महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,924

श्रीक्षेत्र कनाशी

Views: 4239
10 Min Read

श्रीक्षेत्र कनाशी –

महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. त्यांनी स्त्री पुरुष समानता, जातीभेद निर्मूलन, प्राणीमात्रांवर दया व मानवतेचा प्रचार-प्रसार केला. चक्रधर स्वामी पायी भ्रमण करीत असताना महाराष्ट्रात आले. मराठी भाषेला धर्मभाषा म्हणून त्यांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी आपला धर्म उपदेश मराठी भाषेतूनच केला. या राष्ट्राला ” महंत राष्ट्र ” म्हणून गौरविले.(श्रीक्षेत्र कनाशी)

स्वामिनी सत्य,अहिंसा, शांती, समता, बंधुता व मानवतेची शिकवण देत दीन दुःखितांचे दुःख निवारण करीत त्यांना सौख्य व शांतीचा मार्ग सांगितला. अनेक जिवांना आपले ज्ञान व प्रेम प्रदान केले. आपले विचार सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रचलित मराठी भाषेचा वापर केला. आपले तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी असंख्य दाखले देत महानुभव तत्वज्ञान सोपे केले. त्यांच्या दाखल्यांचा संग्रह लीळा चरित्र म्हणून म्हाइंभटांनी लिहून काढला.

बाराव्या शतकातील गद्य मराठी भाषेचा बोलता इतिहासच या ग्रंथाने उपलब्ध झाला. म्हणून या ग्रंथाला मराठी भाषेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. चक्रधर प्रभू भारत-भ्रमण करीत असताना ज्या ज्या ठिकाणी थांबले , त्यांनी विश्राम केला त्यात या स्थानांना महानुभाव संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जाते. त्या परिसरातील लोकांसाठी ते स्थान पवित्र तीर्थक्षेत्र तयार झाले. असेच एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे श्रीक्षेत्र कनाशी ! नवखंड पृथ्वी , दहावा खंड काशी, अकरावा कनाशी असे स्थान महात्म्य या परिसरातील नागरिक सांगतात.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव – पाचोरा या मार्गावर कजगाव पासून पाच किलोमीटर, नगरदेवळा स्टेशन पासून सात किलोमीटर तर भडगाव पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले गाव म्हणजे कनाशी. गावात यायला सगळीकडून पक्के रस्ते तयार करण्यात आले आहेत.

बाराव्या शतकात देवगिरी , कन्नड, सायगव्हाण, वाघळी मार्गाने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू कनाशी येथे आले. कनाशीत आगमन झाल्यावर श्री चक्रधर प्रभू प्रथम एका मळ्यात वृक्षाखाली आसनस्थ झाले .सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू च्या भेटीची ओढ लागलेले भक्तजन रामदेव, दादोस, एल्हाईसा, महदाईसा, उमाईसा, पद्मनाभी, सामकोस, गौराईसा,  इंद्रभट, सारंगपंडित, इत्यादी भक्तगण विदर्भातून आले होते. त्यांची येथे भेट झाली.

देव व भक्त यांच्या भेटीचे हे स्थान होय. याला चरणांकित स्थान म्हणून पवित्र मानले जाते. येथेच श्री चक्रधर प्रभूंनी एल्हाईसाचे साधा व सामकोचे मदळसा म्हणून नामकरण केले. इंद्रभटाला सुख स्वास्थ्यबद्दल विचारले. महदाइसा च्या दुपारचा पूजा अवसर व उपहार येथे स्वीकार केला. हेच स्थान आज नांदणी संस्थान म्हणून ओळखले जाते. येथील नांदणीच्या पाण्याने रोगराई व दुखहरण होतात म्हणून अनेक भक्तगण या स्थानाला भेट देऊन आपली गाऱ्हाणी सर्वज्ञ प्रभूंच्या चरणांकित स्थानी मांडू लागली. भक्तांचा ओघ वाढू लागला.

सतराव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जाऊ हरकूबाई होळकर यांनी या स्थानाचा जीर्णोद्धार केला. त्यांनी येथे प्रशस्त नांदणी म्हणजे पुष्करिणी बांधली. चारही बाजूंनी पक्क्या ताशीव पाषाणात या पाय बारावीचे बांधकाम करण्यात आले. 40 फूट खोली असलेल्या या नांदणीत उन्हाळ्यातही दहा फुटांपर्यंत पाणी असते. विविध प्रकारच्या बाधांनी ग्रस्त भक्तजन येथे स्नानासाठी येतात. येथे स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पिडांचे निवारण होते अशी त्यांची अगाध श्रद्धा आहे.(परंतु स्नान विधीनंतर ओली वस्त्रे तिथेच सोडून दिल्यामुळे नांदणी विद्रूप दिसते. येथे स्वच्छतेकडे लक्ष दिले तर नांदणीचे पावित्र्य जपता येईल.)

