महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,422

श्री सखी राज्ञी जयती

Views: 11038
14 Min Read

श्री सखी राज्ञी जयती

अस म्हणतात की एखादा महापराक्रमी योद्धा हा लाखात एक असतो, पण त्याची पत्नी नक्कीच दहा लाखात एक असते. तिचं हृदय कशाचं असत हे तिलाच ठाऊक.श्री सखी राज्ञी जयती.

रणरागिणी, कणखरता म्हणजे काय असते ह्याचे ज्वलंत उदाहरण, सोज्वळ, रूपवान, जेवढी कठोर तितकीच हळवी, प्रेमळ, निर्णयक्षम, सहनशीलतेचा महामेरू, स्वराज्याच्या एका धगधगत्या निखाऱ्याला सदैव फुलता ठेवणारी, एका वादळाला कायम समजून घेणारी, धीर देणारी, प्रत्येक संकटात खंबीरपणे सोबत असलेली, लखलखती तलवारच जणू, छत्रपतींच्या क्षत्रियकुलवंत घरातील पहिली सून, एका रुद्राची राज्ञी, एका छाव्याची पत्नी, जणू सर्वांस दुसरी जिजाऊच भासणारी, स्वराज्यासाठी निस्सीम त्याग अन स्वार्थ बाजूला ठेऊन स्वराज्यहित जोपासणारी, श्री सखी राज्ञी जयती असलेल्या महाराणी येसूबाईसाहेब….. किती किती विशेषणे वापरावीत त्यांच्याबद्दल तेवढी कमीच आहेत.

महाराणी येसूबाई म्हणजेच राजमाता जिजाऊंच्या नंतर मराठा इतिहासातील सर्वात कणखर असं व्यक्तिमत्त्व. आपल्या दुर्दैवाने त्यांना इतिहासात तेवढं मानाचे स्थान द्यायला इतिहास कमी पडला. पुरुषप्रधान इतिहास लेखनाच्या प्रवाहात त्यांचे कार्य, कर्तृत्व, समर्पण अन त्याग हे त्यामानाने खूपच दुर्लक्षित राहिले गेले.

खर तर शंभूराजे हे लहानपासूनच पेटता निखाराच होते, एक रुद्रच जणू. संभाजी नावाचा हा पेटता निखारा सांभाळायची जबाबदारी येसुंवरती होती. त्यांना हा पेटता निखारा पदरात सांभाळायचा होता. पदर सुद्धा जळू द्यायचा नव्हता अन निखारा सुद्धा विझू द्यायचा नव्हता. पण ही जोखीम त्यांनी आयुष्यभर लीलया पेलली अशा कणखर येसूबाई.

येसूबाईंचा जन्म दाभोळ प्रांतातील शिर्के घराण्यात अंदाजे १६५९ च्या जवळपास झाला. शिर्के घराणे हे त्याकाळी त्या प्रांताचे देशमुख होते. येसूबाईंच्या वडिलांचे नाव हे पिलाजीराव शिर्के होते तर येसूबाईंचे लहानपणीचे नाव हे राजसबाई म्हणजेच राजाऊ असे ठेवले होते. त्यावेळी पिलाजीराव स्वराज्यात नव्हते. शिवरायांनी शिर्क्यांवर स्वारी केली व दाभोळ प्रांत स्वराज्यास जोडला. अन त्याच वेळी शिर्के स्वराज्यात सामील झाले. अन ही मैत्रीची गाठ अजून मजबूत करत शिवरायांनी आपले पुत्र, स्वराज्याचे युवराज संभाजीराजांचे अन राजाऊंचे लग्न लावून दिले. त्याच वेळी गणोजी शिर्के म्हणजे येसूबाईंचे सख्खे बंधू व संभाजीराजांच्या बहीण राजकुवर बाई यांचा विवाह देखील लावून दिला राजांनी अन हे साटेलोटे घडवून आणले. ही दोन्ही लग्ने साधारणपणे १६६३ ते १६६४ च्या दरम्यान झाली असावीत. शिवरायांकडून देखील त्या अनेक राजनीतीचे डावपेच अगदी जवळून शिकल्या.

संभाजीराजे शिवरायांच्या सोबत आग्ऱ्याला गेले, त्यावेळी ते औरंग्याच्या हातावर तुरी देऊन निसटले, पण संभाजीराजांना त्यांनी मथुरेतच ठेवले अन राजकारण म्हणून संभाजीराजांचे निधन झाल्याची आवई शिवरायांनी त्यावेळी उठवली. तो हृदयद्रावक प्रसंग अन वयाच्या सातव्या वर्षी अस विधवेपण. त्या  कोवळ्या मनाला काय यातना झाल्या असतील याची आपण कल्पनाच करू शकत नाही.

