महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,829

शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला

Views: 4560
3 Min Read

शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला

शिवनेरी हे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर शहरातून हा अगदी समोरच दिसतो व ह्याच्या उंचीच्या साधारण मध्यापर्यंत आपल्याला गाडीरस्त्याने जाता येते. इथून पुढे पायऱ्यांवरून आपल्याला गडाचा माथा गाठता येतो त्यामुळे ही वाट फार अवघड नाही. हा जरी उंचीला फार नसला तरी ह्याला सर्व बाजूंनी कातळकड्यांचे उत्तम चिलखत लाभले आहे. डोंगरातील अनेक लेणी किंवा गुहांमुळे हा किल्ला लांबूनही सहज ओळखू येतो.

माथ्यावर जायला एकूण सात दरवाजे ओलांडावे लागतात. त्यातला पहिला महादरवाजा आहे त्यानंतरचा आहे गणेश दरवाजा. ह्याच्या कमानीवर शरभाची, म्हणजे सिंहासारख्या दिसणाऱ्या एका काल्पनिक प्राण्याची शिल्पे आहेत. तीसरा दरवाजा आहे पीर दरवाजा. चौथा दरवाजा आहे हत्ती दरवाजा. पाचवा दरवाजा शिपाई दरवाजा. सहावा मेणा दरवाजा. त्यानंतर पुढे सातवा कुलुप दरवाजा लागतो. ह्या सगळ्या दरवाज्यांमुळे हा गड अत्यंत बळकट मानला गेला. सातव्या दरवाज्यानंतर, डाव्या हाताला अंबरखाना लागतो. तिथून सरळ जाऊन समोरच्या टेकाडावर गेले की आपल्याला काही टाकी व कोळी चौथरा दिसतो. सरळ जाण्याऐवजी आपण डाव्या हाताची वाट घेतली तर गडाच्या मुख्य भागावर जाता येते.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

शिवाई देवी मंदिर – सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे ‘ मंदिर लागते. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत.

अंबरखाना – शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे.

पाण्याची टाकी – वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात.

शिवकुंज – हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. याची स्थापना व उद्‌घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. जिजाबाईच्या पुढ्यात उभे असलेले बालशिवाजी असा मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंज’मध्ये बसविला आहे. शिवकुंज समोरच कमानी मशीद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे.

शिवजन्मस्थान इमारत – शिवकुंजापासूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेथे त्यांचा एक पुतळा बसविण्यात आला आहे. येथे शिवाजी महाराजांचा पाळणा आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी’नामक पाण्याचे टाके आहे.

कडेलोट कडा – येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दीड हजार फूट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

Leave a Comment