महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,00,079

चाफळ व चाफळचे श्रीराम मंदिर

Views: 11742
10 Min Read

चाफळ व चाफळचे श्रीराम मंदिर :

चाफळ हे सातारा जिल्ह्याच्या पाटण या तालुक्यातील एक राजकीय दृष्ट्या महत्वाचे गाव आहे. हे मांड नदीच्या उत्तर तीरावर वसले आहे. याच्या चारही बाजूंनी सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. समर्थ रामदासांच्या जीवनकार्यात चाफळचे फार मोठे महत्त्व आहे. चाफेश्वर महादेव नावाचे मंदीर गावात असल्याने गावाला चाफळ हे नाव पडले असे म्हंटले जाते. लहानमोठ्या 45 गावे, वाड्या, वस्त्याचे हे एक मुख्य बाजारपेठेचे केंद्र आहे. चाफळ गावची लोकसंख्या सुमारे २९७८ इतकी आहे (२०११ च्या जनगणनेनुसार) पुरुष व स्त्रियांची संख्या अनुक्रमे १४८० व १४९८ इतकी असून स्त्रीपुरुष साक्षरता ८२ टक्के आहे. चाफळ हे नैसर्गिक रित्या खुप सुंदर गाव आहे व संपूर्ण. रामदास स्वामींच्या वास्तव्याने ही भूमी पावन झालेली आहे. गावामध्ये जि.प. सातारा ची इयत्ता पहिली पासुन ते चौथी पर्यंत प्राथमिक शाळा आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री समर्थ विद्यामंदीर असुन येथे इयत्ता पाचवी ते बारावी (कला) पर्यंत शिक्षणाची सोय आहे.

चाफळची वैशिष्ट्ये :

समर्थ रामदासांनी महाबळेश्वरपासून कर्‍हाडपर्यंत मारुतीची अनेक मंदिरे उभी केली. रामदास स्वामींनी बांधलेले श्रीराम मंदिर चाफळला आहे. चाफळचे दास मारुती मंदिर व प्रताप मारुती मंदिर ही मारुती मंदीरं अकरा मारुती मंदिरांपैकी आहेत. ही मंदिरं गावकर्‍यांनी श्रमदानाने बांधली अहेत.

१) चाफळचे श्रीराम मंदिर :

समर्थांनी चाफळचे राममंदिर शके १५६९ (सन १६४८) मध्ये आपले शिष्य व गावकरी यांच्या मदतीने बांधले.  त्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांनी सहाय्य केले होते. समर्थांनी चाफळच्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली त्याबद्दलची आख्यायिका प्रचलित आहे. समर्थ रामदास यांना श्रीरामचंद्रांनी दृष्टांत दिला. त्यांनी त्यानुसार अंगापुरच्या डोहातू दोन मूर्ती बाहेर काढल्या. एक श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची. समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली.  पंचवटीचा राम अशा रीतीने कृष्णेच्या खोर्‍यात आला, आणि समर्थ संप्रदायाचे मुख्य मठाचे स्थान चाफळ हे ठरले.  अंगलाई देवीची मूर्ती सज्जनगडावर स्थापना करण्यात आली.  अंगापूरच्या ग्रामस्थांनी रामाची मूर्ती चाफळला नेण्यास विरोध केला होता. त्यावर समर्थांनी त्यांना ती मूर्ती घेऊन जाण्यास सुचवले. मात्र त्या गावक-यांनी ती मूर्ती जागची हलवता येईना. गावक-यांनी समर्थांकडे स्वत:ची चूक मान्य केली. चाफळ येथे त्या मूर्तीची स्थापना झाल्यापासून तेथे श्रीरामनवमीचा उत्सव अखंडीतपणे साजरा केला जात आहे.त्या उत्सवात अंगापुरच्या गावक-यांना सासन काठ्यांचा मान देण्यात आला आहे.

समर्थांनी बांधलेले मंदिर त्यांच्या पश्चात मोडकळीस आले. त्या मंदिरास डिसेंबर १९६७ मध्ये झालेल्या कोयना भूकंपामुळे भेगा पडल्या.  १९७२ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.  मंदिराच्या बांधकामात त्याची जुन्या पद्धतीची बांधणी कायम ठेवण्यात आली.  चाफळ येथील मंदिर काळ्या दगडी चौथ-यावर उभे आहे. त्याचा आकार तारकाकृती आहे. मंदिराशेजारी मजबूत दगडी तटबंदी असून तिला चार बुरुज आहेत. मंदिराच्या जुन्या बांधकामांपैकी महाद्वार आणि पाय-या हे भाग शाबूत आहेत. मंदिरावर पाच शिखरे असून सर्वात उंच शिखरावर सुवर्णकलश व तांब्याचा ध्वज आहे. त्या मंदिराच्या बांधकामात कोठेही लोखंड वापरलेले नाही. मंदिराच्या पाय-या चढून आत जाताना विष्णूच्या दशवतारांची शिल्पे नजरेस पडतात. मंदिरात प्रवेश करताना दोन बाजूंस दोन खांब दिसतात. त्यापैकी उजव्या खांबावर मत्स्य, कूर्म, वराह व नरसिंह या अवतारांची शिल्पे कोरलेली आहेत. तर डाव्या खांबावर वामन, परशुराम, बौद्ध, व कलंकी यांच्या मूर्ती आहेत. उर्वरीत दोन दोन अवतार मागील बाजूस भिंतीवर कोरलेले आढळतात.

