इथे रडायला बंदी आहे !!!
श्री क्षेत्रपाल, सिंधुदुर्ग.
अनेक निसर्गचमत्कार आणि गूढ कथांनी भारलेला प्रदेश म्हणजे कोकण. जसजसे आपण याच्या अंतरंगात शिरतो, तसतशा इथल्या अनेक चमत्कारिक गोष्टींचे आपल्याला दर्शन होते. काही समजतात, काही आश्चर्यचकित करतात. इथल्या माणसांच्या देवाप्रति अपरंपार श्रद्धा आहेत. विविध उत्सवांच्या वेळी त्या दिसून येतातच. कोकणात ‘राखणदार’ हा शब्द अत्यंत आदराने आणि श्रद्धेने उच्चारला जातो. राखणदार, ठिकाणदार, महापुरुष, क्षेत्रपाल या इथल्या अत्यंत प्रबळ देवता. त्यांचा आदेश, त्यांचे नियम हे अतिशय कडक आणि अर्थातच कोकणी माणसाकडून त्याचे पालनही तितक्याच कसोशीने केले जाते.
अशीच ही एक कथा क्षेत्रपालाची. निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीपासून १३ कि. मी. वर असलेल्या ‘श्रावण’ या गावची. या गावाला आहे एक छोटीशी तळेवाडी…गावापासून जेमतेम २ कि.मी. वर डोंगराच्या कुशीत वसलेली. तळेवाडीत आहे सत्ता क्षेत्रपालाची. या देवतेचे मंदिर अत्यंत रमणीय ठिकाणी. सर्व बाजूंनी हिरव्याकच्च डोंगरांचा गराडा. आजूबाजूला मुबलक शेती आणि मधोमध वसले आहे श्रीक्षेत्रपालाचे मंदिर. देवळात जायला शेतातून वाट…पुढे दगडी पाखाडी…मंदिरात एक शिवपिंड, काही वीरगळ आणि बारा-पाच संप्रदायाचे काही दगड. तळेवाडीत संध्याकाळनंतर कुणालाही रडायला परवानगी नाही. मोठा आवाजही करायचा नाही. आरडाओरडा अजिबात नाही. जो काही आवाज होईल तो घरातल्या घरात. श्रीक्षेत्रपालाला संध्याकाळनंतर कुणीही रडलेले चालत नाही. कुणाच्या घरात काही दुर्घटना घडली तरीही सूर्योदयापर्यंत शांतता राखायला हवी. अगदीच असह्य झाले तर गावाच्या वेशीबाहेर जाऊन रडायचे. तसेच इथे कुठल्याही प्राण्याचे रक्त सांडलेले क्षेत्रपालाला चालत नाही. त्यामुळे तळेवाडीत मास मटण करत नाहीत. जे करायचे ते गावाच्या हद्दीबाहेर जाऊन करायचे. इथे पशु-पक्ष्यांचा मोठा वावर असतो, पण क्षेत्रपालाची जरब एवढी की त्यांचा कुणालाही त्रास होत नाही आणि कुणी माणसानेही त्यांना त्रास द्यायचा नाही. नाहीतर क्षेत्रपालाचा कोप न परवडणारा..!
सगळा परिसर शेतीने हिरवागार झालेला. अजून एक निसर्गचमत्कार इथे बघायला मिळतो. श्रीक्षेत्रपालाच्या देवळाशेजारी एक मोठे तळे आहे. देवाचेच तळे हे…कितीही महामूर पाऊस झाला तरी ते भरत नाही. मात्र जसजसा उन्हाळा वाढू लागतो तसतसे तळ्याचे पाणी वाढत जाऊन ओसंडून वाहायला लागते. इतके वाहते की तळेवाडीतले लोक त्या पाण्यावर उन्हाळ्यात शेती करतात. परत पावसाळा येऊ लागला की हे पाणी कमी होत जाते. सगळेच खरेतर विपरीत. पण हीच तर कोकणाची खासियत आहे. जे इतरत्र कुठेही बघायला मिळणार नाही ते इथे कोकणात दिसते. निसर्ग, देवळे-रावळे, सण-उत्सव, देवदेवता या सगळ्याच बाबतीत कोकण हा एक खजिना आहे. हा खजिना गूढ आहे…अनाकलनीय आहे….आश्चर्यचकित करणारा आहे. तरीही इथल्या कोकणी माणसाच्या आपल्या देवरच्या श्रद्धा अपार आहेत. हेच तर कोकणचे वैशिष्ट्य आहे. पुन्हापुन्हा आपली पावले कोकणाकडे वळवण्याची ताकद याच श्रद्धांमध्ये वसलेली आहे. असे कित्येक महापुरुष, राखणदार, क्षेत्रपाल गावोगावी वसलेले असतील. असेच कधीतरी अकस्मात त्यांचे दर्शन होईल.
या गावाची अजून एक खासियत आहे….तूर्तास एवढेच…बाकीचा इतिहास पुन्हा केव्हातरी…!!!
श्री क्षेत्रपाल, सिंधुदुर्ग.
-आशुतोष बापट