नांदणी संस्थानच्या विश्रांतीस्थानाला दंडवत प्रणाम करून भक्तजन आपली मनोकामना श्री प्रभूंच्या कानी घालतात. मनोरथ सिद्धीसाठी कोऱ्या कापडात नारळ बांधून येथे प्रभुंना साकडे घातले जाते. मनोरथ पूर्ती नंतर आपला नारळ सोडून श्री प्रभूंच्या चरणी अर्पण करण्याची प्रथा आजही येथे पाहायला मिळते. साधारणत पंचवीस वर्षांपूर्वी डोरीवालान करोलबाग सावली मुर्ती मंदिर ट्रस्ट दिल्ली यांनी नांदणी संस्थान मंदिराचा जीर्णोद्धार संपन्न केला.

सुरुवातीला श्री चक्रधर प्रभूंचे विश्रांतीस्थान मातीच्या ओट्याच्या स्वरूपात होते. कालांतराने त्यावर चुन्याचे लिंपण करून फरशी बसवण्यात आली. आज त्यावर तांब्याचा पत्रा मढवण्यात आला आहे. त्याबाहेर कठडा बसून सुशोभित करण्यात आले आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे आगमन मळ्यात झाले असे समजताच गावातील एका गरीब ब्राह्मणाने सर्वज्ञ यांना विनंती केली, व संध्याकाळी गावातील गढीवर आपल्या घरी मुक्काम करावा म्हणून प्रार्थना केली. श्री चक्रधर स्वामी गढीवर आले. ब्राह्मण परिवाराने स्वामींना उष्णोदकाने स्नान घातले. त्यांना चंदनाची उटी लावली.  सर्वज्ञांना तांबूल अर्पण केला व विश्रांतीसाठी बाज टाकली. ब्राह्मण परिवाराचे आतिथ्य बघून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी  वर मागण्यास सांगितला तेव्हा ”  सुने हाती ताक-भात मिळावा ”  असा त्यांनी वर मागितला. सर्वंज्ञांचा अनुग्रह झाला, व ब्राह्मण परिवारास सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त झाले.

ज्या जागेवर सर्वज्ञ मुक्कामाला थांबले, कालांतराने त्या गढीवर मंदिर बांधण्यात आले. तेच आज अस्तित्वात असलेले श्री कन्हैयालाल बाबा मंदिर होय!  परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांचा चरणस्पर्श या जागेला झाला ती सर्वज्ञ स्पर्शित जागा संप्रदायात पवित्र मानली जाते. चक्रधर प्रभूंनी वापरात आणलेल्या सर्वच वस्तू पुजा स्वरूपात मानल्या जातात. काष्ठ, पाषाण, धातू, केश, नख इत्यादींचा देखील त्यात समावेश होतो.

महानुभाव संप्रदायात चक्रधर प्रभू चरणस्पर्श  स्थानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच या संप्रदायात मानस पूजा देखील महत्त्वाची मानली जाते. या संप्रदायात श्रीमद्भगवद्गीता हा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पंचकृष्ण ही संकल्पना महानुभव संप्रदायात मानली जाते .त्यात श्री गोपालकृष्ण , श्री दत्तप्रभु, श्री चक्रधरपाणिप्रभु, गोविंदप्रभु  व सर्वज्ञ चक्रधरस्वामी या विभूतींना पंचकृष्ण म्हणून उपासना केली जाते.

कवीश्वर कुलाचार्य  महंत खामणीकर बाबा गादीचा मठ कनाशी येथे आहे. यांच्याकडे श्री गोविंद प्रभुची पवित्र दाढ प्रसाद म्हणून सुपूर्द करण्यात आली आहे. दर चैत्र पौर्णिमेला आठ दिवसांच्या यात्रोत्सवाचे येथे आयोजन केले जाते. चतुर्दशीला नवजात बालकांच्या जावळदान विधी चा कार्यक्रम केला जातो तर पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यासाठी केवळ परिसरातूनच नव्हे तर लांबून भाविक दरवर्षी हजेरी लावतात.

महानुभाव संप्रदायात तीन कुलपरंपरा महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यापैकी एक उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ महंत बिडकर बाबा रणाईचे , दोन कवीश्वर कुलाचार्य महंत खामणीकरबाबा कनाशी , तीन पारिमांडिल्य कुलाचार्य महंत लासुरकर बाबा , जाळीचा देव या तीन शाखा मुख्य आहेत. त्यापैकी कवीश्वर कुलाचार्य कुलपरंपरेत दर तीन वर्षांनी त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सवाचे आयोजन कनाशी येथे केले जाते. त्यासाठी थेट पंजाब, काश्मीर, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक इत्यादी राज्यातून महानुभव साधक उपासक एकत्र येतात. त्यांच्या संमेलनात समन्वय, सलोखा व तत्वज्ञान दृढीकरण यावर बळ दिले जाते.

आज श्रीक्षेत्र कनाशी येथील साधक आश्रमात दोनशेपेक्षा अधिक स्त्री-पुरुष साधक उपासना करतात. आश्रमाची संपूर्ण व्यवस्था महंत लांडगे बाबा चोखपणे सांभाळतात. वरील सर्व माहिती महंत लांडगे बाबा व भगिनी साधना खामणीकर व श्री सचिन पुजारी यांच्याशी झालेल्या चर्चेतून मिळाली.