शिवरायांचा राज्यभिषेक झाला अन स्वराज्याच्या इतिहासातील पहिल्या युवराज्ञी म्हणून त्यांना मान मिळाला. अन त्यांच्या धैर्याची जणू कसोटीच चालू झाली.
शिवरायांच्या राज्यभिषेकानंतर १० दिवसातच माँसाहेब जिजाऊंचे निधन झाले, आणि स्वराज्यातील शिक्केकट्यार रिक्त झाली.
सोयराबाईना डावलून शिवरायांनी शिक्केकट्यार युवराज्ञी येसूबाईंकडे सुपूर्द केली व त्यांना स्वराज्याच्या कुलमुखत्यार म्हणून नेमले.
येसूबाईंनी कुलमुखत्यार पदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत निष्पक्षपणे व खूपच उत्तमरीत्या सांभाळली.

१६७८ च्या नंतर संभाजीराजे हे शिवरायांच्या सांगण्यावरून दिलेरखानास जाऊन मिळाले पण याची कोणालाही कल्पना नव्हती. सगळीकडे हेच पसरले की स्वराज्याचा युवराज मुघलांना मिळाला वगैरे वगैरे आवया उठवल्या अन काही मंत्र्यांनी वैयक्तिक महत्वकांक्षेसाठी यात अजूनच तेल ओतण्याचे काम केले. येसूबाईंना सुद्धा बापलेकाच्या या काव्याची काही कल्पना नव्हती. आता स्वतःचा पती, दस्तुरखुद्द भावी छत्रपती हा शत्रूच्या गोटात जातो ही गोष्ट म्हणजे येसूबाईंवर खूपच मोठा आघात होता. आणि ह्या गोष्टीपासूनच गृहकलहास सुरुवात झाली.
या गोष्टीमुळे त्यांना नाहीनही ते ऐकून घ्यावे लागले. या सगळ्या गोष्टींचा त्यांना किती मानसिक त्रास झाला असेल याची कल्पना करणे खूपच अवघड.

त्यानंतर संभाजीराजे हे मसूद खानाच्या मदतीने परत स्वराज्यात दाखल झाले. त्यांची व शिवरायांची मसूद-माले या गावी भेट झाली व त्यानंतर काही दिवसातच शिवरायांचं निधन झालं.

शिवरायांच्या निधनानंतर रायगडावरील सर्व सूत्रे सोयराबाईंनी आपल्या हातात घेतली. अन त्यातच अण्णाजी दत्तो अन इतर मंत्र्यांनी सोयराबाईंना भीती दाखवून म्हणजेच सपशेल ब्लॅकमेल करून राजाराम महाराजांना गादीवर बसवायचा घाट घातला.
काळ मोठा बिकट होता, स्वतःच्याच घरात, श्रीमान रायगडावर कैदी असल्यासारखी भावना येसूबाईंच्या मनात त्यावेळी आली असेल. असा अनुभव किती त्रासदायक असू शकेल हे तर आपण नक्कीच समजू शकतो.

येसूबाई पराकोटीच्या संयमी होत्या अन शंभूराजांच्या पराक्रमावर त्यांचा अफाट विश्वास होता.

संभाजीराजे छत्रपती झाल्यानंतर इ.स. १६८१ नंतर बहुतेक सर्वच लढायांत संभाजीराजे आघाडीवर होते,
त्यामुळे त्यांची सारखीच धावपळ चालू होती.
त्यामुळे त्यांनी सर्व मुलकी कारभार आपल्या पत्नी, स्वराज्याच्या महाराणी येसूबाई यांच्याकडे सोपवला होता. त्यासाठी त्यांना एक स्वतःचा शिक्का देखील तयार करवून दिला होता तो आपल्याला खूप सहा पत्रांवर आढळेल. संभाजीराजांच्या अनुपस्थितीत महाराणी अत्यंत जबाबदारीने सर्व राज्यकारभार जातीने सांभाळत होत्या.

गो. स. सरदेसाई संभाजीराजे अन येसूबाईंबद्दल लिहतात- ‘इतका तिच्या कर्तृत्वावर त्याचा विश्वास होता की राज्यातील कोणताही हुकूम येसूबाईच्या नजरेखालून गेल्याशिवाय सुटत नसे.
यावरून येसूबाई कामाच्या अन कारभाराच्या बाबतीत किती दक्ष असतील याचा आपल्याला अंदाज येतो.

