श्रीपाद मंदिर | दाढीवाला दत्त –
लोखंडे तालमीकडून कुंटे चौकात जाताना रस्त्याच्या डाव्या हाताला हुजूरपागा शाळेचा एक दरवाजा लागतो. त्या दरवाज्याच्या बरोबर समोर नवकार बॅग्स नावाचे दुकान आहे. त्या दुकानच्या शेजारी श्रीपाद मंदिर अशी पाटी दिसते.
सदर मंदिर एका इमारतीच्या पार्किंगमध्ये असून हे खासगी दत्त मंदिर आहे. सदर दत्तमंदिराची स्थापना श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे परमशिष्य प. पू. श्री. बाळप्पा महाराज यांच्या प्रेरणेतून झाली. या जागेत असलेल्या औदुंबर वृक्षाच्या छायेखाली इ.स. १ जून १९११ रोजी मंदिराचे बांधकाम झाले. जयपूरच्या कारागिरांकडून घडवलेल्या सुंदर सुबक संगमरवरी गुरुदेव दत्त यांच्या मूर्तीची यथाविधी प्रतिष्ठापना करण्यात आली आणि जगद्गुरू श्री शंकराचार्य यांच्या हस्ते मंदिराचा कळस चढवण्यात आला. हे मंदिर दगडी बांधणीचं आहे आणि लाकडी नक्षीदार देव्हाऱ्यात थोड्या उंचावर संगमरवरी दत्तात्रेयाची मूर्ती आहे.
या मंदिराचे मूळ मालक कै. द. कृ. घाणेकर ह्यांना मोठी दाढी होती. म्हणून या मंदिराला दाढीवाला दत्त या नावाने सुद्धा ओळखले जाते. येथे रोज नैमित्तिक उपासना आणि उत्सव दत्त संप्रदायाप्रमाणे होत असतो. येथे गुरुपौर्णिमा व दत्तजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.
संदर्भ:
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
पत्ता : https://goo.gl/maps/CmLLYNAeuCCBVt8F9
आठवणी इतिहासाच्या