अक्कलकोट संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले –
छत्रपती संभाजी राजे यांची ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने हत्या केली. त्यानंतर नऊ महिन्यातच रायगडचा पाडाव झाला. महाराणी येसूबाई व पुत्र बाल शिवाजी पुत्र ( शाहू ) मोगलांचे कैदी बनले.पुढे १७०७ मधे औरंगजेबाचा मृत्यू नगर मध्ये झाला. त्यानंतर बादशहा बनलेला आजम दिल्लीच्या वाटेवर असताना त्याने भोपाळ जवळील दारोहा येथून थोरले शाहूमहाराज यांची सुटका केली. शाहू महाराज आपले राज्य घेण्यासाठी दक्षिणेत येत असता त्यांचेबरोबर असलेल्या सैन्याला पारद या गावी, शहाजी लोखंडे पाटील यांनी प्रतिकार केला.शाहू महाराज यांचे सोबत असलेले सैन्य शहाजी लोखंडे पाटलावर चालून गेले.पारद या गावी छोटी लढाई होऊन त्यात गावचे पाटील मारले गेले. त्यावेळी त्यांच्या विधवा पत्नीने नुकतेच जन्माला आलेले मूल शाहू महाराजांच्या पायावर घालून अभय मागितले. शाहूमहाराजांनी हा आपला पहिलाच विजय मानून आनंदाने त्या मुलाचा स्वीकार केला. पारद गावी शाहूमहाराजांची फत्ते झाली म्हणून फत्तेसिंह असे नाव ठेवून त्याला बरोबर घेतले. हा मुलगा म्हणजेच अक्कलकोट संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले होय.
पुढे त्यांच्या मुलांमध्ये तंटा निर्माण होऊन त्यांच्या तीन शाखा वेगवेगळ्या प्रांतावर आपापल्यापरीने वर्चस्व गाजवू लागल्या. अक्कलकोट ,पिलीव,आणि राजाचे कुर्ले येथे फत्तेसिंह राजे भोसले यांचे पुढील वारसदार राहू लागले. राजाचे कुर्ले या गावी राजे भोसले यांचा भुईकोट किल्ला आहे. जवळपास तीन ते चार एकर परिसरात हा किल्ला बांधण्यात आला आहे. तसेच पिलीव येते जहागीरदारांचा मोठा किल्ला आहे.
शाहू महाराजांचे पेशवे पहिले बाजीराव व फत्तेसिंह भोसले हे समवयस्क होते. शाहू छत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर दिल्लीचे बादशहाकडून दख्खनच्या सहा सूभ्याचे चौथाई आणि सरदेशमुखीपणाचे हक्क प्राप्त झाले. त्याचे वाटप शाहू छत्रपतींनी आपल्या सरदारांमध्ये करून त्यांचे क्षेत्र ठरवून दिले. फत्तेसिंह भोसले यांना शाहू महाराज राजपुत्रा प्रमाणे मानीत असत. त्यामुळे सहा सुभ्यांपैकी कर्नाटकाचा सुभा फत्तेसिंह भोसले यांच्याकडे सुपूर्त केला. फत्तेसिंह भोसले यांना भागानगरचाही(हैद्राबाद) सुभा मिळावा अशी शाहू छत्रपतींची इच्छा होती.त्यावेळी हा सुभा मोगलांच्या ताब्यात होता.
१७२५ मध्ये शाहू छत्रपतींनी निजामाला रोखण्यासाठी फत्तेसिंह भोसले यांना कर्नाटकातील कामगिरी करण्याची आज्ञा केली. फत्तेसिंह भोसले यांनी चित्रदुर्गपासून पश्चिमेस सौंदे बिदनुरपर्यंतच्या सर्व खंडण्या वसूल केल्या. सर्व ठाणी मराठ्यांच्या हातची गेली होती ती सोडवून परत आपल्या ताब्यात घेतली.गरजेनुसार जरब देऊन काम फत्ते केले .ही मोहीम १७२५ पासून ते १७२६ पर्यंत मोहीम फत्तेसिंह भोसले यांच्या अधिपत्याखाली पार पडली.