इतकेच नव्हे तर सर्व राजपत्रे देण्याची तसेच राज्यव्यवस्थेचे जरूर ते हुकूम काढण्याची त्यांना परवानगी होती.
हे हुकूम जरी संभाजीराजांच्या नावाने निघत असले तरी त्यात ‘आज्ञा‘ या शब्दाऐवजी ‘राजाज्ञा‘ अशी शब्दयोजना होत असे. एवढेच नव्हे तर संभाजीराजांनी येसूबाईंना स्वतःचा शिक्काही बनवून दिला होता. त्या तो शिक्का कोलनामा, अभयपत्रे वगैरेंवर वापरत असत. हा शिक्का असा-
श्री सखी राज्ञी जयती।
तसेच त्यांच्या पत्राची सुरुवात अशी होती-
ई कोलनामे सौभाग्यवती राजश्री बाईसाहेब दामदौलतहु…….’
संभाजीराजांनी आपल्या पत्नीच्या या कौशल्यावर पूर्ण विश्वास ठेवून अंतर्गत व्यवस्थेचा राज्यकारभार सुद्धा त्यांच्याकडेच सोपवला होता.
राजधानीत संभाजीराजांच्या अनुपस्थितीत सर्व गुप्त बातम्या राखणे, गुन्हेगारांची वासलात लावणे, राजधानीवरून महत्वाचे आदेश अन निर्णय देणे इत्यादी महत्वाची कामे त्यांना करावी लागत असत.
पुढे संभाजी राजानंतर शाहू लहान व औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांच्या सप्तहजारी मोकाशाचा कारभार येसुंनी ‘येसूबाई वालीदा ई साहू राजा’ या शिक्क्याने केला.

कारस्थानी मंत्र्यांना देहांतची शिक्षा सूनावल्यानंतर पुन्हा संभाजीराजांच्या गैरहजेरीत रायगडावर येसूबाईंनी कधीच कोणतेही कारस्थान शिजू दिले नाही.

त्यांचे दीर म्हणजेच संभाजीराजांचे सावत्र बंधू राजाराम महाराज यांचा सोयराबाईंच्या मृत्यूनंतर येसूबाईंनी खूप ममतेने सांभाळ केला. त्यांना नेहमीच एका पुत्रासारखं वागवले. राजाराम राजांच्या डोक्यात कोणी काही चुकीच भरवू नये म्हणून त्यांनी राजाराम राजांचा बाहेरील लोकांशी जास्त संबंध येऊ दिला नाही.

येसूबाईंच्या जीवनात खरा कसोटीचा प्रसंग आला तो ज्यावेळी स्वराज्याचा छावा हा मुकर्रबखानाच्या तावडीत सापडला. काही स्वकीयांच्या फितुरीने संगमेश्वराच्या वेशीवर संभाजीराजांना कैद केले गेले. आणि त्यांना अपमान करत पेडगावच्या बहादूरगडावर नेले गेले. राजांना सोडवण्याचा विचार त्यांनी केला पण त्यासाठी औरंगजेब स्वराज्य मागत होता. असंख्य मावळ्यांच्या बलीदानातून उभे राहिलेले स्वराज्य घालवून आपला जीव वाचवणे हे संभाजीराजांना सुद्धा मान्य नव्हते. औरंगजेब हर एक कोशीश करत होता संभाजी राजांना झुकवण्याची, स्वराज्य गिळंकृत करण्याची. वेगवेगळी प्रलोभने दाखवत होता, पण राजा बादला नाही. तेव्हा त्या हरामी औरंग्या शंभुराजांचे हाल करू लागला, त्यांना शारीरिक त्रास देऊ लागला, त्यांचे डोळे काढले, जीभ छाटली, चामडी सोलली. हेरांकडून जेव्हा ह्या खबरा महाराणी येसूबाईंना रायगडावर समजल्या असतील तेव्हा किती मरणयातना झाल्या असतील त्यांच्या मनाला. स्वराज्याचे सौभाग्यच तेव्हा मुघलांच्या कळपात अडकले होते, त्या सप्त नद्या अन सागराच्या जलाने अभिषिक्त अशा राजाची अशी घोर विटंबना चाललेली ऐकून किती वेदना झाल्या असतील येसूबाईंना…? कशा धीराने सामोऱ्या गेल्या असतील त्या, काय असेल ते धैर्य, काय असेल तो संयम, कशी असेल तेव्हा त्यांची सहनशीलता. आणि विशेष म्हणजे एवढं मोठं संकट आलं आल्यावर त्यांच्या जागी दुसरं कुणी असत तर केव्हाच मोडून पडलं असत, कोसळलं असत, ढासळल असत, तुटलं असत हो. पण त्यांनी स्वतःच मनोधैर्य ढासळू दिल नाही, स्वतःला सावरलं. विशेष म्हणजे त्यावेळी आधार द्यायला ना हंबीरमामा होते ना बहिर्जी नाईक, ना इतर कोणी वडीलधारी व्यक्ती. तरीही खचून न जाता, न डगमगता स्वराज्याचे हित डोळ्यासमोर ठेवून, स्वतःचा स्वार्थ डावलून त्यांनी जो निर्णय त्यावेळी घेतला तो मराठा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखाच होता. असा निर्णय कोणी खूपच महान व्यक्तीच घेऊ शकते.