श्री कन्हैयालाल बाबा मंदिराचा परिसर खूपच विस्तृत आहे. हे मंदिर गावाच्या मध्यभागी गढीवर असल्याने जमिनीपासून मंदिराची उंची 25 फूट आहे, तर कळसाची उंची 250 फूट आहे. मंदिराची लांबी सुमारे 130 फूट तर रुंदी 150 फुटांपर्यंत आहे. सभागृह व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडप सहा मुख्य खांब व बारा उपखांबावर उभारला आहे .गर्भगृह अष्टकोणी असून आठ खांबांचा आधार त्याला दिला आहे. हे मंदिर नागर शैलीतील आहे. आधुनिक बांधकाम शैलीचा सुंदर आविष्कार येथे पाहायला मिळतो.

सर्वज्ञानी गढीवर पाऊल ठेवले . ज्या ठिकाणी सर्वंज्ञांचा चरणस्पर्श प्रथम झाला तिथे ब्राह्मणाने श्रींचे चरण धुतले. त्या  स्थानावर सुंदर छत्री बांधण्यात आली आहे. त्याला ‘ श्रीचरण प्रक्षालन स्थान ‘ म्हणून संबोधले जाते.त्याच्या आतील छताला व सभागृह व  गर्भगृहाच्या आतील छतावर काचेचे बिलोरी काम केलेले आहे. त्यामुळे मंदिराचे आरस्पानी सौंदर्य अधिकच खुलून दिसते. आधुनिक मंदिर स्थापत्य शैलीचा एक सुंदर नमुना येथे पाहायला मिळतो.

गर्भगृहाच्या महाद्वाराजवळ  श्री प्रभूंना तेल उटणे लावून अभ्यंग तयारी केली गेली. म्हणून त्या स्थानाला ‘ मादणेस्थान ‘ म्हणून संबोधले जाते. त्यांनतर श्री प्रभुंना उष्णोदकाने सचैल स्नान करण्यात आले. त्या स्थळाला ‘ मर्दने स्थान म्हणून संबोधले जाते.

गर्भगृहाच्या मध्यभागी जिथे सर्वज्ञानी बाजेवर विश्राम केला ते पवित्र चरणांकित विश्रांतीस्थान ‘ भोजन व निद्रास्थान , ‘ ब्राह्मण वरप्रदानस्थान ‘ संबोधले जाते.  समोरच श्री कन्हैयालाल बाबा अर्थात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूची विलोभनीय मूर्ती व पितळी मुखवटा प्रतिष्ठित करण्यात आला आहे.

मंदिराच्या उजव्या कोनाड्यात चंदन विलेपित  ‘ शिन्नस्थळीश्री दत्तप्रभू ‘ पाषाण स्वरूपात विराजमान आहेत.  डोमेग्राम जिल्हा नगर जिथे सर्वज्ञ प्रभुंचे सव्वाशे चरणांकित स्थानविशेष  आहेत तिथून व चक्रधर स्वामी यांच्या पाषाण स्वरूप श्रीक्षेत्र माहूरगड येथून प्राण प्रतिष्ठित करण्यात आल्या आहेत. गर्भगृहात नांदणी संस्थान मंदिर प्रमाणेच नवसपूर्ती चे नारळ बांधलेले दिसतात. सभागृहाच्या उजव्या बाजूला जिथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना चंदन उटी अर्पण करून स्नान करण्यातआले  ते उटी स्नान स्थान बघायला मिळते.

श्री कन्हैयालाल बाबा मंदिरात या चारही आसन स्थानांना भाविक पवित्र मानतात. कारण तेथे श्री चक्रधर प्रभूंचा स्पर्श झालेला आहे. संपूर्ण मंदिर परिसर फुले व वेलबुट्टी सजवलेला आहे. कोणार्क येथील सूर्य मंदिराच्या चक्रांची आठवण येईल अशी पाच विशालकाय चक्रे मंदिराच्या बाह्य भिंतींवर उभारलेली आहेत.

मंदिर प्रांगणात परिसरातील अनेक मानसिक व्याधिग्रस्त खासकरून भूत बाधित व्यक्तींना आणले जाते. नांदणीत स्नान करून त्यांना मंदिराच्या सहवासात ठेवले जाते. काही दिवसातच त्यांची त्या बाधेतून मुक्तता होते अशी भाविकांची अढळ श्रद्धा असल्याने बाराही महिने मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ आढळते. त्यांच्या भोजनाची व्यवस्था गावकरी आनंदाने करतात. विशेष म्हणजे संपूर्ण गाव संप्रदाय अनुयायी आहे. या गावात पशुहत्या केली जात नाही. कुठलाही मांसाहार केला जात नाही. हे संपूर्ण गाव शुद्ध शाकाहारी आहे. लांबून आलेल्या भाविकांची येथे आपुलकीने विचारपूस केली जाते. व निवासाची पण व्यवस्था केली जाते. असे हे श्री सर्वज्ञ चक्रधर प्रभूंच्या आगमनाने पावन झालेले श्रीक्षेत्र कनाशी!

-संजीव बावसकर, नगरदेवळे, जि जळगाव

Leave a Comment