संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी, आळंदी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या भुमीचे वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माउलींच्या समाधीबरोबरच येथे असणारे विविध मठ, मंदिरे या मुळे या तीर्थस्थानाला एक वेगळेच पावित्र्य लाभले आहे. ज्ञानेश्वरांची समाधी हे आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
संजीवन समाधी मंदिर : आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे संजीवन समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर बांधण्यात आले.
हैबतबाबा पायरी : हैबतबाबा हे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे फ़ार मोठे भक्त. पंढरपूर येथे जशी नामदेवांची पायरी तशी आळंदी येथे हैबतबाबांची पायरी.
श्री सिद्धेश्वर : हे शिवलिंग फ़ार प्राचीन आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पुर्वी आळंदी प्रसिध्द होती ती सिद्धेश्वरामुळे.
सुवर्ण पिंपळ : सुवर्ण पिंपळ वृक्ष देऊळवाड्यात फ़ार पुरातनकाळापासून उभा आहे. श्री.ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर,आळंदी येथे प्रवेश केल्यानंतर उजव्याबाजूला पिंपळाचे झाड आहे त्याला “सुवर्ण पिंपळ” असे संबोधले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मातोश्री यांनी या प्राचीन पिंपळास सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या होत्या.
अजानवृक्ष : हा वृक्ष पवित्र समजला जातो. या वृक्षाची छाया दॆऊळवाड्यात शतकानुशतके पडली आहॆ. याची मुळी समाधीस्थानात श्री ज्ञानदेवांच्या कंठास लागली आणि श्री एकनाथ महाराजांना दृष्टांत होऊन त्यांनी ती दूर केली अशी आख्यायिका आहे. येथे भाविक श्री ज्ञानेश्वरीची अखंड पारायणे करतात.
श्री एकनाथ पार : श्री ज्ञानेश्वरांच्या मंदिरात असलेल्या श्री केसरीनाथ मंदिरासमोरचा हा एकनाथ पार फार जुना होता. १९७६ साली चिंचवडचे ज्ञानेश्वर भक्त श्री. जगन्नाथ गणपती गावडे यांनी स्वखर्चाने पुन्हा बांधून संस्थानला अर्पण केला. या पारावर नाथांच्या पादुका बसविण्यात आल्या आहेत.
पुंडलिकांचे देऊळ : पुंडलिकांचे देऊळ पुण्यातील एक सावकार चिंतामण विठ्ठल माळ्वतकर यांनी १८५७ साली बांधले. हे मंदिर इंद्रायणी नदीच्या पात्रात आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चालविलेली भिंत : चांगदेव वाघावर बसून
आले. हातात सर्पाचा चाबूक होता. त्यांचा गर्वपरिहार करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज व त्याची भावंडे या भिंतीवर बसून त्यांना सामोरे गेले व त्यांना उपदेश केला.
आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी साधारण २४५ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti