महातीर्थराज श्रीआत्मतीर्थ, श्रीक्षेत्र पांचाळेश्वर, ता. गेवराई –
महाराष्ट्रात पैठणच्या पुढे सुमारे ३३ किमी दूर असलेले गोदावरी नदीच्या पात्रात श्रीआत्मतीर्थ स्थान आहे. या स्थानावर श्रीदत्तात्रेय प्रभू नित्याने येथे भोजनाला येतात. त्रेतायुगापासून आजपर्यंत या स्थानाचे मोठे महत्त्व असून महानुभाव पंथात या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे वर्षभर भाविकांची ये-जा असते, मार्गशीर्ष महिण्यात तर देशभरातील भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. मार्गशीर्ष मास आणि श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या अवतार दिनानिमित्त महातीर्थराज ‘श्रीआत्मतीर्थ’ (पांचाळेश्वर) स्थानाची माहीती असलेला हा लेख…
पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी मध्यान्ह काळी प्रभु। नित्याने करी भोजन सुरपती त्या आत्मतीर्थी विभु।
श्रीदत्तात्रेय प्रभू नित्यनियमाने मध्यान्ह काळी आरोगणेसाठी (भोजन) आत्मतीर्थ या स्थानी येतात. येथील गोदावरीच्या मध्यपात्रात अष्टकोणी असे भव्य मंदिर बांधण्यात आलेले आहे. येथे श्रीदत्तात्रेयप्रभू दररोज दुपारी प्रत्यक्ष भोजन स्वीकारण्यासाठी येतात, त्यामुळे या क्षेत्राचे महत्त्व वेगळेच असून एक इतिहासही आहे. त्रेतायुगात कुसुमावती नगरीत देवऋषी नावाचे ऋषी राहत होते. त्यांना आत्मऋषी नावाचा पुत्र होता. देवऋषीनी अतिशय भावपूर्वक उपासना केल्यामुळे श्रीदत्तात्रेयप्रभू प्रसन्न होऊन त्यांच्या घरी प्रगट झाले. देवऋषी श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या भजनपूजनात मग्न असताना त्यांचा शिष्य पांचाळराजा आपल्या गुरूंच्या भेटीला आला असता त्याला तेथे श्रीदत्तात्रेयप्रभूंचे दर्शन झाले. आपले गुरू आणि श्रीदत्तगुरूंची विनवणी करून श्रीदत्तात्रेय प्रभूंना आपल्या निवासस्थानी पांचाळेश्वरला आणले. राजसिंहासनी बसवून पूजन करून विनंती केली, “हे आर्तदानी भक्तवत्सला, माझी सगळी चिंता नष्ट करून माझा पुनर्जन्म चुकवावा.” यावर श्रीदत्तात्रेयप्रभू म्हणाले, ”आम्हांला तुमच्या हातून काही महत्त्वाचे कार्य करवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला चिरायू पद प्राप्त होईल. तोपर्यंत आपण राज्यपद सांभाळा.” असे म्हणून श्रीदत्तात्रेयप्रभू तिथून निघून गेले.
त्या काळात ऋषी पुलस्ती यांचे पुत्र कुंभ आणि निकुंभ यांनी उच्छाद मांडला होता. ते नगरांची नासधूस करत असत. त्यांची नासधूस बघून देवऋषींनी पांचाळेश्वराला जाऊन पांचाळराजाला म्हणाले की, “हे राजन, आपण या राक्षसबांधवांपासून मुक्ती द्या. पांचाळराजाने श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या आशीर्वादाने कुंभ-निकुंभाशी युद्ध करून त्यांचा वध केला. त्यामुळे सर्व ऋषीमुनी त्यांच्या आतंकापासून भयमुक्त झाले. परंतु, ते दोघे ऋषी पुलस्ती पुत्र असल्यामुळे आपण ब्रह्म-हत्या केली हा दोष राजा पांचाळेश्वराच्या मनात सलत होता. आत्मऋषींनी धाव घेत श्रीदत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न केले, पांचाळराजाने त्यांना प्रार्थना केली. “महाराज माझ्याकडून ब्रह्महत्या झाली आहे. मी पुलस्ती कुळाचा नाश केला आहे. आपण मला ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती द्यावी.”
महाराजांनी त्याला अभय देत म्हटले की, “राजा, आपण घाबरू नये, आम्ही आपणास या पापातून मुक्त करून अभय देऊ. यापूर्वी आपण पातळातून अग्रोदक काढावे.” राजा पांचाळराजाने बाण वेधून पाताळातून पाणी काढले. आत्मऋषींनी श्रीदत्त्तात्रेय प्रभुंचे चरणामृत पांचाळराजास दिले, ते पिऊन राजास ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्ती मिळाली. आत्मऋषींनी श्रीदत्तात्रेय प्रभूंना विनवणी केली, ”हे दयासागरा, आपण नित्यदिनी माध्यान्न काळी या आत्मतीर्थावर येऊन भोजन स्वीकारावे.” श्रीदत्तात्रेय प्रभूंनी ‘तथास्तु’ म्हणून विनंती स्वीकारली. तेव्हापासून आजतागायत श्रीदत्तात्रेय प्रभू दररोज भोजन करण्यासाठी येथे येतात.
*मध्यान्ह काळी क्षेत्र पांचाळपुरी। नित्यानी येतो प्रभु रवी स्थिर काळी।*
महानुभाव पंथ संस्थापक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी या स्थानाची महिमा अगाध असल्याचे भक्तगणांना सांगतात, याची माहिती ‘लीळाचरित्र’ या मराठीच्या आद्यग्रंथात आलेली आहे. येथे श्रीदत्तात्रेय प्रभू मध्यान्ह काळी साक्षात उपस्थित असल्यामुळे या स्थानाला चमत्कारिक स्थान म्हणून विशेष ओळख आहे. भक्तांचे सर्व दुःख दुर होऊन त्यांना आत्मिक समाधान मिळाल्याची अनेक उदाहरणे येथे पहावयास मिळतात. विशेष प्रसन्नतेचे स्थान असल्यामुळे आत्मतीर्थ स्थानाला पवित्र मानले आहे.
हरिहर पांडे, नागपूर