महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,739

श्रीमन्महाराज राजाराम छत्रपति | Rajaram Maharaj

Views: 1531
7 Min Read

श्रीमन्महाराज राजाराम छत्रपति –

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पिता शिवाजीराजे, वडील बंधू शंभुराजे नसताना गनिमी काव्याचा उत्तम वापर करून तब्बल ११ वर्षे मुघल बादशहा औरंगजेबाला निकराने लढा देऊन खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे, हत्तीवर बसून युध्द करणारे पहिले छत्रपति महापराक्रमी श्रीमन्महाराज राजाराम छत्रपति.

थोडक्यात जीवन आढावा –

बाळ पालथे उपजले म्हणून सर्वांच्या मनात रुखरुख लागली असतानाही पालथे उपजले म्हणून काय झाले “दिल्लीची पादशाही पालथी घालील!” असं सकारात्मक प्रतिपादन शिवाजी महाराजांनी करून भविष्यवाणी वर्तविली. पुढे आपल्या पित्याची ही भविष्यवाणी बुद्धी चातुर्य पराक्रमाने सार्थ करूनही दाखवली. संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर औरंगजेबाचा सरदार इतिकाद खान याने रायगडाला वेढा दिला. प्रत्यक्ष राजधानीच संकटात असल्यामुळे मराठ्यांचे राज्य बुडणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. परंतु महाराणी येसूबाई यांनी संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांचे मंचकारोहण केले व त्यांना रायगडावरून सुरक्षितरीत्या बाहेर जाण्यास सांगितले. स्वराज्य अबाधित राहावे, याच एकमेव हेतूने राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडले. निरोप घेण्याआधी राजाराम महाराज बाळ शाहूराजे आणि येसूबाईना, “पुन्हा भेट होईल तो सुदिन.” असे म्हणून काही निवडक विश्वासू सरदारांसह महाराज प्रतापगड, सज्जनगड, पन्हाळगड मार्गे दक्षिणेमध्ये उतरले व त्यांनी प्रदीर्घ प्रवासानंतर जिंजीचा(तामिळनाडू) किल्ला गाठला. मुघलांनी त्यांचा पाठलाग करूनही ते त्यांच्या तावडीत कधीच सापडले नाहीत. पुन्हा एका अवघड प्रसंगी मराठ्यांचे छत्रपति शत्रूच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले होते.

राजाराम महाराजांनी सर्व सरदारांना एका ध्वजा खाली आणून जिंजीच्या किल्ल्यातून स्वराज्याचे नेतृत्व करून औरंगजेबाशी शर्थीने सामना करू लागले. पुन्हा एकदा मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध सुरू झाले. त्यांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्रातील जनता औरंगजेबाविरुद्ध ठामपणे उभी राहिली, हा दीर्घ लढा आणि त्याचे परिणाम म्हणजे मोगल साम्राज्यावर सर्वनाशी असा पसरलेला कर्करोगाच होता, असे उद्गार सुप्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी काढले ते योग्यच आहे. कवी केशव पंडित यांनी लिहिलेल्या राजाराम चरितं जिंजीचा प्रवास हा ग्रंथ अभ्यासताना राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास हा विलक्षण थक्क करणारा आहे.

शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल १०-११ वर्षे औरंगजेबाला सतत झुंजवत ठेवले. त्याला स्थिर बसू दिले नाही. मार्गदर्शनास वडील नाही, थोरले बंधू नाही. त्यात राजनीती आणि पराक्रमाचा अल्प अनुभव असतानाही औरंगजेब नावाचा अजगर स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी मागावर असून सुद्धा अश्या या बिकट परिस्थितीत राजाराम महाराजांनी वेळोवेळी आलेल्या परिस्थितीच्या अनुभवाने संयमाने निंर्णय घेत मराठा सरदार आणि मुसद्दी कारभारींना हाती धरून शिवछत्रपतींचे स्वराज्य कायम राखले. शिवछत्रपतींनी जन्मावेळी पादशाही पालथी घालेल असे भाकीत केले होते. प्रत्यक्षात जरी पादशाही पालथी घातली नाही, तरी पादशाही खिळखिळी केली.

राजाराम महाराजांचे फक्त मंचकारोहण झाले छत्रपति म्हणून त्यांचा अभिषिक्त राज्याभिषेक झाला नाही. त्यांना राजगादीचा लोभ कदापि नव्हता. कित्येक कागदपत्रांतून असे दिसून येते की हे राज्य थोरल्या बंधूचे आहे आणि मी त्याचा काही काळ काळजी घेत आहे. उदा. खातर एका पत्रातील आशय पाहू त्यात राजाराम महाराज शंकराजी नारायण सचिवांना लिहीलेल्या पत्रात ‘राज्य शाहूचे आहे, श्री कालांतराने त्याला देशी आणिल, तोवर मी प्रतिनिधी या नात्याने सांभाळतो आहे’ असं म्हणतात. यावरून त्यांच्या मनाचा उदात्तपणादिसून येतो.

