सदाशिव पेठेतील – श्री चिमण्या गणपती!
सदाशिव पेठेतला ‘निंबाळकर तालीम चौक’ सर्वांच्याच परिचयाचा आहे. या चौकाच्या पुढच्याच चौकात एक विघ्नहर्ता विराजमान झालेला आहे. त्यांचे नाव ‘चिमण्या गणपती‘. या गणेशामुळे चौकालाही तेच नाव मिळालं आहे.
मंदिराचा इतिहास फार परिचित नाही. श्री पटवर्धन यांनी श्री. द्रवीड यांच्याकडून हे मंदिर व परिसर दि. ०७ मार्च १९१९ ला विकत घेतले अशी माहिती उपलब्ध आहे. म्हणजे या गणेशाचे स्थान १०० वर्षांपूर्वीचे आहे हे निश्चित!. या ठिकाणी, देवापुढे तांदूळ टिपण्यासाठी खूप चिमण्या जमत असत, म्हणून त्याला ‘चिमण्या गणपती’ हे नाव पडले असं म्हणलं जातं.
चौकात हे स्थान शोधणं काही अवघड नाही. एका इमारतीच्या तळमजल्यावर हा बाप्पा आहे. मराठा शैलीतील कमानीमुळे हे स्थान चटकन लक्षात येतं. शेजारी फलकही आहे. गणेशोत्सवात याच नावाने इथे गणेश मंडळाचा मांडव पडतो, तेव्हा भाविकांची मोठी गर्दी होते.
मंदिराला गाभारा नाही का सभामंडप नाही. रस्त्यावरुनच मूर्तीचे दर्शन घ्यावं लागतं. मूर्ती शेंदूरचर्चित असून सुमारे ३ फूट उंच आहे. गणेशाला अंगचाच मुकुट असून, मागे चांदीची प्रभावळ आहे.
© वारसा प्रसारक मंडळी.