किल्ले शिवडी | Shivdi fort –
मुंबईतील हार्बर रेल्वे लाईन वर असलेल्या शिवडी स्थानकाजवळ असलेला हा किल्ला. रेल्वे स्थानकापासून किनाऱ्यावर कोलगेट पामोलिव्ह फॅक्टरी आहे या फॅक्टरी जवळच अलीकडे किल्ले शिवडी किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला एक दर्गा आहे. समुद्रकिनाऱ्यावरील हा किनारी दुर्ग आहे.
द कुन्हा नावाच्या इतिहासकारांच्या मते शीव जवळील छोटी जागा अशा अर्थी शेवरी व नंतर अपभ्रंश होऊन शिवडी असे नाव पडले. शिवडी हे मोक्याचे बेट होते. पूर्वेला अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यापासून सुरक्षित बनलेली मुंबईची सामुद्रधुनी व दुसऱ्या बाजूस शीवचे बेट. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात शीव व शिवडीच्या दरम्यान अनेक मिठागरे होती.
शीव बेटा पर्यंतचा सर्व परिसर पोर्तुगीजांकडून आपल्या ताब्यात इंग्रजांनी घेतला. पण सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणीमुळे फारसे लक्ष शिवडी कडे देता आले नाही. “सिक्रेट अँड पॉलिटिकल डिपार्टमेंट” डायरीच्या क्रमांक १,४१,७७३ नोंदीत शिवडी कडे दुर्लक्ष झाल्याची कबुली देण्यात आली आहे. पुढे ब्रिटिश स्थिरावल्यानंतर त्यांनी १६८० साली हा किल्ला बांधला. पुढे १६८९ साली औरंगजेबाचा सरदार याकूत खानने मुंबई स्वारी केली तेव्हा सर्वात प्रथम हा किल्ला जिंकून घेतला. तेव्हा किल्ल्याचे भरपूर नुकसान झाले. नंतर डागडुजीला बराच वेळ लागला असेल असे तेथील एका दगडावर १७६८ कोरले आहे यावरून लक्षात येते. चिमाजीअप्पांनी १७३८ साली साष्टी बेट व सर्व परिसर जिंकून घेतला तेव्हा उपाययोजना म्हणून ब्रिटिशांनी या किल्ल्याची डागडुजी केली असावी.
पुढे १७८९ साली मलबार मधील मोपल्यांचे दंगे झाले तेव्हा इंग्रजांनी त्यातील काही मोपल्याना येथे कैदी म्हणून ठेवले होते. पण हे सर्व कैदी पळून जाण्यात यशस्वी ठरले म्हणून या किल्ल्याचा पुढे गोदाम म्हणून वापर करण्यात आला.
१९४७ साली स्वातंत्र्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी याचा वापर १९७६ पर्यंत गोदाम म्हणून केला. नंतर हा किल्ला सपाट करून कर्मचाऱ्यांसाठी वसाहत उभी करणार होते पण काही सुजाण नागरिकांनी मुळे हा किल्ला वाचला गेला. किल्ल्याजवळील खाडीवर दरवर्षी अनेक फ्लेमिंगो पक्षी येतात त्यामुळे परिसर रमणीय झाला आहे. किल्ल्याला काही भागात दुहेरी तटबंदी आहे. मोठ्या खोल्या हे किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे.
Team- पुढची मोहीम