महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,026

श्रीक्षेत्र पद्मालय, जळगाव

By Discover Maharashtra Views: 4029 5 Min Read

श्रीक्षेत्र पद्मालय, जळगाव…

जळगाव जिल्ह्यातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र म्हणजे श्रीक्षेत्र पद्मालय! जळगाव पासून 25 किमी तर एरंडोल पासून 9 किमी अंतरावर असलेले हे देवस्थान गणपती मंदिरामुळे जागृत तीर्थक्षेत्र मानले जाते. भुसावळ ते मनमाड या मध्य रेल्वेच्या मार्गावर म्हसावद स्टेशन पासून 5 किमी अंतरावर हे देवस्थान आहे. भुसावळ मुंबई पॅसेंजर व भुसावळ नाशिक शटल या अप व डाऊन गाड्यांना म्हसावद येथे थांबा आहे. तिथून खाजगी वाहने इथपर्यंत येतात.

महाराष्ट्रातील गणपतीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ पद्मालय मानले जाते. मोरगाव येथे मयुरेश्वराने कमलासुराचा वध केला. त्याचे शीर जिथे पडले ते प्रथम पीठ म्हणजे मोरगाव ! कमरेपर्यंतचा भाग जिथे पडला ते दुसरे पीठ म्हणजे राजूर ! कमरेपासूनचा भाग जिथे पडला ते तिसरे पीठ म्हणजे पद्मालय ! एकदा मोरया गोसावी कऱ्हा नदीत स्नान करीत असताना त्यांच्या ओंजळीत श्री गणेशाची मूर्ती आली. ही मूर्ती घेऊन ते प्रत्येक भाद्रपद व माघ महिन्याच्या चतुर्थीला मोरगावला येत असत. नंतर त्यांनी तिची चिंचवडला प्राणप्रतिष्ठा केली. मोरगावचा मोरेश्वर हा चिंचवडला आला म्हणून चिंचवड हे अर्धपीठ मानले गेले.

पद्मालय ! पद्म म्हणजे कमळ, कमळांचे आलय म्हणजे घर म्हणून पद्मालय ! अशी या नावाची व्युत्पत्ती आहे. नावाप्रमाणेच येथे कमळांची फुले बघायला मिळतात. गणेश पुराणात या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे पूर्वीपासून तलाव होता. मंदिराचा जीर्णोद्धार साधारणतः 150 वर्षांपूर्वी गोविंदशास्त्री बर्वे या सत्पुरुषाने केला.त्यांनी मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी पाषाणात घडवून आणले. या मंदिराचे बांधकाम हे काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती आहे. हे याचे वैशिष्ट्य आहे. मंदिराचा कळस 90 फूट उंचीचा आहे. तळ्याला मजबूत घाट व पायऱ्या आहेत. मंदिर व घाट बांधण्यासाठी तळ्यातील दगड वापरले असावेत . येथे बाराही महिने पाणी असते.त्यामुळे सदैव कमळाची फुले उमललेली दिसतात. श्री गणेशाच्या नित्य पूजेसाठी ती वापरली जातात.

या मंदिराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतातील हे आगळेवेगळे गणेश मंदिर आहे जिथे डाव्या व उजव्या सोंडेच्या गणेशाची स्थापना एकाच गर्भगृहात एकाच व्यासपीठावर करण्यात आलेली आहे. आपण वाचत आहात संजीव बावसकर लिखित पोस्ट. गणेशाचे हे जगातील एकमेव मंदिर आहे . दोन्ही मूर्ती प्रवाळस्वरूप स्वयंभू आहेत. आमोद व प्रमोद अशी त्यांची नावे आहेत. पैकी उजव्या सोंडेच्या रुपात गणेशाने सहस्त्रार्जुनास दर्शन दिले व डाव्या सोंडेच्या रुपात शेषनागास दर्शन दिले. त्यांनी स्वतःच श्रींची प्राणप्रतिष्ठा येथे केली असा उल्लेख गणेश पुराणात आढळतो.

