महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,28,007

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक

By Discover Maharashtra Views: 2712 7 Min Read

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक –

श्राव शुद्ध पंचमी ( नागपंचमी ) शके १६०२, २० जुलै १६८० रोजी युवराज संभाजी महाराजांनी मंचकारोहण केले व मराठा साम्राज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली . ३० डिसेंबर १६८० रोजी संभाजी महाराजांनी स्वत:ची सुवर्णतुला करवून घेतली व त्यानंतर प्रतापगडी कुलस्वामिनी भवानीदेवीचे दर्शन घेतले. माघ शुद्ध सप्तमी , शके १६०२ रविवार १६ जानेवारी १६८१ शिवपुत्र शंभूराजे यांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर विधीपूर्वक संपन्न झाला छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. छत्रपती संभाजी महाराजांचा श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक समारंभ सोहळा पंचमी , सष्ठी आणि सप्तमी म्हणजे दिनांक १४ , १५ व १६ जानेवारी असे तीन दिवस चालला.

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन परमानंदकाव्यम् – अनुपुराण या संस्कृत काव्यामय ग्रंथात अलंकारिक भाषेत वर्णीलेला आहे. म्हल्लारराव रामराव चिटणीस यांच्या बखरीत देखील छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन आले आहे . तत्कालीन साधनांत किंवा कागदपत्रात राज्याभिषेकाचे वर्णन आढळून येत नाही. परंतु बखर व परमानंद काव्यातील अतिशयोक्ती वर्णन वजा केल्यास छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभाच्या सोहळ्याची कल्पना करता येऊ शकते.

परमानंदकाव्यम् – अनुपुराण :-

राजाच्या राज्याभिषेकाला रायगडावर प्रारंभ झाला. त्यावेळी स्वकार्य प्रवीण असे ब्राम्हण , क्षत्रिय , हजारो वैश्य आणि शुद्र मोठ्या संख्येने , तसेच विविध देशांतील वेश्या , नट , गायक , कुशल वादक, भट , शाहीर , बिरुदावली म्हणणारे , मृदुंग आणि वेणू वाजविणारे , मधुर गायक , आश्चर्यकारक अशा मोठ्या समुदायाने सह्याद्रीकडे सस्वर निघाले. प्रतीष्टीत वेषधारी विविध देशांतील राजे अगोदरपासुनच आसनस्थ झाले होते. मागध आणि सुत बिरुदावली म्हणत होते , वाद्य वाजत होती , नगाऱ्यांचा ध्वनी होता . गायक सुस्वर गीते म्हणत होते. अप्सरांप्रमाणे वेश्या कौशल्याने नृत्य करीत होत्या . सभामंडपामध्ये सत्कारासाठी देवांना उच्च स्वरात आवाहन केले जात होते, अग्नीला हवन केले जात होते आणि आता यथासांग विधिवत ग्राहमखाला आरंभ झाला. सपरिवार मातृका पूजन झाले.

कल्याणार्थ असुरांना दूर ठेवणारे मंत्र म्हटले जाऊ लागले. काहीजण ज्ञान आणि ज्ञेय याविषयी बोलत होते. काहीजण आत्मा-परमात्मा आणि जीवाशिवांचे ऐक्य यावर वाद घालून पांडित्य प्रदर्शन करीत होते. सुवर्णकुंभातून आणलेल्या गंगा-यमुना आणि सागर यांच्या पुण्यदायक जाळणे स्नान केले जात होते. आन्हिक उरकल्यावर नित्याप्रमाणे दानाचा उत्सव झाला. देवपूजा आटोपली . प्रेमपूर्वक गायींचे पुजन झाले. गुरुजी , माता व वडीलधारी मंडळी यांना नमस्कार केला. कुलदेवता श्रीमहादेवाचे स्मरण केले. सुंदर वस्त्रे धारण केली . नंदिश्राद्ध झाले , श्रद्धेने व्रत धारण केलेल्या , नाना रत्नालंकार घातलेल्या , सर्व शस्त्रांमुळे , तेजस्वी दिसणाऱ्या मध्यान्हीच्या सूर्याप्रमाणे तळपणाऱ्या , उत्साहपूर्ण आणि पुण्याहवाचन केलेल्या शंभूराजांना ब्राह्मणांनी वैदिक आणि पौराणीक आशीर्वादांचा घोष केला.

शके १६०२ च्या माघ शुक्ल पक्षात रथसप्तमीच्या मुख्य शुभमुहूर्तावर भीषण अशा तंत्रमार्गीय अनुष्ठानाने राजा शंभू ( शंकर आणि शिवाजी ) दोन्ही शिवांना शोभणाऱ्या निर्भय आणि सुकर अशा राजछत्राच्या तेजाने लखलखणाऱ्या राजसिंहासनावर विराजमान झाला.

उत्तम लक्षणांनी युक्त आणि दीक्षा घेतल्यामुळे सामर्थ्यवान अशा त्याला पुरोहीतांच्या स्त्रियांनी ओवाळले . आनंदाने ओसंडणाऱ्या नजरेने लोकांनी इकडेतिकडे न बघता थेट त्याचे दर्शन घेतले . सन्मानिलेल्या , सुवेषधारीणींनी पुजापात्रे हातात घेऊन सुंदर स्त्रियांनी त्याला कौतुकाने पहिले आणि त्यांना तो साक्षात विष्णूच भासला . आपल्या भव्य नेत्रांनी त्यांनी दरबाराकडेही कटाक्ष टाकला . ब्राम्हणासह समस्तांच्या मनोकामना पूर्ण होऊन महातेजस्वी शंभूराजाला अभिषेक केला. समंत्रक औषधी काढे दिल्यामुळे नद्यांच्या आणि सागराच्या जलाने अभिषेक झाल्यावर त्याचे शरीर अधिक शोभायमान झाले. इंद्राप्रमाणे विधिवत प्रीतिपूर्वक अभिषेक झाल्यावर तो आणखीनच प्रकाशमान झाला. अंत:पुरातील स्त्रिया त्याला अंत:करणपूर्वक भजू लागल्या.

