श्रीधर विष्णु –
मंदिरांच्या बाह्य भागातील देवकोष्टकांत कोणती देवता आहे त्यावरून आतील मूख्य मूर्तीबाबत अनुमान लावले जाते. श्रीधर विष्णु ही विष्णुची मूर्ती गुप्तेश्वर मंदिराच्या (धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) दक्षिणेला बाह्य भागातील देवकोष्टकांत स्थित आहे. उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात चक्र, डाव्या वरच्या हातात गदा आणि खालच्या हातात शंख असा क्रम आहे. या विष्णुला श्रीधर असे नामाभिधान आहे. या विष्णुची जी स्त्री शक्ती आहे तीला “मेधा” असे संबोधतात. अशी विष्णुची २४ नावे आणि त्यांच्या २४ शक्ती आहेत. या मूर्तीला मोजकेच पण रेखीव असे दागिने दाखवले आहेत.
जो पाय उभा आहे नेमके बरोबर त्याच बाजूला विष्णु जरा कललेला दाखवला आहे. दूसरा पाय दूमडलेला असून त्याचा तळवा आत वळवलेला आहे. खाली टेकलेल्या पायाची बोटंच फक्त जमिनीला स्पर्श करत आहेत. टाच अधर आहे. डौलदारपणा मूर्तीला प्राप्त झाला आहे. नसता शास्त्र सांगत आहे त्याप्रमाणे श्रीधर विष्णु म्हणजे पद्म चक्र गदा शंख दाखवलेकी काम संपले. पण इथे या डौलदारपणात शिल्पकाराची प्रतिभा दिसून येते. डावी मांडी मुडपलेली असल्याने त्या ठिकाणची गादी दबलेली आहे. उलट उजवा पाय खाली सोडला असल्याने त्याखालच्या गादीला उभार आहे. या बारकाव्यांतून कौशल्य दिसून येतो.
मूर्ती उभ्या स्वरूपात असेल तर तीला स्थानकमूर्ती म्हणतात. बसलेली असेल तर आसनस्थ म्हणतात. गर्भगृहातील जी मुख्य मूर्ती आहे ती केशव विष्णुची आहे. ही मूर्ती प्रत्यक्ष या मंदिरात नसून बाजूच्या मंदिरात आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या गाभार्यात सध्या महादेवाची पिंड आहे.
(छायाचित्र सौजन्य Arvind Shahane परभणी)
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद