श्रीराम बारव आणि गुंजाळवाडी (नारायणगाव)
गावचा ऐतिहासिक वारसा –
जुन्नर तालुक्यातील मीना नदीच्या दक्षिणेस काही अंतरावर वसलेले एक छोटंसं परंतु तेवढेचं ऐतिहासिक व नैसर्गिक सुंदरतेने नटलेले व संतमहंतांच्या पदपर्शाने पावण झालेले खेडेगाव म्हणजे गुंजाळवाडी (नारायणगाव) होय. या गावाच्या शेजारी जवळच पिंपळगाव तर्फे नारायणगाव, आर्वी व नारायणगाव ही ऐतिहासिक वारसा लाभलेली गावे आहेत. जुन्नर तालुक्यातील मध्य पट्ट्यातील ही पर्यटनासाठी तितकीच महत्त्वाची गावे असून पर्यटनस्थळांचे जतन करून हे ऐतिहासिक वैभव श्रीराम बारव आणि गुंजाळवाडी ग्रामस्थांनी जगासमोर आणून गावांचा विकास साध्य केला जाऊ शकतो.
गुंजाळवाडी गावठाण अजुनही जुन्या पध्दतीच्या घरांनी व्यापलेले असुन गावाने अजूनही खेडुत्रीपणा जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.या गावातील कुटुंबांची तहान बाराही महिने भागविते ती येथील असलेली ऐतिहासिक श्री राम बारव. गावच्या जुन्या चावडीच्या उत्तरेस तर ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या पूर्वेला आपणास ही बारव दक्षिणोत्तर स्वरूपात पहावयास मिळते. ग्रामस्थांनी येथील बारवेचे संवर्धन अतिशय सुंदर पद्धतीने केले असुन रहदारीच्या विळख्यात ही बारव असल्याने संपूर्ण बारवेस लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने झाकून घेत कुणाचीही जीवित हानी होणार याची ग्रामस्थांनी काळजी घेतली आहे.
बारवेस पश्र्चिमेकडुन उतरण्यासाठी पायरी मार्ग असून आठ दहा पाय-या उतरून खाली गेले की डाव्या हाताला वळताच तेथेच पश्र्चिम भिंतीत सुंदर अशा देवळीत साधारण अडीच तीन फुट उंचीचे श्रीगणेश विराजमान असलेले पहावयास मिळतात तर समोरच उत्तर कमानीवर एक मानविआकृतीचे दगडी शिल्प असून ते कशाबाबतचे आहे ते समजू शकलो नाही. बारवेतील पाणी एवढे स्वच्छ आहे की आपणास त्यात डोकावताना अगदी तळापर्यंत सहज पाहता येते. बारवेच्या पुर्वेस लागुनच श्रीराम पंचायतन मंदिर असुन ते 200 वर्षे जुने असल्याचे ग्रामस्थ सांगतात. हे श्री राम मंदिर ,श्री हनुमान मंदिर संपूर्ण सुंदर लाकडी कलेत साकारलेले असुन जुन्नर तालुक्यातील एकाही मंदिरास किंवा जवळपास असलेल्या तालुक्यातील मंदिरात अशी लाकडावरील कला कुसर पहावयास मिळत नाही. या मंदिराच्या छताला लावलेले लाकडावरची नक्षीकाम पाहतच रहावी अशीच आहे.
श्री राम व श्री हनुमान मंदिर यांना श्री राम पंचायतन म्हणून ओळखले जाते. हे मंदिर ह. भ. प. सहादूबाबा भाऊ वायकर यांचे वडील श्री भाऊ वायकर , व त्यांचे बंधू श्री गणाजी वायकर यांनी बांधले असून आतमध्ये वापरण्यात आलेले सर्व मार्बल हे त्या काळी जपान वरून आणले असल्याचे ग्रामस्थ सांगतात. आजही त्या मार्बलचा रंग हा आहे तसाच आहे. ह. भ. प. सहादू बाबा वायकर यांची समाधी, नागदेवता शिल्प मंदिरा समोरच पश्र्चिमेस आहे. मंदिराच्या पाठिमागे पुर्वेस ग्रामदैवत आई मुक्तादेवी मंदिर असुन या मंदिरात काळ्या पाषाणात मुक्तादेवीची अखंड सुबक मूर्ती सिंहावर विराजमान असलेली पहावयास मिळते. विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यात या स्वरूपाची देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती इतरत्र कुठेही आढळून येत नाही.
मुंबई मधील “भाऊचा धक्का” आपणास फक्त माहीत असेल व तो भाऊचा धक्का आजही खुप प्रसिद्ध असून त्याचे मुळ हे जुन्नर तालुक्यातील असुन त्या धक्का ह. भ. प. सहादूबाबा वायकर यांचे वडील श्री भाऊ वायकर यांच्या मालकीचा होता. त्यांच्या नावावरूनच त्याला भाऊचा धक्का म्हणून नाव पडले असे ग्रामस्थ सांगतात. गावची जुनी परंपरा कायम राखली जावी म्हणून आजही ग्रामसभा ही पूर्वीपासून ग्रामचावडीमध्येच होत असते. दर १२ वर्षांनी जो कुंभमेळा नाशिकमध्ये होतो त्यानंतर तेथील काही साधूंची धुंड ही तीन दिवस याच मंदिरात थांबत असते.
मंदिराच्या पाठिमागे असलेल्या वटवृक्षाचे झाड पण खूप मोठे असून फार जुने असुन ग्रामस्थांनी ते जतन करण्यासाठी योगदान दिले आहे. सांगितले जाते की ह. भ. प सहादू बाबा वायकर हे त्या काळी स्वतः कोणताही मोबदला न घेता पायी प्रवास करून महाराष्ट्र भर कीर्तन करत असत . ह भ प श्री सहदूबाबा वायकर हे ह भ प कोंडाजी बाबा डेरे यांचे गुरू होते. जुन्नर तालुक्यातील ओतूर वरून पंढरपूर ला जाणारी चैतन्य महाराजांची पालखी ही ह. भ. प. सहादू बाबा वायकर यांनी त्या काळी प्रथम चालू केली होती. विशेष म्हणजे ह. भ. प. सहादू बाबा वायकर यांनी स्वहस्ते लिहीलेली संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा आजही आपणास येथे पहावयास मिळते. श्री क्षेत्र गुंजाळवाडी( आर्वी ) येथील मंदिराचे पुजारी श्री. काशिनाथ वायकर दादा व ग्रामस्थ श्री महेश पांडुरंग दरेकर यांनी मला वरील माहिती देण्यासाठी मदत केली व ती मला आपणा पुढे मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक आभार मानतो.
लेख/ छायाचित्र – Ramesh Kharmale, माजी सैनिक