संभाजी राजांच्या सुटकेचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरल्यानंतर स्वराज्याचे सिंहासन रिक्त झाले होते. नवीन राजा नेमण्याची जरूर होती. त्यावेळी येसूबाईंकडे दोन पर्याय होते. एक म्हणजे त्यांचा अल्पवयीन मुलगा, स्वराज्याचा अधिकृत वारस असलेले दुसरे शिवाजी म्हणजेच शाहू आणि दुसरा पर्याय म्हणजे त्यांचा दीर शिवपूत्र राजाराम राजे. स्वतःचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवला असता तर त्यांना राजधर्माप्रमाणे स्वतःच्या मुलाला गादीवर बसवून राजमाता होता आले असते. कोणत्याही सामान्य स्त्रीने स्वतःच्या मुलाच्या हिताचाच विचार केला असता. सर्व प्रधान अन मंत्र्यांना सुद्धा हेच वाटत होते की येसूबाईं आपल्या मुलाला गादीवर बसवत. पण त्यापुढे जे घडलं ते पाहुन सर्वांच्या नजरा विस्फारून गेल्या. येसूबाईंनी सर्वांशी मसलत करून राजाराम राजांना गादीवर बसवण्याचा निर्णय घेतला अन राजाराम राजांचे मंचकारोहण केले.

आपल्या पुत्रास “छत्रपती” न बनवता आपल्या दिरास राजाचे सिंहासन अर्पण करून येसूबाईंनी मराठ्यांच्या इतिहासात नि:स्वार्थीपणाचा व त्यागाचा एक आदर्श निर्माण केला.

येसूबाईंच्या मार्गदर्शनाखाली अन त्यांची निस्वार्थी भावना पाहून मराठा सैन्यात नवे तेज निर्माण झाले. अन स्वराज्य वाचवण्यासाठी हे सैन्य बाहेर पडणार तोच…

संभाजी महाराजांच्या हत्येनंतर वज्रघात व्हावा त्याप्रमाणे संकट त्यांच्यावर कोसळले. पण हे संकट इथेच संपले नाही. औरंगजेबाचा वजीर आसदखान, त्याचा पुत्र इतिकाद खानाने राजधानीलाच वेढा घातला. रायगडावर असणारे सर्व राजकुटूंबच कैद करण्याचा औरंगजेबाचा डाव होता. यावेळी रायगडावर येसूबाई, बाल शाहूराजे, राजाराम महाराज, ताराबाई आणि इतर परिवार होता.

त्यावेळी त्यांनी एकच विचार केला की स्वराज्य राखायचे असेल तर स्वराज्याचा छत्रपती सुरक्षित राहिला पाहिजे. आणि त्यावेळी शिवरायांची दूरदृष्टी असलेल्या वाघ दरवाजातून स्वराज्याच्या नव्या छत्रपतीला सुखरूप बाहेर काढून कर्नाटकात जिंजीला पाठवून त्यांनी पुढील धोका टाळला.

आता रायगडाला तर खानाचा वेढा होता, अन बाहेरील मदतीशिवाय गड लढवणे अवघड होते. तरीसुद्धा येसूबाईंनी तब्बल आठ महिने रायगड लढवला. परंतु शेवटी हतबल होऊन येसूबाईंनी रायगड खानाच्या ताब्यात दिला. स्वराज्याचे सोनेरी पान शत्रूच्या अधिपत्याखाली गेले. काय यातना झाल्या असतील त्यावेळी रायगडाला जेव्हा यवनाचे हिरवे निशाण गडावर फडकले असेल.

रायगड ताब्यात देताच येसूबाई पुढे आपल्या पुत्रासह मोगलांच्या कैदेत अडकल्या. औरंगजेबाने संभाजीराजांना अत्यंत क्रूरपणे ठार केले तरी त्याने येसूबाईंना व शाहूंना अत्यंत सन्मानाने वागवले. औरंगजेबाची मुलगी झिनतउंनीसा हिने मायलेकरांची खूप काळजी घेतली. शाहूंना तिने खूपच ममतेने वागवले.