मंदिराच्या गाभा-यात संगमरवरी सिंहासनावर राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. त्यापैकी श्रीरामाची मूर्ती मध्यभागी चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. ती मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतरत्र रामाची मूर्ती धनुर्धारी अवस्थेत असते. चाफळच्या मंदिरातील रामाच्या हातात कमळाची फुले आहे. मूळ मूर्तीच्या शेजारी खालील बाजूस समर्थ रामदास व हनुमान यांच्या छोट्या संगमरवरी मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कोनाड्यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती आढळतात.

दास मारुती मंदिर व प्रताप मारुती मंदिर :

श्रीरामांसमोर नम्र हनुमंताची मूर्ती असली पाहिजे म्हणून समर्थांनी सुंदर दगडी मंदिर बांधून त्यात दास मारुतीची स्थापना केली. ही मूर्ती सुमारे ६ फूट उंचीची आहे. चेहऱ्र्‍यावर अत्यंत विनम्र भाव, समोर असलेल्या प्रभू श्रीरामाच्या चरणावर विसावलेले नेत्र, अशी ही मूर्ती आहे. ह्या मारुतीसाठी बांधलेले मंदिर सुमारे सव्वातीनशे वर्षांनंतरही चांगल्या स्थितीत आहे. १९६७ च्या भूकंपातसुद्धा या मंदिरास धक्का लागला नाही किवा तडा गेला नाही. समर्थ रामदास यांनी बनवलेली दास मारुतीची मूर्ती अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी आहे चाफळचे हे मंदिर पर्यटकांना आणि भक्तांना आकर्षित करणारी आहे

राममंदिराच्या मागे उंचवट्यावर ‘प्रताप मारुती’चे मंदिर आहे. त्यास भीममारूती किंवा वीरमारूती अशा नावांनी ओळखले जाते. त्या मंदिराचे शिखर पन्नास फूट उंच आहे. शिखराचे शिल्पकाम आकर्षक आहे. त्या मारूतीची उंची सात ते आठ फूट असावी. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत. कमरेभोवती सुवर्णाची कासोटी व तिला घंट्या आहेत. ती मूर्ती नेटकी व सडपातळ आहे. रामदास समर्थांनी ‘भीमरूपी महारूद्रा’ या स्तोत्रात त्या मूर्तीचे वर्णन केले आहे.

मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. त्याच्या आवारात समर्थांची ध्यानगुंफा आणि समर्थांचे अस्थीवृंदावन आहे. मंदिर परिसरात सभागृह, समर्थांची पंचधातूची मूर्ती, उत्तर व दक्षिण बाजूला विस्तीर्ण तट, म्हसोबा मंदिर, नरसोबा मंदिर, रामरथ मंदिर व महारुद्र स्वामी समाधी मंदिर या वास्तूदेखील आहेत.

चाफळचे राम मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्या मंदिरांची देखरेख ‘श्रीराम देवस्थान ट्रस्ट’मार्फत केली जाते. ट्रस्टकडून भाविकांसाठी तसेच मुलांवर संस्कार घडवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तेथे दर्शनासाठी जाणा-या भाविकांची जवळच असलेल्या मठामध्ये राहण्याची व्यवस्था होते.

दुपारच्या वेळेस या मंदिरांमध्ये येणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद स्वरुपात भोजन दिले. जाते दुपारची आरती नियमित असते. रामदासी संप्रदायाचे सेवक या ठिकाणी अतिशय नम्रतापूर्वक मंदिराची सेवा करतात. उपासनेला याठिकाणी विशेष महत्त्व दिले जाते.

२)  रामघळ :

चाफळच्या राममंदिराच्या पश्चिमेकडील डोंगरावर एक घळी आहे. त्या घळीत समर्थ रामदास यांचे वास्तव्य होते. ती घळ ‘रामघळ’ या नावाने ओळखली जाते. त्या घळीतून राममंदिराचे दर्शन होते. म्हणूनच समर्थांनी म्हटले आहे, की…

“दास डोंगरी राहतो,

यात्रा रामाची पाहतो।

देव भक्तासवे जातो, ध्यान रुपे।।”

उंच डोंगर कपारीत चाफळपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर रामघळ (रामघळ-कुबडीतीर्थ) आहे. ही घळ समर्थ रामदासांनी स्वत: बनवली असल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे.उंच महाकाय डोंगराच्या कड्यात निसर्गसौंदर्यात रामघळ वसले आहे.

