शिवराई भाग ५
‘स्वराज्याचे चलन’ सदराचा आजचा पाचवा दिवस. काल सादर केलेल्या शिवराई वरील ‘सिव’ मजकुर आपण पाहिला. र्हस्व आणि दिर्घ अशा दोन मात्रा आपल्याकडे असतात आणि हि विविधता आपल्याला नाण्यांवर देखिल दिसते. आज सादर केलेल्या नाण्यावर दिर्घ ‘सीव’ अंकीत आहे. अशीच विविधता ‘पति’ या शब्दा बाबतहि दिसते, आतापर्यंत सादर नाण्यांवर जरी ती दिसली नसली तरी पुढे नाण्यांवर आपल्याला ती पहायला मिळेलच तेव्हा आपण त्याकडेही लक्ष ठेवा. शिवराई वरील या विविधतेबद्दल एक तर्क अभ्यासक लावतात आणि तो म्हणजे शिवराई विविध ठिकाणी पाडल्यामुळे, तेथिल बोलीभाषेच्या प्रभावामुळे नाण्यावर ह्रस्व, दिर्घ प्रकार आपल्याला पहायला मिळतात.
आपण यापुर्वी पाहिलेल्या नाण्यांवरील मजकुर अत्यंत व्यवस्थितपणे नाण्यावर अंकीत होता. पण आता यापुढील नाण्यांवरील बरिचशी अक्षरे आपल्याला नाण्याबाहेर गेलेली दिसतील. ‘सिव’, ‘सीव’ अंकीत नाण्यांवर ‘श्री/ राजा/ सिव’ किंवा ‘श्री/ राजा/ सीव’ असा पुर्ण मजकुर येण जरा कठिणच आहे. हि नाणी डाय स्ट्रक पद्धतीने (या पद्धतीने नाणी कशी बनवली जात हे पुन्हा कधितरी नक्की सांगेन) बनवलेली असल्याने आणि काही वेळी नाण्याचा flan लहान असल्याने अक्षरे बाहेर जातात. माझ्या वैयक्तिक संग्राहात 55- 60 हुन अधिक सीव लिहिलेली नाणी आहेत पण आज हेच नाणं सादर करतोय कारण या नाण्याचा flan लहान असुनहि यावर पुढील बाजुनी ‘श्री/ राजा/ सीव’ आणि मागीळ बाजुनी ‘छत्र/ पति’ असा पुर्ण मजकुर आलेला आहे. नाण्यावर कुठेही बिंदुमय वर्तुळ दिसत नाही.
नाण्याचे वजन 10.1 ग्राम असुन धातु तांबे आहे. अशी सीव लिहिलेली नाणी विविध वजनात, विविध अक्षरवळनासह आढळलेली आहेत तसेच नाण्यांवर विविध चिन्हे देखिल पहायला मिळतात ती सविस्तर पुढे पाहुच पण याच नाण्याचं निरिक्षण केल्यास मागील बाजुवरील छत्र च्या वर गोल आणि त्याच्या डाव्या बाजुला डायमंड मार्क सारखे चिन्ह पहायला मिळते आहे. पुढे आपण विविध अक्षरवळने, चिन्ह आणि मजकुर असलेल्या शिवराई पाहुयातच.
आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….