महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,752

श्रीराम मंदिर रामटेक

Views: 4417
6 Min Read

श्रीराम मंदिर रामटेक…

रामटेक हे नागपूर जिल्ह्यातील पवित्र व निसर्गरम्य स्थान आहे. हे नागपूरच्या ईशान्येस रस्त्याने ५५ कि. मी. अंतरावर आहे. नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मनसर या ठिकाणाहून येथे रस्ता जातो. नागपूरशी हे लोहमार्गानेही जोडलेले असून अंबागड टेकड्यांच्या पायथ्याशी आहे.

रामटेक टेकडीवरील श्रीराम मंदिर :

रामटेक या १५२ मी. उंचीवर असलेल्या टेकडीवर चौदाव्या शतकातील बरीच मंदिरे आहेत. या रामटेक टेकाडीची दक्षिण व पश्चिम बाजू नैसर्गिकरीत्याच संरक्षित आहे. उत्तरेकडे दुहेरी भिंत बांधून तटबंदी केली आहे. बाहेरील भिंत आधीच्या गवळी राजांनी बांधली असावी; तर इतर काम नंतरचे आहे. देऊळ पश्चिमेकडच्या सर्वात उंच भागात असून अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून टेकडीवर चढण्यास पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर दगडी भिंत असलेले एक जुने तळे आहे. जवळच नरसिंहाची मोठी मूर्ती असलेले देऊळही आहे.  या टेकडीला चारी बाजूंनी कोट असून त्याला अनुक्रमे वराह, भैरव, सिंगपूर आणि गोकुळ असे चार दरवाजे आहेत. नागपूरचा रघूजी पहिला याच्या हातून देवळाच्या बाहेरच्या मजबूत तटबंदीचे काम झाले. मुख्य दरवाजा वराह दरवाजा. कारण लगेच आत वराह या विष्णूच्या अवताराची मोठी मूर्ती आहे. त्यापलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा या रेषेतील दुसरा दरवाजा असून त्यातून आतल्या तटबंदीत प्रवेश मिळतो तर भैरव दरवाजातून आतल्या शेवटच्या तटबंदीत प्रवेश मिळतो.  आत राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यासमोर राम व सीतेचे मोठे देऊळ उभे दिसते. मुख्य वास्तूच्या सभोवार इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत.

नागपूरची खास वास्तुशैली रामटेकलाही दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबाच्या बांधणीचे बारकावे य वास्तूत दृग्गोचर होतात. छोट्या छत्र्या, उलट्या कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सज्जे व उथळ देवळ्या यांमुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो. शिखरे भूमिज प्रकारची आहेत.

हे मंदिर सुमारे ७०० वर्षे जुने आहे. भक्तगण प्रथम येथील धूम्रेश्वर महादेवाचे दर्शन घेऊनच श्रीराम मंदिरात दर्शनास जातात.

या राममंदिरात राम-सीता यांच्या काळ्या दगडातील, वनवासी वेषातील रम्य मूर्ती आहेत. त्या दुधाळे तलावात मिळाल्याचे म्हटले जाते. या मंदिरासमोरच लक्ष्मणाचेही मंदिर असून, गोकुळ दरवाजा व लक्ष्णण मंदिर यांवरील कोरीव काम विशेष लक्षणीय आहे. यांव्यतिरिक्त अन्य काही मंदिरेही आवारात आहेत.

मंदिरासमोरच एक कुंड असून, ते सीतेची न्हाणी म्हणून ओळखले जाते.  टेकडीच्या पायथ्याशी एक जुने कल्की अवताराचे (दशावतारातील दहावा अवतार) मंदिर व मध्ययुगीन नागर शैलीत बांधलेली काही जैन मंदिरे आहेत.

राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे.

संस्कृतच्या अभ्यासाकरिता स्थापन करण्यात आलेले कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे.

रामटेकमध्ये माणिकताल व मथुरासागर अशा दोन बागा आणि २७ तलाव असून त्यांपैकी अंबाला तलाव सर्वांत मोठा आहे. या तलावाच्या काठावर आधुनिक पद्धतीने बांधलेली अनेक प्रेक्षणीय देवालये असून सकाळच्या प्रहरी या देवालयांवर सूर्यकिरणे पडून चमकू लागली म्हणजे तलाव व देवालये यांचे एकंदर दृश्य अतिशय मनोहारी बनते.  या मंदिरांमध्ये एक अप्रतिम सूर्य मंदिरही आहे. अंबाला तलावावर एकूण आठ घाट बांधण्यात आले असून त्यांना अष्टतीर्थांची नावे देण्यात आली आहेत.

