शिवपार्वती मंदिर वडणगे, ता करवीर जि कोल्हापूर –
सध्या जिथे वडणगे गाव आहे, त्याच्या मुख्य चौकांमध्ये आपल्याला श्री पार्वती देवीचे मंदिर दिसते. मंदिरात प्रवेश करताच दिसून येते ते भव्य असे प्रवेशद्वार…!!! मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन द्वारे आहेत, त्यामध्ये पुरुष व स्त्री यांची स्वतंत्र आणि या दोन द्वारांच्या मध्ये एक मोठे द्वार आहे. सध्या याच द्वारा मधूनच भाविक प्रवेश करतात. स्थानिक बेसॉल्ट खडकामध्ये कमान उभारलेली आहे. कमानी मध्ये अतिशय सुंदर अशी कलाकुसर केलेली दिसते. तसेच या कमानीमध्ये आपल्याला श्री गणेशाची मूर्ती दिसून येते. प्रवेशद्वारा मधून आत गेल्यानंतर आपल्याला भव्य असा सभामंडप दिसतो, सभामंडपाच्या दोन्ही बाजूस आपल्याला जुने कोरीव दगडी खांब दिसतात. सध्या या खांबांवरचे जुने बांधकाम आपल्याला दिसून येत नाही. डाव्या बाजूच्या खांबामध्ये आपल्याला कासवामध्ये कोरलेल्या दोन पादुकांचे दर्शन होते.
मुख्य गाभाऱ्यामध्ये देवीचा दीड फूट उंचीचा तांदळा दिसतो. याच तांदळ्या वर देवीची पूजा बांधण्यात येते. देवीचे मंदिर बेसॉल्ट खडकामध्ये बांधलेले आहे. या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर दुर्गा-सप्तशती या ग्रंथांमधील वर्णन केलेल्या अनेक देवींची शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात .यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, कुष्मांडा, कात्यायणी, स्कंदमाता, चंद्रघंटा कालरात्री, महागौरी, दुर्गामाताअशा विविध देवतांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. शारदीय नवरात्र, महाशिवरात्र, प्रत्येक सोमवार या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या बाहेर आपल्याला चार ओवऱ्या पाहायला मिळतात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. त्यानंतर काही वर्षापूर्वी ग्रामस्थांच्यावतीने नव्याने मंदिराची उभारणी झाली आहे. मंदिरासमोर सुंदर दगडी दीपमाळ आहे.
दीपमाळेपासून समोरच्याच रस्त्यांमधून शिवमंदिरा कडे जाण्याचा मार्ग आहे. थोड्या अंतरावरच शिव मंदिर दिसते . त्र्यंबकेश्वर तलावाच्या काठी वसलेले हे शिवमंदिर प्राचीन आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला शृंगी व भृंगी हे द्वारपाल दिसतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम घडवलेले दिसते. मंदिराचा सभामंडप हा नव्याने बांधला असून बारा ज्योतिर्लिंगाचे पेंटिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराचा जीर्णोद्धार हा नव्यानेच काही वर्षांपूर्वी झाला आहे.
सभामंडपानंतर आपल्याला नंदीचे दर्शन होते. मंदिराच्या गाभा-याच्या बाहेर श्री गणरायाची संगमरवरात घडवलेली साधारणतः एक फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये शिवलिंग दिसते. शिवलिंगावर पितळेचा नाग आहे. मंदिराच्या शिखरावर विविध मूर्तींचे दर्शन होते. मंदिराच्या बाहेर साधारण सात ते आठ अशा उंच व काही भग्न झालेल्या विरगळी आपल्याला पहायला मिळतात. प्रत्येक सोमवारी, महाशिवरात्री या दिवशी मोठ्या प्रमाणात येथे भाविक येत असतात. पार्वतीमंदिर व शिव मंदिर यांच्यामध्ये असलेल्या एका चौथऱ्यावर आपल्याला कोंबड्याचे दर्शन होते. महाशिवरात्री मध्ये येथे या कोंबड्याची पूजा केली जाते. या स्थळाचे महत्त्व करवीर क्षेत्र माहात्म्य मध्ये वर्णन केले आहे.
कोल्हापूर शहराच्या उत्तर दिशेला वसलेलं पण करवीरच्या क्षेत्र माहात्म्यात महत्त्वाचं स्थान असलेलं गाव अर्थात वडणगे. भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही धरणी. लोककथेप्रमाणे करवीर चा महिमा ऐकून या क्षेत्रांचे दर्शन घ्यायला स्वतः भगवान विश्वेश्वर माता पार्वती सह काशी सोडून करवीरात येण्यासाठी निघाले. देवांचा नंदी रंकाळ्यावर पोचला. देव आणि माता वडणग्यात राहीले, तोवर कोंबडा आरवला आणि माता पार्वती सह भगवान शंकर जिथे होते तिथेच अर्थात वडणगे गावातच पण वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती रूपात स्थिर झाले. पण करवीर माहात्म्य ग्रंथांत बत्तीसाव्या अध्यायात या क्षेत्राचा उल्लेख उमा त्र्यंबकेश्वर असा आहे. या क्षेत्राचे माहात्म्य असे की इथे माता पार्वती स्वतंत्र मंदिरात विराजमान आहे. करवीर माहात्म्य ग्रंथांत दिलेल्या कथेप्रमाणे कर्मशर्मा नावाचा एक पंचमहापातक केलेला ब्राम्हण आपल्या बांधवांसह इथे आला. महाशिवरात्री दिवशी उपवास करुन त्याने उमा शंकराची बेलाच्या पानांनी पूजा केली व तो सर्वपापांतून मुक्त तर झालाच शिवाय भगवान शंकरांनी त्याला विमानातून कैलासाला नेले.अशा या परमपावन क्षेत्री माता पार्वतीच्या कृपेने सर्व भौतिक सुखे तर शंकरांच्या आशीर्वादाने आध्यात्मिक सुखांची प्राप्ती होते.
Yogesh Bhorkar