श्री प्रताप शस्त्रागार –
शस्त्रांच्या दुनियेतील अद्भुत ग्रंथराज असं ज्याचं वर्णन करता येईल असं अत्यंत दुर्मिळ पुस्तक श्री प्रताप शस्त्रागार.
बडोदा संस्थानचे अधिपती सेनाखासखेल श्रीमंत महाराजा प्रतापसिंह गायकवाड यांनी पुरातन शस्त्रास्त्रे यांचं संग्रहालय बडोद्यातील आपल्या लक्ष्मीविलास पॅलेस राजवाड्यात करवून घेतलं. व त्या प्रत्येक शस्त्रांची इत्थंभूत माहिती, रेकॉर्ड, त्याची सफाई, जपणूक यासाठीची लिखित माहिती संकलित करून पुस्तकरूपी ती कायम राहावी म्हणून महाराजांनी प्रो. माणिकराव यांना आज्ञा केली. व संस्थानचे खासगी कारभारी राजमान्य राजश्री दमाजीराव विठ्ठलराव गायकवाड यांनी ते प्रकाशित केलं.
यामध्ये माणिकरावांनी वैदिक काळापासून विकसित होत गेलेली शस्त्र त्यांचा उपयोग, प्रकार, गुणधर्म या प्रत्येक बाबी अगदी सखोल अभ्यासून त्या प्रत्येक शस्त्रांचा त्यांच्या विविध अंगाचा समावेश त्यांनी पुस्तकात केलाय. शस्त्र हा क्षत्रियांच्या मनगटात शोभून दिसणारा पवित्र दागिना आहे. शस्त्र ही लक्ष्मी आहे जिच्या सहवासाने संपत्ती, सौख्य नांदते.
शेवटच्या प्रकरणात तलवार या शस्त्रावर अधिक लक्ष केंद्रित केलंय. तलवारीच्या पाती, मुठी, विविध अंगे त्यांचे उपप्रकार, म्यान, म्यानिंचे प्रकार, नक्षीकाम करताना घ्यावयाची काळजी. तलवारीची साफसफाई, जपणूक कशी करावी याची अगदी बारीकसारीक माहिती या पुस्तकात मांडली आहे. मध्ये मध्ये काही पानांवर शस्त्र आणि त्यांच्याविषयीचे उत्तमोत्तम, वीरश्रीयुक्त श्लोक अंगावर रोमांच उठवतात. धर्माचं रक्षण करायचे असेल तर खडग हाती घ्यावंच लागतं.
इंग्रजांनी जेव्हा भारतातील शस्त्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामागे आपला इतिहासही पुसण्याचा त्यांचा प्रयत्न होता जेणेकरून पुढील पिढीने आपला गौरवशाली रक्तरंजित इतिहास विसरून जावा. त्यासाठी त्यांनी अनेक शस्त्र नष्ट केली. पण या पुस्तकरूपाने का होईना ती शस्त्र आणि त्यांची इत्थंभूत माहिती आपल्याला मिळते. सध्या हे पुस्तक अतिशय दुर्मिळ असं आहे.
– रोहित पेरे पाटील
© इतिहासवेड
A very very commendable and applaudable ABHIYAAN, all the best wishes
जय शिवराय दादा श्री प्रताप शस्त्रागार पुस्तक मिळवता येईल काय..?