या स्थानाचे संदर्भ महाभारत या महाकाव्यात पण येतात.येथून जवळ असलेले एरंडोल म्हणजे त्या काळातील एकचक्रनगरी. पांडव वनवासात असतांना त्यांनी या परिसराला भेट दिली होती. बकासुरचा वध याच परिसरात भीमाने केला होता अशी कथा सांगितली जाते. मंदिरापासून दोन किमी अंतरावर नदीपात्रात भीमकुंड नावाचे निसर्गरम्य स्थान आहे.
या परिसरात काही प्राचीन अवशेष आढळून येतात.पुरातन काळातील मंदिरांचे ते भग्नावशेष असावेत.मंदिर परिसरातील तिसरे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले महाकाय दगडी जाते. त्याची उंचीच कमरेपेक्षा अधिक आहे. त्याचा व्यास चार फुटांपर्यंत आहे. हे अजस्त्र जाते एकट्या व्यक्तीने हलविणे देखील आज शक्य नाही. पूर्वीच्या काळी यावर दळण कसे दळले जात असेल, याची कल्पना करतांनाच आपल्याला घाम फुटतो.

दगडी जात्याच्या समोर काही प्राचीन अवशेष दिसतात. एका दगडी पट्टीकेवर श्रीगणेश विराजमान दिसतात. कदाचित प्राचीन मंदिराच्या महाद्वारावरील ती दगडी तूळई असावी. या परिसरात असे अनेक पाषाण विखुरलेले दिसतात. त्यांचा पुरातत्वीय अभ्यास झाला तर नक्कीच अधिक माहिती मिळेल. हे अवशेष दुर्लक्षित आहेत.आज दगडी जात्याच्या उपयोग लोक नारळ फोडण्यासाठी करतांना दिसतात.

या मंदिराचे चौथे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली प्रचंड पंचधातूची घंटा! ती जेव्हा वाजवली जायची तेव्हा पाच किमीच्या परिसरात तिचा आवाज निनादत असे . असे जुने जाणते सांगतात. आज त्यातील लोळी काढून त्या जागी लाकडाची लोळी बसवली आहे. याबाबत सतगुरु गोविंद महाराज यांचे आज्ञेनुसार रा.रा. बाळकृष्ण वामन कुलकर्णी नेरीकर यांनी शके १८२६ चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवारी ही पंच धातूची घंटा जिचे वजन ११ मण व किंमत रुपये ११०० श्री क्षेत्र काशी येथे तयार करून बांधली.शीतलप्रसाद व विश्वेश्वरप्रसाद ठठेरी बाजार कारागीर देविदयाळ असा मजकूर घंटेवर आढळतो.

या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व पण आहे. येथील गणेशाचे आध्यात्मिक महत्त्व जाणून श्रीमंत माधवराव पेशवे यांनी खानदेश सुभ्यातील थाळनेर पर्यंत सदतीस परगण्याचा नीम महसूल मंदिर व्यवस्थापनासाठी सनद म्हणून दिला होता. अशी नोंद पेशवे दप्तरात सापडते. या मंदिराच्या वास्तूकलेचे वर्णन साईलीला चरित्र या ग्रंथात देखील आढळते.

या परिसरात मोर आदी पक्षांचा व वानरांचा मुक्तसंचार आढळतो. वनराई बऱ्यापैकी संरक्षित असल्याने पावसाळ्यात एक रम्य भटकंती होते. नवसाला पावणारा श्रीगणेश अशी आख्यायिका असल्याने परिसरातून असंख्य भाविक येथे नतमस्तक होतात.दर संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी व कार्तिक पौर्णिमेला येथे प्रचंड गर्दी असते. या विशेष दिवसात जळगाव व एरंडोल डेपोतून जादा बसेस देखील सोडल्या जातात. यात्रा काळात भक्तांच्या गर्दीचा उच्चांक असतो.
आपण या परिसरात आलात तर एक दिवसाच्या सहलीसाठी आवर्जून भेट देण्यासाठी हे रम्य स्थळ आहे. आपणांस मंदिर सभागृहात आत्मिक अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.

संजीव बावसकर, नगरदेवळे, जळगाव

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment