श्री मयुरेश्वरांची दिनचर्या –
श्रीक्षेत्र मोरगाव येथे भगवान श्री मयुरेश्वर मंदिरात श्री मयुरेश्वरांची दिनचर्या पहाटे पाच वाजता सुरू होते.
श्री मूषकांच्या वर असणार्या नगारखान्यात सनई चौघडा वादन होते. त्या मंगलध्वनी मध्ये मुख्य द्वाराचे उद्घाटन झाल्यानंतर भगवान श्री मयुरेश्वर पुनश्च एकदा भक्त कल्याणार्थ सिद्ध होतात. भूपाळ्यांच्या मंगल निनादात भगवान श्री मयुरेश्वरांचा जागर झाल्यानंतर गुरव मंडळींतर्फे प्रथम पूजा संपन्न होते.
त्यानंतर सकाळी सात वाजता श्री क्षेत्रोपाध्यायांच्या द्वारे पूजा संपन्न होते. सकाळच्या या पूजेच्या वेळी भगवान श्री मयुरेश्वरांना मुगाची खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो. यावेळी उपयोगात येणारी सर्व चांदीची उपकरणे श्रीमंत पेशवे तथा कुरुंदवाडकर संस्थानातर्फे श्री चरणी अर्पण करण्यात आलेली आहेत. दुपारी बारा वाजता चिंचवड देवस्थान संस्थानातर्फे श्री मयुरेश्वराची पूजा संपन्न होते. यावेळी मोरयाला संपूर्ण स्वयंपाकाचा महानैवेद्य अर्पण केला जातो.
दुपारी तीन वाजता गुरव मंडळींच्या द्वारे श्री मोरयाच्या जामदारखान्यात असणाऱ्या वस्त्र तथा दागिन्यांच्याद्वारे श्री मोरया तथा देवी सिद्धी-बुद्धींची पोशाख पूजा केली जाते. हिंदुहृदय सम्राट छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेला मुकुट तथा श्रीमंत बाजीरावसाहेब पेशवे यांनी अर्पण केलेली पगडी विशेष महत्त्वाच्या प्रसंगी घातली जाते.
रात्री साडेआठ वाजता पुनश्च गुरव घराण्यातर्फे आरती केली जाते. यावेळी गोसावी घराण्याच्या आरत्या म्हणण्याची पद्धत आहे. या आरतीनंतर मोरयाला दुधभाताचा नैवेद्य दाखवितात. या प्रसंगी श्री चंद्रज्योती गुरव रचित आरती गायली जाते. महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज रचित आरती व पदेही गायली जातात.
रात्री दहा वाजता शेजारती होऊन भगवान निद्राधीन होतात. मग देवळाची दारे बंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजताच ती उघडली जातात.