यापूर्वीच सन १७१३ मध्ये शाहू छत्रपतींनी दक्षिणेतील सहा सुभ्यापैकी महत्त्वाचा असा हा कर्नाटकचा सुभा फत्तेसिंह भोसले यांचेकडे दिला होता. या सुभ्यावर आपली हुकमत वाढावी म्हणून मोहिमेचे नेतृत्त्व फत्तेसिंह भोसले यांचेकडे दिले होते. तंजावरचे सरफोजी राजे भोसले यांनाही मदत करण्याची आज्ञा फत्तेसिंह भोसले यांना दिली होती. त्याप्रमाणे तंजावरला जाऊन त्यांनी सरफोजी राजे भोसले यांची भेट घेतली. मोहिमेचे नेतृत्व फत्तेसिंह भोसले यांच्याकडे सोपवले गेले. वयाच्या केवळ अठराव्या वर्षी फत्तेसिंह भोसले यांनी आयुष्यातील पहिलीच लष्करी मोहीम पार पाडली.
तंजावरकर भोसलेना अर्काटचा नबाब सादुल्ला खान त्रास देत असे. कोप्पळ,कर्नुल,कडप्पा, तिरुपती, व्यंकटगिरी, येलूर ,जिंजी अशी तंजावरला जोडणाऱ्या प्रदेशांची ही साखळी .शिवछत्रपतींनी निर्माण केलेले हे स्वराज्य छत्रपतींच्या निधनानंतर २७ वर्ष सतत औरंगजेबाशी झगडून मराठ्यांनी राखलेला हा प्रदेश आपल्या हातातून जाऊ नये या उद्देशाने कर्नाटकची मोहीम आखली होती .
या मोहिमेचे नेतृत्व अठराव्या वर्षी फत्तेसिंह भोसले यांना मिळाले.फत्तेसिंह भोसले स्वारीस निघाले म्हणजे प्रतिनिधी व प्रधान यांनी त्यांच्याबरोबर स्वारीत जावे असा शाहू महाराजांनी निर्बंध केला होता. यावरून शाहू महाराजांनी त्यांना राजपुत्राला शोभेल अशी व्यवस्था केल्याचे दिसून येते .फत्तेसिंह भोसले यांना युवराजाप्रमाणे मान छत्रपती देत होते. त्यांचा सन्मान वाढवीत होते.
मार्च १७२६ मधे कर्नाटकाची मोहिम पार पाडून फत्तेसिंह भोसले सातारा येथे आले, तेव्हा शाहू छत्रपतींनी त्यांचा सन्मान केला. त्यांनी सर्व खजिना व झालेले वृत्त महाराजांना निवेदन केले .
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तक्ताची जागा रायगड ही परक्यांच्या ताब्यात होती. ती परत मराठी दौलतीत आणण्यासाठी शाहू छत्रपतींनी फत्तेसिंह भोसले यांना सांगितले. ही एक महत्त्वाची कामगिरी होती. या मोहिमेला जंजिरा मोहीम असे नाव होते. ही मोहीम सन १७३१ पासून सन १७३४ पर्यंत चालून रायगड ही छत्रपतींच्या तक्ताची जागा मराठ्यांच्या परत ताब्यात आली.शाहू महाराजांच्या हुकुमाप्रमाणे काम करून फत्तेसिंह भोसले यांनी मोहीम तडीस नेली.
पुढे छत्रपतींनी रघुजी भोसले यांना स्वतःचे पुत्र मानले होते. त्यांना मुख्य सेनापती नेमून रघुजी त्यांच्या मदतीला दिले होते.फत्तेसिंह हे पापभिरू व दयाळू स्वभावाचे होते. त्यामुळे स्वारीची सूत्रे रघुजीनकडे आली. अर्काटचा नबाब व त्रिचनापल्लीस चंदाखानाची खोड मोडून पराक्रम रघुजीने केला होता. पण स्वतःचे निशान त्रिचनापल्लीवर न चढवता फत्तेसिंह बाबांचेच निशांत चढवले गेले. यावरून रघुजी भोसले यांनी फत्तेसिंह भोसल्यांचा सन्मान राखण्यात कोणताही कमीपणा केला नव्हता .
मराठी साम्राज्य चौफेर वाढवण्यासाठी फत्तेसिंह भोसले यांचा उपयोग मराठ्यांच्या शूर पराक्रमी रघुजी भोसले यांनी करून घेतला होता. त्रिचनापल्ली ते मुर्शिदाबाद हा सारा मुलुख पराक्रमाने तोडून तो मराठी राज्यात सामील होण्यासाठी फत्तेसिंह भोसले यांचे योगदान मराठी इतिहासाला विसरता येणार नाही.