काही नायिकांनी त्याला आपल्या मनात अतुच्य स्थान दिले. त्याने मंगलकारक रेशमी वस्त्रे परिधान केली होती. अंगावर तेज असल्यामुळे तो विस्मयकारक वाटत होता. केशरयुक्त त्रिपुंन्डामुळे त्याचा भालप्रदेश सुंदर दिसत होता. चंदनाचा शरीरावर लेप होता. फुलांच्या माळांनी तो अलंकृत झाला होता . सोन्यामुळे चकाकणाऱ्या त्याच्या जिरेटोपाने सर्व दिशा वेढून टाकल्या होत्या. शौर्याचे आश्रयस्थानच जणू असा तळपणारा तो दुसरा सूर्यच भासला . चिलखत ,ढाल, कृपाण आणि धनुष्य यामुळे सुवर्णाने घडविल्याप्रमाणे त्याचा मध्यभाग मनोहर दिसत होता. कोवळ्या सुर्य किरणांनप्रमाणे उत्तरीयामुळे तो शोभून दिसत होता. पांढरे राजछत्र त्याच्यावर होते. सुंदर चवऱ्यांनी त्याला वारा घातला जात होता. दोन्ही बाजूंना श्रेणीनुसार आसनस्थ झालेले राजेलोक हात जोडून स्तुती करीत त्याच्याकडे पहात होते.

मल्हार रामराव चिटणीस विरचित श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज :-

राज्याभिषेक करावा हा सिद्धांत करून माघ शुद्ध १० गुरुवार हा मुहूर्त ज्योतिषी यांचे विचारे सिद्धांत केला. सर्व संभार व साहित्य करण्याची आज्ञा केली. मंडपादि करविले. सुभेदार , मुजुमदार व जमिनीस जुमलेदार वैगरे सरदार व कारखानीस व सरकारकून यांजवर कृपा करून तैनाता जास्त करविल्या . आबदगीरे , पालख्या देऊन सर्वांचे समाधान केले. हरजी महाडिक व गणोजीराव शिर्के व अचळोजीराजे महाडिक व तुकोजी पालकर व महादजी निंबाळकर मेहुणे थोरले महाराजांचे व जोत्याजी केसरकर यांनी व त्रिंबक बाजी देशपांडे खासनीस यांणी व आणखी ममतेंतील यांणी महाराजांस विनंती करून बोलले का “ साहेब सिंहासनाधीश होणार आणि प्रधान यांचे घरी चौक्या , हे विहित नाही . याजवरून चौक्या उठविल्या. बाळाजी आवजी प्रभू चिटणीस यांणी आपले काम करावे असे सांगून कृपा केली.

प्रधान यांचे गुमास्ते व अमात्याचे वगैरे यांणी काम तूर्त करावे , अशी आज्ञा जाहली. आणि सेवा घेऊ लागले. येसाजी फरजंद व सोमाजी फरजंद वगैरे मराठे लोक सरदार आपले आपले पेशजी सेवा करीत आले. , तशा हवाला केल्या . माघ शुद्ध १० गुरुवार शके मजकुरी यांस राज्याभिषेक यथाविधी विनायकशांती व पुरंदरशांती होम करून , नंतर अभिषेक होऊन सिंहासनारूढ जाले. तोफा करविल्या . तो सूर्यदर्शन व्हावे तें अस्तमानपर्यंत अभ्र येऊन न जालें . सिंहासनावरून उठोन रथावर बसले. तेथून काळपुरुष मारावा म्हणून निघाले तों मार्गी रथ मोडला. तसेच जाऊन , काळपुरुष मारून , बाजाराचे बाहेर जाऊन , हत्तीवर स्वार होऊन मिरवत समारंभे करून महालांत आले. तेथून यज्ञशाला केली होती तेथे कबजीचे सांगण्यावरून सोने , रूपे, तांबे, पितळ , लोखंड , कापूस ,तेल ,मीठ, सुपारी, नारळ, गुळ , साखर अठरा धान्ये यांच्या तुळा केल्या .अष्टप्रधान यांचे सन्मान वस्त्रे , अलंकार देऊन ब्राम्हण तीस चाळीस हजार जाले त्यांस दक्षणा देऊन ब्राम्हणभोजन करविले . तेंव्हा दक्षिणेचे दाटीत काही ब्राम्हणही मेले. गुणी , गायक यांसही द्रव्य बहुत देऊन संतोषित केले. ते समयी अष्टप्रधान जाहले ते पूर्वी होते तेच. पेशवे मोरोपंत करून त्यांचे गुमास्ते उद्धव योगदेव व बहिरोपंत यांचे हातीं कारभार घेतला. वरकडांचे गुमास्ते यांचे हातीं कारभार घेतले. बहुमान ज्याचे त्यांस दिले व पाठविले.

संदर्भ :-.
मल्हार रामराव चिटणीस विरचित श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज
परमानंदकाव्यम् – अनुपुराण .
शिवपुत्र संभाजी :- डॉ. सौ. कमल गोखले

नागेश सावंत

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक,श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक.

Leave a Comment