बारामतीचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर –
महाराष्ट्रातील तालुका पातळीवरील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणजे बारामती. विकासाची नवी व्याख्या म्हणजे बारामती. “राजकिय पंढरी” म्हणजे बारामती. पुण्या खालोखाल “विद्येचे माहेरघर” म्हणुन ओळख निर्माण करणारी बारामती. गतकाळची “भिमथडी” आज सर्वत्र “बारामती” म्हणुन प्रसिद्ध आहे. बारामतीचे महत्त्व जेवढे आज आहे तेवढेच प्राचीन काळातही होते.बारामतीचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर.
कविवर्य मोरोपंत, श्रीधरस्वामींच्या वास्तव्याने तसेच अनेक साधुसंतांच्या पुण्यपावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बारामतीला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सिध्देश्वर मंदिर, काशिविश्वेश्वर मंदिर, श्रीमंत बाबुजी नाईक वाडा, सिध्दिविनायक मंदिर, (उजव्या सोंडेचा गणपती, या मंदिराचा नव्याने जिर्णोध्दार करण्यात आला आहे.) माळावरची देवी मंदिर, कविवर्य मोरोपंत यांचे घर (जे आता कविवर्य मोरोपंत स्मृतिस्थळ म्हणुन विकसित केले आहे.) या वास्तु पुर्वीच्या बारामतीचे वैभव अधोरेखित करतात. याच गतकाळतील ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारे “सिध्देश्वर मंदिर” आपल्या संस्कृती आणि परंपरांना सांभाळुन आजही दिमाखात उभे आहे. तब्बल आठशे वर्षाहुनही पुरातन असे हे शिवमंदिर हिंदु वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. एकाच कातळ दगडातील अखंड लिंग व अखंड नंदी हे या मंदिराचे वैशिष्टय आहे. माझ्या पाहण्यात अनेक शिवमंदिरे आहेत पण एवढा मोठा आणि अक्षरशः जीवंत वाटावा असा नंदी मला कुठेही पाहावयास मिळाला नाही.
आधी शहाजी महाराज, मग हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर छञपती शिवाजी महाराजांनी, नंतर धर्मवीर संभाजी महाराज, आणि पहिले बाजीराव पेशवे यांनी सिध्देश्वर मंदिराची व्यवस्था पाहिली. त्यानंतर पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मंदिराची व्यवस्था पांडुरंग दाते यांच्याकडे सोपविली. आजतागायत दाते कुटुंबीय सिध्देश्वर मंदिराची व्यवस्था पाहत आहे.
बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या सिध्देश्वर मंदिरात महाशिवराञी निमित्त पुर्ण सप्ताह भजन, प्रवचन, किर्तन असे कार्यक्रम होत असतात. वर्षभर शिवभक्तांनी गजबजलेले हे शिवमंदिर बारामतीचे भुषणावह असे श्रध्दास्थान आहे.
!! कैलासराणा शिवचंद्र मौळी, फणिंद्रमाथा मुकुटी झळाळी !!
!! कारुण्यसिंधु भवदुःख हारी, तुजविण शंभो मज कोण तारी !!
Rahul Hendre