श्री राजा शिव आणि शंभु छत्रपति!!
तसे बरेच दिवस झाले हे नाणे संग्रहातून दाखवेन म्हणतोय पण योग काही येत नव्हता! आज पूजेतून या तिन्ही दुर्मिळ स्वराज्याच्या मुद्रा एकदा नजरेखालून घातल्या. त्यांचे वजन केले. तसेच या नाणी क्षेत्रातील अनेक निष्णात मित्रांना पुन्हा विचारणा केली. खूपच अनमोल माहिती समोर आली. मनापासून ही सर्व माहिती आपणासमोर प्रदर्शित करायची इच्छा झाली.(श्री राजा शिव आणि शंभु छत्रपति !!)
शक्यतो छत्रपति शिवाजी महाराज यांचे नाणे ज्याला आपण “शिवराई” असे संबोधितो. ती १०-११ ग्राम वजनाच्या आसपास असते. पण या खालील छायाचित्रात जी शिवराई आहे तिचे वजन हे १२ ग्राम च्या ही वर आहे. संपुर्ण बिंदूयुक्त असलेली ही शिवराई छत्रपति शिवरायांनी किल्ले रायगड इथे टाकसाळी मध्ये छापलेली आहे. यावर पुढील बाजूस “छत्रपति” आणि मागील बाजूला “श्री राजा शिव” असे लिहिलेले आढळते.
तसेच छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपति श्री संभाजी महाराज यांनीही याच प्रकारात किल्ले रायगडावर त्यांचे स्वतःचे नाणे छापले. ज्यावर पुढील बाजूला “छत्रपति” आणि मागील बाजूस “श्री राजा शंभु” असे लिहिलेले आढळते.मात्र इतकी ठळक आणि जास्त वजनाचे ,अर्थातच १२ ग्रामच्या वर वजन असलेले नाणे मात्र खूपच दुर्मिळ आहे.यास काही “शंभुराई” असे संबोधले जाते.
तिसरे नाणे आहे ते मात्र खूपच वेगळ्या प्रकारात आढळते. प्रामाणिकपणे सांगायचे तर हा प्रकार मी स्वतः पहिल्यांदाच पाहतो आहे. यावर असलेले “छत्रपति” आणि ” श्री राजा शंभु” मात्र पहिल्या नाण्यापेक्षा अगदी पातळ अक्षरे स्वरूपात जाणवते!! कदाचित हे पन्हाळा इथे समाधी असलेल्या दुसरे संभाजी महाराज यांच्याही काळातील असू शकेल. याचे वजन मात्र १०.८३ ग्राम च्या आसपास आढळते.
गेले कित्येक वर्षे हाताखालून कित्येक नाणी हाताळण्यात आली. कित्येक शंभुराई बघितल्या. पण या तिसऱ्या आणि वेगळ्या धाटणीची शंभुराई संग्रहात असण्याचे भाग्य काही औरच!!
असेच अभ्यास करत राहावे आणि आपले ज्ञान वाढवत राहावे हाच या पोस्ट मागील उद्देश!! त्या निमित्ताने म्हणा पण।स्वराज्याच्या या दुर्मिळ नाण्यांची मला जी काही माहिती आहे, ती आपणासमोर थोडी का होईना . पण देण्याची संधी भेटली याहून दुसरे ते भाग्य कोणते ?
बहुत काय लिहिणे? आपला स्नेह असाच कायम राहोत हीच प्रार्थना!!
@ किरण शेलार.