शिवराई भाग ७…
बिंदुमय वर्तुळातील शिवराई, अर्धी शिवराई तसेच शिवराई वरील ‘शिव, शीव, सिव, सीव’ हे सर्व आपण आतापर्यंत पाहिले. आता पुढील शिवराई आपण पहाणार आहोत ती शाहु महाराजांच्या नावाची. आपल्याला 30 दिवसात जास्तीत जास्त चांगल्या शिवराई दाखवायच्या आहेत, संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या नाण्यांवर मी आधीच माझ्या ब्लॉग वर लेख लिहीलाय म्हणुन ते आता रिपीट न करता पुढील शिवराई पाहु (संभाजी आणि राजाराम महाराजांच्या नाण्यांवरील लेखाच्या लिंक खाली देतो), नाणी संग्राहक शाउ, साव, शाव मजकुर असलेल्या शिवराई शाहु महाराजांच्या मानतात. आतापर्यंत आपण पहात असलेल्या शिवराई एक दांडी आहेत, पुढे शिवराईंवर श्री खाली दोन दांड्या येनं सुरु झालं त्या नाण्यांना दुदांडी शिवराई म्हणतात ती ही पुढे पाहुच.
सादर शिवराई वर पुढील बाजुनी ‘श्री/ राजा/ शाव’ अंकीत असुन मागील बाजुवर ‘छत्र/ पति‘ अंकीत आहे. नाणे तांब्याचे असुन वजन 8.83 ग्राम आहे. शाउ, साव, शाव लिहीलेली नाणी एक दांडी प्रकारात तसेच दोन दांडी प्रकारातही येतात, एक दांडी प्रकारातील नाणी त्यांच्या बनावट, वजन, अक्षरवळन वरुन सुरुवातीची असाव्या आणि दुदांडी प्रकारातील नाणी नंतरच्या शाहुंच्या असाव्या असा अंदाज अभ्यासक मांडतात, पण याला कुठलाही पुरावा नाही. शाव अंकीत असलेली नाणी फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. बहुदा या नाण्यांवरील लेख हा बाहेर गेलेला असतो. असे आहे हे शाव लिहिलेले नाणे.