवानीस वंदन करून शिवाजी महाराजांस सदैव विजयी कर अशी प्रार्थना त्याने या छंदात केली आहे.यात एकूण ४०० च्या आसपास ब्रज भाषेतून छंद निर्मिती केलेली आहे. ज्यात त्यांनी शिवछत्रपती आणि त्यांचा पराक्रम याचे सुमुधुर वर्णन केलेले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, धैर्य,अभिमान, दातृत्व,पराक्रम, कीर्ती अश्या अनेक गुणांचे वर्णन या ग्रंथात आहे. त्यांच्या छंदात महाराजांचे पूर्वज,जन्म,अफझलखान वध, शाहिस्तेखान हल्ला,सुरतेची लूट,आग्र्याहून सुटका,साल्हेरीचे युद्ध, पन्हाळा विजय आणि किल्ले रायगडावर असलेल्या गोष्टींचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
छत्रपती ना समकालीन असणारा हा ग्रंथ, शिवचरित्र अभ्यासकांना अतिशय महत्वाचा आहे.
आताच्या पिढीला कवी भूषणाने लिहिलेल्या या ब्रज भाषेतील काव्याचा मराठी अनुवाद करून ते अभ्यासकांसाठी उपलब्ध करण्याचे श्रेय हे आदरणीय श्री निनाद काका बेडेकर यांना जाते.
२०११ साली आलेले हे पुस्तक त्यावेळेस अतिशय महत्वपूर्ण ठरले होते. आदरणीय श्री बाबासाहेब पुरंदरे साहेब आणि निनाद काकांच्या वाणीतून कवी भूषणचे छंद ऐकण्याचे भाग्य मला मिळाले मात्र!! म्हणून मी मला स्वतः ला भाग्यवानच समजतो .तसेच निनाद काकांनी लिहिलेला हा ग्रंथ माझ्या संग्रहात त्यांच्या स्वाक्षरी सहित भेटलेला आहे.
त्यानंतर निनाद काकांचे शिष्य श्री केदार फाळके सर यांनी २०१९ या वर्षी याच विषयावर अजून संशोधनात्मक आणि सविस्तर ग्रंथ लिहिलेला आहे.त्यांनी या ग्रंथाचे नाव “शिवराजभूषण” असे ठेवलेले आहे. प्रचंड अभ्यास आणि नवीन संशोधन करून हा ग्रंथ आताच्या पिढीला अभ्यासायला दिला. त्याबद्दल श्री केदार फाळके सर यांचे आभार मानावे तितके कमीच!!
त्यांनतर अजून एक महत्वाचा ग्रंथ आहे या विषयावर. आदरणीय श्री आप्पा परब लिखित “श्री शिवबावनी” या ग्रंथात आप्पांनी एकूण ५२ छंदाचे विवेचन त्यांच्या शैलीत केलेले आहे.
नुकताच प्रकाशित झालेले आमचे स्नेही श्री रणजित हिर्लेकर यांनीही या विषयावर दोन संक्षिप्त पण अतिशय अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिलेत.दोन्हीही ग्रंथांचे नाव त्यांनी “शिवभूषण” असेच ठेवलेले आहे.यात महत्वाचे म्हणजे त्यांनी स्वतः रचना करून काही काव्यरचना केलेली आहे. अतिशय सुंदर रचना आविष्कार जाहलेला आहे. श्री रणजित सर यांचेही या साठी मनापासून आभार.
कवी भूषणांचे हे काव्य आपल्या खड्या आवाजात म्हणणारे काही मित्रवर्य आपल्या सोबत आहेत. त्यांनीही गायलेले छंद अजून स्फुरण देतात.
या एका महत्वाच्या विषयावर असलेल्या अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथाची माहिती व्हावी हीच या लेखमालेतुन असलेली एकमेव इच्छा!
पुढील लेखमालेत आपण शिवचरित्राच्या अजून काही महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.
आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या पोस्ट मधील एकमेव उद्देश.
बहुत काय लिहिणे?अगत्य असू द्यावे.
किरण शेलार