इ. स. १६९८ दरम्यान राजाराम महाराज महाराष्ट्रात परत आले. त्याबरोबर त्यांचे बरेचसे सैन्यही परत आले. दख्खनेत राजराम महाराजांच्या नेतृत्वाखाली तर मराठ्यांचा धुमाकूळ चालू होता. आता तर ते उत्तरेत सरकले. गोंडवन, माळवा आणि गुजरात या प्रांताच्या रोखाने निघाले. एके ठिकाणी राजाराम महाराजांची दूरदृष्टी दिसून येते ती म्हणजे  दिल्लीवर स्वारी करण्याची इच्छा. दिल्लीला धडक देऊन पारिपत्य करावे आणि औरंगजेबाला धक्का द्यावा. हा धाडसी विचार खरोखर आश्चर्यचकित करणारा आहे. अखेर वर्षोभराच्या सतत संघर्षारहित प्रवासाने त्यांची प्रकृती खालावत चालली. त्यातच त्यांना छातीचे विकार होऊन दिवसेंदिवस आजार वाढत गेला. रक्तवमनाने त्यांचे वयाच्या अवघ्या ३० व्यावर्षी सिंहगडावर निधन झाले. महाराष्ट्र पुन्हा एकदा पोरका झाला. मृत्यूसमयी फक्त एकच खंत त्यांच्या मनी सलते की, येसूबाई साहेब आणि शाहू राजांना आपण मुक्त करू शकतो नाही. रायगडावरून निघताना पुन्हा भेट होइल तो सुदिन असा जो शेवटचा निरोप घेतला तो कायम तसाच राहिला. पुन्हा भेट झाली नाही. काळाने त्यांच्यावर मात केली.

तारीख-ए-महमदी या मृत्यूशक ग्रंथाचा कर्ता मिर्झा मुहंमद याने अनेक व्यक्तींच्या मृत्यूचे टिपण या त्याच्या ग्रंथात केले आहे. या कालखंडातील अनेक व्यक्तींचे मृत्यू स्वतः त्याने पाहिलेल्या तसेच अत्यंत विश्वसनीय व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर तो त्या घटना नोंद करतो. राजाराम महाराजांच्या मृत्यूचे नोंद करताना लिहून गेला आहे:

शहाजीचा नातू व शिवाजीचा मुलगा रामाजी ऊर्फ रामराजा याने आपला भाऊ संभाजी याच्या मृत्यूनंतर दक्षिणेत मोठे तेज व घाडस दाखविले (करौफर नमूदा). करं म्हणजे शत्रूवर हल्ले चढविणे, फर म्हणजे तेज, दबदबा, वैभव.

राजारामाच्या मृत्यूच्या वेळी मिर्झा मुहंमद हा तेरा वर्षांचा असून औरंगजेबाच्या छावणीत होता, हे पाहिले तर राजारामाबद्दल ‘#करौफर’ बेडर हल्ले करणे व दबदबा निर्माण करणे हे शब्द बरेच काही सांगून जातात.

अलिकडील इतिहास संशोधक आणि अभ्यासकांच्या दृष्टीने करौफर म्हणजे शान-ओ-शौकत, ठाट-बाट, धूमधाम, महिमा, वैभव, भव्यता (Incarnation of Magnificence- भव्यतेचा अवतार)असा उल्लेख करतात. रियासतकार सरदेसाई राजाराम महाराजांना “स्थिरबुद्धी” हे विशेषण देऊन त्यांचा गौरव करतात.

राजाराम महाराजांचे फक्त मंचकारोहण झाले म्हणून काहीजण त्यांच्या नावाशी छत्रपति ही उपाधी जोडत नाही. त्यांचा उपहास करतात. असे महाभाग महाराष्ट्रात असणे यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? पण एकंदर त्यांचा अतुलनीय पराक्रम पाहता छत्रपतिच्या पदाला शोभेल असे त्यांचे बहुमोल कार्य आहे. “छत्रपति” म्हणून राजाराम महाराजांचा उल्लेख करणे योग्यच आहे.

राजाराम महाराजांच्या चरित्र्यविना मराठ्यांचा इतिहास अपुरा आहे. राजाराम महाराजांच्या रूपाने असा थोर राजा महाराष्ट्राला लाभला हे आपले भाग्य.

छत्रपति राजाराम महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏🌸

अभ्यास संदर्भ:-
१. मराठी रियासत खंड २ उग्रप्रकृती संभाजी व स्थिरबुद्धी राजाराम – गोविंद सखाराम सरदेसाई
२. केशवपंडित कृत राजारामचरितं जिंजीचा प्रवास- अ.नु. वा. सी. बेंद्रे
३. महाराज्ञी येसूबाई – डॉ. सदाशिव शिवदे
४. छत्रपती राजाराम-ताराराणी – डॉ. सदाशिव शिवदे
५. शिवपुत्र छत्रपती राजाराम- डॉ. जयसिंगराव पवार
६. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध- सेतू माधवराव पगडी
७. मराठ्यांचा इतिहास- अ. रा. कुलकर्णी
८. नियतीच्या विळख्यात औरंगजेब- सेतू माधवराव पगडी

संकलन- सुमित नलावडे.

Leave a Comment