शिलालेख असलेली श्री रामचंद्र बारव –
पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे शिलालेख असलेली बारव (पायऱ्या असलेली विहीर) आपणास पहावयास मिळते. ग्रामस्थांनी ही श्री रामचंद्र बारव जतन केली असुन बारवेत उतरण्यासाठी उत्तरेकडुन पायरी मार्ग बनविण्यात आला असुन आठ,दहा पाय-या उतरून गेले की समोरच आपणास दक्षिणेस एक मोठी देवळी निदर्शनास पडते. या देवळीत नदी, शिवपिंडी तसेच गणेश शिल्प पहावयास मिळते तसेच याच देवळीच्या पुर्व, दक्षिण व पश्चिमेस पुन्हा छोटेसे कोनाडे असून दक्षिण कोनाड्यात गणेशाचे शिल्प विराजमान असलेले पहावयास मिळते . येथेच उजव्या बाजूला वळण घेत पुर्व पश्चिम पायरी मार्ग निदर्शनास पडतो व या ठिकाणी एक कमान पहावयास मिळते. येथेच डाव्या हाताला एक भिंतीत देवनागरी लिपीत अक्षरे शिलालेखात कोरलेला असून त्यामध्ये
Il श्री रामचंद्र II
ही बराव समस्त गावकरी लोकांनी शके १८४० बांधली असा मजकूर
या ठिकाणी असून ही बारव लोकसहभागातून बांधलेली असून ती शके १८४० म्हणजेच १९१८ साली बांधून लोकार्पण करण्यात आलेली आहे. पुढे पुन्हा दक्षिण व उत्तर भिंतीत छोटेसे कोनाडे असून पुर्व भिंतीत समोर एक कोनाडा आहे. हा पायरी मार्ग आपणास बारवेतील पाण्यापर्यंत पोहचवितो. बारवेच्या पश्र्चिमेस श्रीराम मंदिर व मारूती मंदिराचे बांधकाम केलेले असुन ऐतिहासिक सुन्दर घडीव दगडाच्या तोडीतील मंदिर ग्रामस्थांनी उध्वस्त करुन गावच्या ऐतिहासिक वारसेचा उत्कृष्ट नमुना संपविला आहे. हे सर्व दगडी ढिगा-याच्या स्वरुपात पिंपळाच्या झाडाखाली व जवळपास विखूरलेले निदर्शनास पडतात. येथेच पश्चिमेला असलेल्या आरोग्य केंद्राच्या परीसरात एक चुन्याच्या घाण्याचे चाक व पाणी साठवण्यासाठी असलेली दगडी डोनी पहावयास मिळते. या ऐतिहासिक मंदिरात असलेली जुनी शिल्पे शोधण्याचा प्रयत्न केला असता ती परीसर आढळून येत नाही. याचा अर्थ ही शिल्पे कुठेतरी पाण्यात विसर्जन केली असावीत. कदाचित ही शिल्पे पुन्हा शोधून ती संवर्धीत करण्यात आली तर गावचा इतिहास पुन्हा या माध्यमातून टिकून राहण्यासाठी नक्कीच मदत होईल.
गावाचे नाव पिंपळगाव असुन या मंदिर परीसरात एकच पिंपळाचा वृक्ष असुन या पिंपळाखाली दोन विरघळी शिल्पे निदर्शनास पडतात. याचा अर्थ विरांचा ऐतिहासिक वारसा या गावाला नक्कीच लाभलेला असावा. अतिशय महत्त्वाचे गजलक्ष्मी शिल्प बारवेच्या उत्तरेला भंगलेल्या स्वरुपात असुन हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा या गावाचा असावा हे ते सांगत आहे. त्या शिल्पाचे ग्रामस्थांनी सन्मानाने संवर्धन व जतन करण्यासाठी योगदान दिले पाहिजे ताकी गावचा इतिहास सदैव उजेडात व डोळ्यांसमोर राहील एवढं मात्र नक्कीच.
छायाचित्र / लेख – रमेश खरमाळे, माजी सैनिक