पुढे १७०७ मध्ये औरंगजेबाचे निधन झाले अन त्याचा पुत्र आझमशहा हा आलमगीर झाला. तेव्हा त्याला झिनतऊंनीसा, राजपूत राजे यांनी शाहू व येसूबाईंना मुक्त करण्याबाबत अर्जी दिल्या गेल्या. तेव्हा त्याने शाहूंची मुक्तता केली. पण तेव्हा त्याने येसूबाईंना बंदी म्हणूनच ठेवले, जेणेकरून शाहूंनी दक्षिणेत जाऊन मुघलांवर आक्रमण करू नये. आपली नाही पण आपल्या पुत्राची तरी सुटका झाली याचे थोडे का होईना समाधान त्यांना भेटले.

पुढे शाहूंनी दक्षिणेत जाऊन मराठा सरदारांना आपल्याकडे वळवून ताराबाईंशी युद्ध पुकारले. १७०८ मध्ये खेडच्या लढाईत ताराबाईंचा पराभव करून शाहू मराठ्यांचे छत्रपती झाले.

छत्रपती झाल्यानंतर त्यांना आपल्या आईची याद येत होती पण त्यांना सोडवण्याइतके लष्करी सामर्थ्य त्यांच्याकडे नव्हते. परंतु ती संधी पूढे त्यांना १७१८ मध्ये चालून आली. दिल्लीचा बादशहा फरुखशियर च्या विरोधात शाहूंनी दक्षिणेकडील मोगल सुभेदार सय्यद हुसेनअली याला लष्करी मदत केली. सय्यद हुसेनअली याच्याबरोबर झालेल्या तहानुसार फरुखशयिर ला दिल्लीच्या तख्तावरून पदच्युत केल्यानंतर येसूबाईंची सुटका केली. ४ जुलै १७१९ रोजी येसूबाईं मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा येथे पोचल्या. हे समजताच शाहू महाराज अजिंक्यतारा वरून उतरून कितीतरी कोस त्यांच्या भेटीस गेले. तब्बल एक तपानंतर मायलेकरांची भेट झाली. मराठ्यांच्या इतिहासातील हे एक सुवर्णक्षण च म्हणावा लागेल.

येसूबाई स्वराज्यात दाखल झाल्या त्यावेळी त्यांचे वय ६० वर्ष होते.
त्यापुढे उर्वरित आयुष्य त्यांनी सुखाने अन समाधानाने घालवले. या वयातही त्यांनी अनेक सल्लामसलतीत शाहूंना मदत केली, दानधर्म केला, ईश्वराचे चिंतन केले.

जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या, गृहकलह तसेच राजकीय संघर्षात होरपळून निघालेल्या या मराठ्यांच्या दुर्दैवी महाराणी म्हणजे महाराणी येसूबाई.

पुढे इसवीसना १७३० साली महाराणी येसूबाईंचा मृत्यू झाला. माहुली संगमावर त्यांचे दहन केले गेले. तिथे त्यांचे स्मारक देखील बांधण्यात आले. शाहू नित्यनेमाने तिथे दर्शनास येत असत.

मराठा स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर करण्यात येसूबाईंची भूमिका सगळ्यात महत्त्वाची होती.

संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर येसूबाईं तब्बल २९ वर्ष, ८ महिने अन १९ दिवस मुघलांच्या कैदेत होत्या. एकटेपणाने कशी काढली असतील त्यांनी एवढी वर्ष.

माहेरावर फितुरीचा कलंक,
पतीची चाळीस दिवस अनन्वित अत्याचार करून दुर्दैवी हत्या अन स्वतः सलग तीस वर्षे औरंगजेबाच्या कैदेत.
एवढे दुःख तर द्रौपदीच्या वाट्याला सुद्धा आले नाही.
दुर्दैवाने हे आम्हाला कधी शिकवलेच नाही वा कोणी सांगितले नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

‘श्री सखी राज्ञी जयती’ महाराणी येसूबाईसाहेबांना माझं शत शत नमन. 🙏
त्यांचा त्याग अन अविरत संघर्ष इतिहास कधीही विसरू शकत नाही.

संदर्भ :-
१.मराठेशाहीचे अंतरंग- जयसिंगराव पवार
२.शिवपूत्र संभाजी-डॉ.कमल गोखले
३.छत्रपती संभाजी-वा. सी. बेंद्रे
४.शिवकालीन अन पेशवेकालीन स्त्री जीवन- शारदा देशमुख

©️®️-सोनू बालगुडे पाटील

Leave a Comment