शाहू छत्रपतींची एक राणी विरूबाई फत्तेसिंह भोसले यांना पुत्रवत मानीत असे. शाहू छत्रपतींच्या इतर राण्यापेक्षा वीरूबाईंचा मान सर्वात मोठा होता. या विरुबाईना संतती नसल्याने फत्तेसिंह भोसले यांनाच ते आपला पुत्र मानत होत्या. शाहू छत्रपतींच्या दोन राण्या सकवारबाई आणि सगुणाबाई साहेब यांच्यावर सुद्धा विरूबाईंची हुकमत चालत असे. विरूबाईंच्या मृत्यूच्या वेळी फत्तेसिंह भोसले कर्नाटकात स्वारी वर गुंतले होते.फत्तेसिंह भोसले यांना विरूबाई पुत्राप्रमाणे मानीत असल्याने त्यांचे उत्तर कार्य फत्तेसिंह भोसले यांच्या हातून पुढे केले गेले.विरूबाईंची दौलत ,द्रव्य व पायातील सोन्याच्या साखळ्या फत्तेसिंह यांनाच मिळाल्या.फत्तेसिंह भोसले यांनीही देव्हार्यात विरूबाई साहेबांची सोन्याची मूर्ती करून बसवली .ती अद्यापही त्या घराण्याकडे आहे.
फत्तेसिंह भोसले अत्यंत मृदु स्वभावाचे होते. त्यामुळे स्वराज्याच्या उलाढाली पासून ते दूर राहिल्यामुळे पेशव्यांना मराठी दौलतीचा सर्वाधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. फत्तेसिंह भोसले यांनी मराठी दौलतीची जोखीम घेण्याची इच्छा व्यक्त केली असती ,तर छत्रपती पद त्यांच्याकडे येण्यास काहीच अडचण आली नसती. ही बाब त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवणारी होती. फत्तेसिंह भोसले यांना गोविंदराव चिटणीस यांनी कारभार करण्याविषयी विचारले असता त्यांनी कानावर हात ठेवले होते. याचाच अर्थ हे तक्त आपणास स्वीकारायची इच्छा नाही असाच होतो. फत्तेसिंह भोसले यांची कारकीर्द सन १७१२ पासून सन १७६० पर्यंत बरीच मोठी होती. त्यांनी स्वतंत्रपणे अनेक मोहिमा करून आपले शौर्य तेज प्रकट केले होते.
श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले यांनी कोल्हापूर, कर्नाटक, बुंदेलखंड, भागानगर, त्रिचनापल्ली या प्रांतावर अनेक स्वाऱ्या केल्या .मराठ्यांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराजांना त्यांनी उत्कृष्ट सहाय्य केले. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर फत्तेसिंह भोसले अत्यंत ऊदास झाले ,ते अक्कलकोट येथे निवास करू लागले. सातारचा राज्यकारभार त्यांनी बाजूला ठेवला. पेशव्यांचे होत असलेल्या राज्यकारभाराचे घडामोडी पासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले .शाहू छत्रपतींच्या मृत्यूनंतर राम राजाचा राज्याभिषेक होऊन पेशव्यांनी दौलतीची सर्व सत्ता हाती घेतली व नवीन छत्रपती झालेल्या रामराजांना राज्य करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सातारा येथे घडत असलेल्या घटना फत्तेसिंग यांच्या मनाला क्लेशदायक वाटत होत्या. त्यामुळे त्यांनी स्वतःला दूर ठेवले होते.
अशातच श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले यांचा २० नोव्हेंबर १७६० रोजी अक्कलकोट येथे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोघी स्त्रियांनी सहगमन केले. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील जुने संस्थान आहे. अशा या वैभवशाली पराक्रमी आणि शूर घराण्याच्या कामगिरीची अगदी अलिकडे सुद्धा प्रचिती येते.अक्कलकोटमधे जुना राजवाडा, नवीन राजवाडा, जलमंदिर ,उत्तम शस्त्रागार, धर्मशाळा ,उद्यान ,रस्ते ,वीज, शिक्षण या सर्वच बाबतीत या घराण्याचे योगदान विशेष आहे.
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे