शिवराई भाग ११…
आज दुदांडी शिवराई शी आपली ओळख करुन देतो. आधी सांगीतल्याप्रमाणे ‘श्री’ अक्षराच्या खाली येणार्या दोन दांड्यांमुळे या नाण्यांना ‘दुदांडी शिवराई’ म्हणतात. हि शिवराई सरासरी १० ग्रॅम ची होती. तांबे धातूच्या किंमतीत झालेल्या चढामुळे शिवकालीन व शिवउत्तर काळातील शिवराईंमध्ये वजनाचा फरक जाणवतो. शिवराईबद्दल आपल्याला शिवकाळात नाही पण शिवउत्तरकालात बरेच उल्लेख आढळतात. तांब्याच्या नाण्याच्या टांकसाळीला खुर्दयाची टांकसाळ म्हणून संबोधतात. श्री न. वि. जोशी कृत ” पुणे वर्णन” ( पहिली आवृत्ती-१८६८) यात असा उल्लेख आहे की “सन १७८६ म्हणजे शालिवाहन शके १७०८ पराभव नाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा ह्या साली दुल्लभ शेट सावकार, ह्यांनी दुदांडी पैसे बाजारात पेशवे ह्यांच्या हुकमाने चालू केले. बाजारात साडेतीन टक्यांचा भाव केला. हे पैसे त्यांनी नवे पाडले. त्याकरीता पुण्यात टांकसाळ घातली होती”. हा उल्लेख दुदांडी शिवराईचा असावा.
या दुदांडी शिवराई सुरुवातीच्या शिवराईंहुन वेगळ्या होत्या, त्यांच्या वजनात फरक होता, नाण्याच्या साइज मधे हि फरक जाणवतो, तसेच यावर दोन दांड्या आहेत ज्या पुर्वीच्या शिवराईवर नव्हत्या आणि याच बदलांमुळे ‘हे पैसे त्यांनी नवे पाडले’ असा उल्लेख केलेला असावा. याच प्रकारच्या शिवराई पुढे चालु राहिल्या अगदी 19 व्या शतका पर्यंत….
या नाण्यांचा आकार आणि या नाण्यांवरील येणार्या अक्षरांचा विचार केल्यास नाण्याची आवटी (डाय) हि त्या नाण्याच्या Flan पेक्षा मोठी असेल असे दिसते आणि त्यामुळे पुर्ण अक्षरे यावर येत नाही. सुरुवातीच्या शिवराईंप्रमाणेच यावरही 3 र्या ओळीत नाव येते पण या नाण्यांवर दोन दांडी असल्यामुळे खालचे राजाचे नाव नाण्याबाहेरच गेलेले असते. साधारण मजकुर यावर पुढील बाजुनी ‘श्री/ राजा/ (राजाचे नाव)’ आणि मागील बाजुनी ‘छत्र/ पति’ असा असतो. सादर नाण्यावर श्री/ राजा खाली ‘सीव’ नावातील फक्त ‘सी’ ची वेलांटी दिसत आहे, आता हे सीव नेमके कोणत्या छत्रपतींनी पाडले ते सांगणे कठीण आहे. सर्व दुदांडी शिवराई नाणी साधारण अशीच असतात.
आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….