श्रीक्षेत्र फलटण : महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी –
सातारा जिल्हा आणि महानुभाव संप्रदाय यांचा संबंध तसा अकराव्या शतकापासून जातीय वर्णावर्ण व्यवस्था, भेदाभेद, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध पहिले बंड केले, ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. अखिल मानव मात्राच्या उद्धारासाठी जीवनभर संपूर्ण महाराष्ट्राचे पायी परिभ्रमण करून जागर घडविला. समतेचा मूलमंत्र ममतेने, अहिंसा आणि व्यसनमुक्तीचा महामंत्र शांततेने समाजाला शिकविला. स्वातंत्र्य, बंधुता, समता या लोकशाहीतील तीन मूलतत्वांचा उल्लेख “स्वातंत्र्य हा मोक्ष पारतंत्र्य हा बंद” असे म्हणून लोकशाहीच्या मूलतत्वांना प्रतिष्ठित करणारा हा संप्रदाय. अध्यात्मिक उन्नयना सोबत सामाजिक जीवनाला प्रगत अवस्थेत इकडे घेऊन जाताना नीतिमूल्यांचा आदर्श आचार शिकविणारा हा महानुभाव संप्रदाय.श्रीक्षेत्र फलटण.
दक्षिण काशी –
महानुभाव संप्रदाय हा पंचकृष्ण यांचा उपासक या पंचकृष्णा पैकी तिसरी कृष्ण म्हणजे पूर्ण परब्रम्ह परमेश्वर अवतार श्री चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी म्हणजे श्रीक्षेत्र फलटण दक्षिण काशी म्हणून या क्षेत्राचा उल्लेख केला जातो.
अश्विन शुद्ध नवमी शके १०४३ मध्ये श्री चक्रपाणी प्रभूंचा अवतार झाला.सुमारे ३३ वर्ष ते या नगरीत जीव उद्धाराचे कार्य करत होते.दुःखीतांचे दुःख दूर करणे,अनाथांना आश्रय देणे,पांगळ्यांना पाय देणे,ब्राह्मणांना वेदाध्ययन घडविणे इत्यादी कार्य करून जीवनाच्या उत्तरार्धात द्वारकेला प्रयाण केले.अशी ही श्री चक्रपाणी प्रभूची जन्मभूमी आणि काही वर्षांची कर्मभूमी म्हणजे श्री क्षेत्र फलटण.
त्रेतायुगात अत्यंत विरक्त तपस्वी फलस्त ऋषी या ठिकाणी राहत होते.त्यांच्या नावावरूनच या नगरीला फलटण हे नाव प्राप्त झाले आहे.श्री रामप्रभू कडून घडलेल्या स्त्रीहत्येच्या प्रक्षालनार्थ ते फलस्थ ऋषींना उपाय विचारतात.तेव्हा आज याच मार्गे श्री दत्तात्रेय प्रभु कोल्हापुरास भिक्षेस जातात.त्यांना प्रार्थना करून निमंत्रित कर,असे सांगितल्यावर श्री दत्तात्रेय प्रभु प्रगट होतात.श्रीराम बाण मारून पाणी काढून त्या पाण्याने श्री दत्तात्रय प्रभूंचे चरण प्रक्षाळणा करतात.त्या तीर्थाने सुश्नात होऊन पातका पासून मुक्त करतात.असे हे अतिपवित्र तीर्थ आजही श्री बाबासाहेब मंदिर येथे कुंडाच्या रूपाने उपलब्ध आहे.
द्वापार युगात श्रीकृष्ण महाराज पांडवांच्या भेटीसाठी आणि उत्तरा अभिमन्यू विवाह प्रसंगी विराट नगरीला आले.तेव्हाची विराट नगरी म्हणजे आजचा वाई परिसर.त्यावेळी श्री क्षेत्र फलटण येथे फलस्थ ऋषीच्या पर्णकुटी समोर,कुंडावर त्यांचा मुक्काम झाला.तेथून सैन्यदला समवेत विराट नगरीस गेले.श्री कृष्ण महाराज,श्री दत्तात्रेय प्रभू आणि श्री चक्रपाणी प्रभू या तीन अवतारांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी म्हणजेच “दक्षिण काशी श्रीक्षेत्र फलटण” होय….
फलटण शहरामध्ये “श्रीमंत आबासाहेब,बाबासाहेब,जन्मस्थान,रंगशीळा व दत्त मंदिर अशी मंदिरे आहेत. त्यामध्ये श्रीमंत आबासाहेब महाराज मंदिर १०४३ सालचे प्राचीन पुरातन ९०० वर्षापूर्वीचे मंदिर आहे.या मंदिराचा जीर्णोद्धार २००७ साली “श्रीकृष्ण देवस्थान,ट्रस्ट” च्या माध्यमातून करण्यात आला असून सुमारे १ कोटी ५० लाख रुपये खर्च करून राजस्थानी गुलाबी दगडांमध्ये संपूर्ण मंदिराचे काम केले आहे.सोबतंच रंगशीळा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले असून त्यासाठी ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.यापूर्वी श्रीमंत बाबासाहेब मंदिर,जन्मस्थान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून मूळ स्वरूपातील पाच प्राचीन मंदिर आता राहिलेली नाहीत.श्रीमंत बाबासाहेब मंदिरामध्ये गाभारा,कुंड आहे.फलस्थ ऋषींची पर्णकुटी येथे पूर्वी होती.कुंडातील पाण्यामुळे धवलगिरीच्या सिंघन राज्याचे कोड पूर्ण बरे झाले.याठिकाणी घोड्याची यात्रा दरवर्षी भरते.देशातून लाखो भाविक या यात्रेसाठी हजेरी लावतात.
शब्दांकन – महंत सुरेशराज राहेरकर,तरडगाव.