शिवराई भाग १०…
छत्रपती शिवाजी महाराजांनी देवनागरी लिपीत पाडलेली स्वतःची नाणी हि एक अत्यंत क्रांतीकारी घटना होती. आजुबाजुला वावरत असलेल्या उर्दु- फारसी नाण्यांचे अनुकरण न करता महाराजांनी आपला स्वभाषेविषयीचा अभिमान यातुन दाखउन दिला. मागील दहा दिवस आपण शिवाजी महाराजांनी पाडलेली शिवराई पाहिली आणि आज यातील शेवटची शिवराई आपण पहाणार आहोत जीला बिंदुमय वर्तुळ असुन शिवाजी महाराजांची मानली जाते आणि उद्यापासुनच्या सर्व शिवराई या दुदांडी प्रकारातील असतील. म्हणजे ‘श्री’ च्या खाली दोन दांड्या असलेल्या. दुदांडी शिवराई हि नंतरची म्हणजे 18-19 व्या शतकातील आहे. दुदांडी शिवराई बद्दल सविस्तर ‘स्वराज्याचे चलन’ पुस्तकात दिलेले आहेच ते नक्की वाचा.
‘श्री/ राजा/ शिव’ आणि ‘छत्र/ पति’ मजकुर असलेल्या नाण्यांवर चिन्हे कमीच येतात, ज्यावर येतात ती नाणीही काही प्रमाणात दुर्मिळच आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे ‘चंद्रकोर’ चिन्ह अंकीत असलेली शिवराई. आपण आज मोठ्या गर्वाने चंद्रकोर डोक्यावर लावत असतो तशीच चंद्रकोर या शिवराई वर आहे. यातले अजुन विविध प्रकारही माझ्या संग्रहात आहेत जसे चंद्रकोर मधे बिंदु असलेली आणि चंद्रकोर च्या खाली बिंदु असलेली शिवराई पुन्हा कधीतरी नक्कीच शेयर करेन. आज सादर शिवराईवर श्री या अक्षराच्या बाजुला चंद्रकोर असुन खाली राजा/ शिव’ मजकुर आहे तर मागील बाजुवर ‘छत्र/ पति’ मजकुर आहे. नाणे तांब्याचे असुन वजन 9.41 ग्राम आहे. या शिवराई कमी मिळतात. अशी आहे ‘चंद्रकोर’ असलेली ‘शिवराई’ !
आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….