तीर्थक्षेत्र रामघळ या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतामार्इंच्या मूर्तीसह वसंतगड येथील जनार्दन महाराजांची सुंदरशी प्रतिकृती बसविण्यात आलीआहे. येथून जवळच हाकेच्या अंतरावर असलेल्या सडादाढोली गावचेग्रामस्थ व देवस्थान ट्रस्ट्र येथे समर्थ रामदास स्वामी व जर्नादन महाराजांच्या

पुण्य भेटीचा सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात साजरा केलाजातो.

समर्थ येथे श्रीरामाचा जप करत ध्यानस्त बसू लागले. म्हणून या घळीला रामघळ असे संबोधले जाते. या रामघळीपासून १ कि.मी. अंतरावर कुबडीतीर्थ पाण्याचा झरा आहे. या तीर्थाबाबत असे सांगितले जाते कि , श्री समर्थ रामघळ येथे जात असताना तहानलेल्या समर्थांना पाण्याची आवश्यकता भासू लागली. आसपास कोठेही पाणी दिसेना म्हणून समर्थांनी हातातील जप कुबडी श्री रामाचे नाव घेऊन जमिनीवर मारली. त्याठिकाणी अपोआप पाणी वाहू लागले. ते पाणी आजही ३५० वर्षानंतर १२ महिने वाहत आहे.

३) शिंगणवाडीचा मारुती :

शिंगणवाडी येथे सुध्दा समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापलेले मारुतीचे देऊळ आहे. चाफळपासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. येथील प्रशस्त गुहेत समर्थ रामदास स्वामी संध्या करावयास जात असत. म्हणूनच समर्थांनी आपल्या आराध्यदेवतेची सुबक अशी लहानशी मूर्ती बनवून या टेकडीवर तिची स्थापना केली.

छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामींची ऐतिहासिक भेट ही इथल्या मठालगत असलेल्या वृक्षाखाली झाली असे काही अभ्यासकांचे मत आहे.

शिंगणवाडीच्या मारुतीस ‘खडीचा मारुती’ किंवा ‘बालमारुती’ असेही म्हणतात. सुमारे ६ फूट लांब-रुंद असणार्‍या गाभार्‍यात साडेतीन फूट उंचीची मूर्ती आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या हातात ध्वजा आहे. तर उजवा हात उगारलेला आहे. मंदिराच्या आजुबाजूचा परिसर हा आल्हाददायक व पवित्र वातावरणाचा आहे.

मंदिर उंचावर असून मंदिराला तांबडा रंग दिलेला आहे. मंदिर हे चाफळच्या परिसरातून कुठूनही दिसते. चाफळपासून हा मारुती थोड्या अंतरावर असल्यामुळे याला चाफळचा तिसरा मारुती असेही म्हणतात.

चाफळच्या श्रीराम देवस्थानकडून या मंदिराची पूजा केली जाते. चाफळच्या दोन मारुतींचे व श्रीरामाचे दर्शन घेतल्यावर या शिंगणवाडीच्या मारुतीचे दर्शन घेतल्याशिवाय भाविक परत जात नाहीत.

शिंगणवाडी येथे समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम भेट घडली होती. त्या ऐतिहासिक घटनेप्रित्यर्थ तेथे स्मारक बांधण्यात आले आहे.

४)  चाफेश्वर महादेव मंदिर :

तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिरास पर्यटनस्थळाचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने चाफळ गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आपणास आजमितिस पाहावयास मिळत आहे. मात्र चाफळ या नावामागची कहाणी काही वेगळीच आहे. येथील उत्तरमांड नदीपात्रामध्ये साधारणत: १२०० वर्षांपूर्वीचे एक हेमाडपंथी बांधकाम केलेले पुरातन महादेव मंदिर आहे. या महादेव मंदिरास पूर्वी चाफेश्वर मंदिर म्हणून ओळखले जायचे. त्याकाळी या मंदिराच्या परिसरात ४५ ब्राह्मण व काही मराठी कुटुंबे वास्तव्य करत होती. यातील शहाणे कुटुंबीय या मंदिराची देखभाल करत होते. मात्र आश्चर्य वाटेल की, या ४५ कुटुंबाच्या वस्तीस स्वत:चे असे नावच नव्हते. कालांतराने येथील चाफेश्वर मंदिरामुळे या वस्तीस चाफळ म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही हे मंदिर सुस्थित असून, ते शिवकालीन इतिहासाची दिमाखात साक्ष देत आहे. चाफळ येथील माजगावमध्ये हे चाफेश्वर मंदिर आहे.

चाफळचे ग्रामदैवत श्री नांदलाईदेवी आहे. महाराष्ट्रकवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचे चाफळ हे मूळ गाव होय.

Pic  – Ravi Jadhav     Info – Yogesh Bhorkar 

1 Comment