शिवराई भाग ३…
मागील दोन दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी टांकसाळीत केलेल्या एक पैसा ‘शिवराई’ आपण पाहिल्या. पण त्याकाळी फक्त एक पैसा शिवराईच चालायची की आणखी शिवराई चे भागहि होते ? जसे आज आपल्याकडे व्यवहारात सुलभता येण्यासाठी 1, 2, 5 रुपये आहेत, हा प्रश्न पडनं सहाजिक आहे. तर आपल्या भारतात या व्यवहार सोप्या पद्धतीने होण्यासाठीचे परिमाण/ नाण्यांचे भाग मागील 2000 वर्षांपासुन आहेत. तसेच शिवकाळात देखिल होते.
एक पैसा शिवराई, अर्धा पैसा शिवराई, पाव पैसा शिवराई असे नाण्यांचे भाग होते कदाचीत त्याच्या खाली ही असावे कारण काही कागदपत्रांमधे ‘रुका’ हा शब्द येतो (‘रुका/ रुकअ’ चा अर्थ धातुचा तुकडा असा होतो). हि नाणी अंतर्मुल्यधारीत असल्याने या नाण्यांचे मुल्य हे त्यांच्या वजनावरुन ठरवले जाई. जसे शिवराई 11-13 ग्राम ची मानल्यास अर्धी शिवराई 6-7 ग्राम आणि पाव शिवराई 3-4 ग्राम वजनाची होते. त्याखालच्या वजनाची म्हणजे 1-3 ग्राम वजनाचीहि नाणी उपलब्ध आहेत. आज याठिकाणी आपण शिवाजी महाराजांची अर्धी शिवराई पहाणार आहोत.
शिवाजी महाराजांच्या एक पैसा शिवराई प्रमाणेच अर्धी शिवराई वर देखिल बिंदुमय वर्तुळात पुढिल बाजुनी तीन ओळीत- ‘श्री/राजा /शिव’ आणि मागील बाजुनी बिंदुमय वर्तुळात दोन ओळीत ‘छत्र/पति’ असाच मजकुर आढळतो. सादर केलेल्या नाण्याचे वजन 6.20 ग्राम असुन धातु तांबे आहे. शिवकाळात तांब्याच्या विविध परिमाणाच्या नाण्यांसाठीचे विविध उल्लेख उपलब्ध आहेत. जसे ससगणी, सिवराई, सापिका, तिरुका, पैसा, एका, दाम, अडका, जितल इ. या तांब्याच्या नाण्यांबद्दलची, त्यांच्या परिमाणांबद्दलची, कोष्टकांबद्दलची अधिक आणि सविस्तर माहिती आपल्याला ‘स्वराज्याचे चलन’ पुस्तकात मिळेलच.
आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….