अख्यायिका :

येथे नरसिंहाने हिरण्यकश्यपूला मारले अशी अख्यायिका आहे.

सण व उत्सव :

रामटेक श्रीराम मंदिर येथे रामनवमी व त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी मोठ्या जत्रा भरतात. या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेस यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो.  ही त्रिपुरारी पौर्णिमेची व रामनवमीची जत्रा १२ व्या शतकातही ही भरत असे असा उल्लेख लीळा चरित्र ग्रंथात आला आहे.  रामाच्या देवळावर त्रिपूर जाळण्याची पद्धत त्रिपुरासुराच्या शंकराने केलेल्या संहाराची निदर्शक आहे. या जत्रेत भांडी, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू विक्रीस असतात.

सितामाता रसोई घर गडमंदिर रामटेक :

सितामाता रसोई घर गडमंदिर रामटेक येथे मंदिर संस्थानामार्फत दर शनिवारी आणि रविवारी उन्हाळ्यात सकाळी ९:३० ते दुपारी १२.३० पर्यंत व इतर ऋतूंमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपावेतो निशुल्लक भोजन देण्यात येते.

एकूण मराठी देवळांची बांधणी व वास्तुकला यांवर येथील हवापाणी, डोंगरदऱ्या व धार्मिक वापर यांचा परिणाम येथे दिसून येतो. विशेषतः वारकरी सांप्रदायाचा मोठा पगडाच या वास्तुकलेवर आहे. भक्तिमार्गामुळे अनेक जत्रा व यात्रांच्या प्रथा आजतागायत रामटेकसह उभ्या महाराष्ट्रात चालू आहेत.

रामटेक या नावाचा इतिहास व‌ या मंदिराला व टेकडीला दिली गेलेली ईतर नावे :

रामटेक म्हणजे ‘रामाची टेकडी’; रामाने वनवासकाळात या टेकडीवर काही काळ विश्रांती घेतली म्हणून यास रामटेक नाव पडले, असेही म्हटले जाते. या टेकडीवर विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केला व त्याच्या रक्ताने येथील दगड तांबडे झाले म्हणून यास ‘सिंदुरगिरी’ असेही नाव पडले आहे. ‘रामगिरी’, ‘तपोगिरी’, ‘काशीचे महाद्वार’ असेही याचे उल्लेख आहेत. ‘सिंदुरगिरी’ व ‘तपोगिरी’ ही दोन्ही नावे येथील लक्ष्मण मंदिरावरील कोरलेल्या एका यादवकालीन शिलालेखात (तेरावे शतक) आढळतात.

रामटेकच्या दक्षिणेला वाकाटककालीन नगरधन चा किल्ला आहे.

रामटेकचा इतिहास :

इ.स.२५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता.सातवाहनांच्या कालात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इ.स. ३५० मध्ये त्यांचा पडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास झाले असा समज आहे. संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे ‘मेघदूत’. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. सन १९७०-१९७१ मध्ये, रामटेक गडमंदिर परिसरात, महाराष्ट्र शासनाने ‘कालिदास स्मारकाची’ निर्मिती केली. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे.या ठिकाणी दरवर्षी ‘कालिदास महोत्सव साजरा होत असतो.  रामटेकच्या दक्षिणेला असलेला वाकाटककालीन नगरधन चा किल्ला हा वाकाटकांची राजधानी होता.

रामटेक तालुक्यात १८६७ साली नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.  तीर्थक्षेत्राखेरीज आसमंतीय मँगॅनीजच्या खाणी यांमुळे रामटेकला विशेष महत्व आले आहे. येथील पानमळे प्रसिद्ध असून ही पाने पुण्या-मुंबईला निर्यात होतात.  रामटेक जवळच तोतलाडोह हे धरण आहे.

येथील नयनरम्य सृष्टीसौंदर्य पाहून कविश्रेष्ठ कालिदासाला मेघदूतासारखे खंडकाव्य स्फुरले, तर कवी अनिलांनी येथील त्रिविक्रम वामनाचे मंदिर पाहून भग्नमूर्ति हेखंडकाव्य लिहिले.

1 Comment