महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,574

शुकसारीका | कोरवलीच्या सुरसुंदरी

Views: 1392
2 Min Read

शुकसारीका –

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.११ –

कोरवलीच्या मंदिराच्या मंडोवरावर स्थित असणाऱ्या सुरसुंदरी मध्ये आणखी एक महत्त्वाचे सुंदर विलोभनीय असे शिल्प आहे, ते शिल्प म्हणजे शुकसारीकेचे शिल्प होय. मंदिराच्या वरच्या खंडित भागावर हे शिल्प कसेतरी आडवे बसवलेले आहे.  अप्सरा समूहातील  उंचीपुरी असणाऱ्या शुकसारीका या सुंदरीच्या डोक्याशी दाखवलेली प्रभावळ पटकन नजर वेधणारी आहे. ही देखील त्रिभंग अवस्थेतच कलाकाराने निर्देशित केलेली आहे.

राजकन्येला शोभेसा कुंतल मुकुट तिने परिधान केलेला आहे. महिरपीप्रमाणे हिचे कुरळे केस तिच्या मुखकमलास अधिकच तेजस्वी बनवणारे आहेत. पण पाहता क्षणी मोहक वाटणारा तिचा चेहरा एका रूपगर्वितेचेचा आहे. आपल्या मोहक सौंदर्याबद्दल ओसंडून वाहणारा लज्जा मिश्रित स्वाभिमान कलाकारांनी फारच कौशल्याने दाखविला आहे. झुकल्या मानेस शोभणारी मोठाली कर्णकुंडले कर्दळीच्या गाभ्यायाप्रमाणे असणार्‍या तिच्या मानेस शोभा आणणारी आहेत.शुकासारिकेच्या ज्या दोन्ही रेखीव पण नजूक चरणकमला वर उभे राहावे लागते त्याचे वर्णन शब्दबद्ध करता येणार नाही. अशी ही शुकसारिका नखशिकांत आभूषणांनी आणि वस्त्रप्रावरणांनी सालंकृत झालेली आहे.

इतर सुरसुंदरी प्रमाणेच कलाकारांनी हिला कर्णभूषणे, उपग्रीवा, स्कंदमाला, स्तनसूत्र, केयूर, कटीसूत्र, उरूद्दाम, आणि मुक्तद्दाम यांनी सजवलेले आहे.पादवलय आणि  पादजालक या अलंकाराने तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे .या अप्सरेच्या डाव्या हातावर एक लोभस परंतु खोडकर शुक(पोपट) मोठ्या विश्वासाने बसलेला आहे. या शुकाचे लक्ष तिने उजव्या हातात पकडलेल्या आम्रफलाकडे आहे. खरे तर हा शुक आम्रफलाच्या अभिलाषेने तिच्याकडे झेपावला आहे. परंतु तिच्या डाव्या हातावर स्थित झाल्यावर हा संभ्रम अवस्थेत सापडलेला आहे .कारण या शुकासमोर या स्वर्गीय  यौवनेचे परिपक्व आणि पुष्ट असे स्तनद्वय आहेत. परिपक्व अशा तिच्या स्तनाकडे पाहून शुकमहाराज अर्ध परिपक्व असणाऱ्या आम्रफलास विसरून गेले आहेत आणि खाण्यासाठी या सुखाची खट्याळ शुकाची नजर तिच्या स्तनाकडे रोखलेली आहे.

या खोडकर शुकाची झालेली फजिती या लावण्यवतीने हेरली आहे आणि तू कसा फसलास? या भावनेने ती या शुकाकडे तेवढ्याच खोडकर नजरेने पहात आहे. मात्र या शुकाकडे पाहताना आपल्या स्वर्गीय सौंदर्याचा अभिमान वाटतो आहे हे भाव चेहऱ्यावर नाही असे हे शिल्प कलाकारांनी आपले सर्व कसब पणाला लावले आहे. एकाच वेळी स्त्री सौंदर्याचे दर्शन,तिच्या चेहर्‍यावरिल विभ्रम  आणि त्या चावट शुकाची फजिती व लबाडी दाखवून आरसपाणी सौंदर्याची उधळण मंदिराच्या बाह्यांगावरकेलेली आहे.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a Comment