श्रीमंत थोरले शाहुछत्रपती –
शके १६०४ दुंदुभी संवत्सरे वैशाख वद्य सप्तमीस गुरुवारी (१८ मे १६८२) संभाजीराजे यांसी पुत्र जाला. शिवाजीराजे नाव ठेविले. शाहू महाराजांसंबंधी तत्कालीन कागदपत्रांत जे उल्लेख सापडतात त्यावरून त्यांच्या व्यक्तित्त्वावर आणि कारकिर्दीवर पुष्कळ प्रकाश पडतो.श्रीमंत थोरले शाहुछत्रपती.
“साताऱ्यास तख्त करून राहिले, तेव्हापासून राज्यकारभार सेवक लोकांपासून अनेक मसलती व युद्धप्रसंग मोठ्या फौजा पाठवून केले. मनसुब्यात बहुतच चतुर. सर्व राज्य मोगलाईत गेले होते, ते मसलतीने सोडविले. सर्व लोक आज्ञेत वागवून नवीन मोठी माणसे निर्माण झाली, त्यांचे चालविले. शहाण्या पोक्त माणसांच्या मसलतीने चालावे. विश्वासू सेवक लोकांचे हाते कामे घ्यावी. लघु मनुष्य, कैफी, व्यसनी, दारूबाज यास समीप न ठेविता मुत्सद्दी लोकांचे हातून कारभार चालविला. मराठे लोकास शिपाईगिरीने कामास ठेविले. उत्तरदेश सोडवून थोरले महाराजांचा उद्देश सिद्धीस नेला. पूर्वेस, पश्चिमेस, दक्षिणेस चतुःसमुद्र मर्यादा होऊन चहूदिशेचे राज्य एक आज्ञा चालू लागले” (संदर्भ – शाहू महाराजांची बखर : चिटणीस)
बखरकार किंवा तत्कालीन पत्रव्यवहार यात आपल्या राजासंबंधी केलेला उल्लेख आत्मीयतेने आणि आदरभावनेमुळे कदाचित अतिप्रशंसापर वाटण्याचा संभव आहे. पण त्या वेळेच्या मराठ्यांच्या शत्रूंनेही शाहू महाराजांच्या गुणासंबंधी व्यक्त केलेले मत अतिशय मार्मिक आणि बखरकारांच्या मताला पुष्टी देणारे असेच आहे.
निजामउल्मुल्कचा नातू मुजफ्फरजंग याने शाहू महाराजांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर पुढील प्रमाणे उद्गार काढले होते.
“मोगलाईत निजामउल्मुल्क मऱ्हाट राज्यात शाहू राजे होते. ऐसे माणूस पुढे होणार नाहीत. सर्व राज्य पेशव्यास सोपवून गेले. छत्रपती सारखा राजा होणे नाही. राज्य बरे नांदविले. अजातशत्रू होते.” (संदर्भ – पेशवे दप्तर : भाग २८, पृ ६)
– स.मा.गर्गे, करवीर रियासत.
Sanket Pagar