महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,627

श्री केशवराज मंदिर, आसूद | Shree Keshavraj Temple, Asud

Views: 1659
2 Min Read

श्री केशवराज मंदिर, आसूद –

दापोली तालुक्यातील आसूद गावात एक पांडवकालीन श्री विष्णूंचे मंदिर आहे. ते अंदाजे ४५०० ते ५००० वर्ष जुने आहे. श्री केशवराज देवस्थान या नावाने ते पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, पाच पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आहे.(Shree Keshavraj Temple, Asud)

मंदिरात जाण्यासाठी दाबकेवाडीतून एक रस्ता जातो. त्याच्या दुतर्फा घरे आणि भरपूर झाडे-झुडपे आहे. रस्त्यात जागोजागी गावकरी कोकणचा रानमेवा विकताना दिसतात. पुढे काही अंतर गेल्यावर लागणाऱ्या दगडी पायऱ्या उतरून खाली गेल्यावर एक छोटासा ओढा लागतो. तो पार करून गेल्यावर आपल्याला परत दगडात कोरलेल्या सुंदर पायऱ्या दिसतात. त्या चढून वर गेल्यावर आपण मंदिराच्या सपाटीवर पोचतो. मंदिरात जाण्यासाठी एका छोट्या तटबंदीवजा कुंपणातून वाकून आत जावे लागते. छोटेखानी मंदिर दगडी बांधणीचे आहे.

मंदिरासमोर ऐसपैस असलेला सभामंडप लाकडी खांबांवर उभा आहे. मंदिरासमोर असलेल्या गोमुखातून सतत बाराही महिने जिवंत झऱ्याचे निर्मळ आणि थंड पाणी वाहत असते. ते पाणी टेकडीवर असणाऱ्या एका आंब्याच्या झाडाच्या बुंध्यातून बाहेर येते. सभामंडप आणि गाभारा यांच्या मध्ये अंतराळ आहे. त्यात नक्षीदार कमानी असलेले कोनाडे आहेत. गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीवर डाव्या बाजूला मारुती आणि उजव्या बाजूला गरुडाची मूर्ती कोरलेली आहे. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेशपट्टी आहे. गाभाऱ्यामध्ये श्रीदेव केशवराज (लक्ष्मीकांत) यांची काळया पाषाणाची तीन – साडेतीन फूट उंचीची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात असणारी आयुधे शंख, चक्र, पद्म, गदा या क्रमात आहे. गाभाऱ्यात सोवळ्याने किंवा ओलेत्याने जाता येते.

मंदिरात श्री केशवराजांची दररोज महाभिषेक करून धोतर आणि उपरणे नेसवून यथासांग पूजा केली जाते. महानैवेद्य अर्पण केला आहे आणि नंतर महाआरती होते. श्रींच्या गाभाऱ्यात अखंडपणे बाराही महिने दोन समया तेवत असतात. श्री केशवराज देवस्थान हे आगरकर, आघारकर, बिवलकर, दातार, दांडेकर, देवधर, दीक्षित, ढमढेरे, दारशेतकर, भट, गांगल, राजवाडे, मेहंदळे, परांजपे, ठोसर, कोकणे, गोळे, भाटवडेकर, मायदेव, सबनीस, वैद्य आणि  जोशी अशा २२ घराण्यांचे कुलदैवत आहे. या मंदिराची पिढीजात व्यवस्था देपोलकर कुटुंबाकडे आहे. सध्या त्यांची १४ वी पिढी या मंदिराची व्यवस्था पाहत आहे.

संदर्भ:
श्रीदेव केशवराज देवस्थान
फोटो – सुधीर दाबके

पत्ता :
https://goo.gl/maps/kDvb4TQFwtgfLdAe9

आठवणी इतिहासाच्या FB Page

Leave a Comment