महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,67,389

सिद्धेश्वर शिवमंदिर, कोरेगाव

By Discover Maharashtra Views: 2655 2 Min Read

सिद्धेश्वर शिवमंदिर, कोरेगाव –

एखाद्या गावाला इतकं काही ऐतिहासिक वैभव लाभलेलं असतं की, आपणही त्या गावचेचं होऊन जावं असं वाटायला लागतं. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणारं कोरेगाव असंच एक छोटंसं गावं. नगर वरून कर्जतला पोहचलात की, कर्जतमधून कोरेगाव जेमतेम पाच किलोमीटर अंतरावर आहे. गावातील पुरातन सिद्धेश्वर, कोरेश्वर, पंचमुखी महादेव तसेच श्री वीरभद्र मंदिर व गावात विखुरलेल्या इतर खाणाखुणा गावच्या समृद्ध इतिहासाची आजही साक्ष देत आहेत.
कर्जत कोरेगाव रस्त्यावर कोरेगावच्या अलीकडे उजव्या बाजूला काही पावलांवर आपल्याला सिद्धेश्वर नावाने ओळखले जाणारे एक यादवकालीन मंदिर दृष्टीस पडते. मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी मंदिराची रचना दिसून येते. समोर नव्याने बांधण्यात आलेल्या नंदीमंडपात नंदी, वीरगळ व इतर काही भग्न शिल्पं विखुरलेली आहेत. तसेच मंदिराच्या उजव्या बाजूला एक नागशिल्पं उभे असलेले आपल्याला दिसते.Siddheshwar Shiv Mandir, Koregaon.

मंदिराचा मुखमंडप कक्षासनयुक्त वामनभिंती असलेला असून दोन वामन स्तंभावर तोललेला आहे. कक्षासनाच्या बाह्य भागावर काही भौमितिक शिल्पांकन आपल्या नजरेस पडते. मंदिराचा सभामंडप चार स्तंभावर तोललेला आहे. सभामंडपात आपल्याला श्री विष्णू, श्री गणेश, भगवान विष्णूचा वराह अवतार, चामुंडा व शिवपार्वती यांची सुबक शिल्पे नजरेस पडतात. शिल्पांची झीज झालेली असली तरी त्यांचा रेखीवपणा नजरेत भरणारा आहे. गर्भगृहात सिद्धेश्वराचे दक्षिणोत्तर शिवलिंग विराजमान आहे. गावातील प्रतिष्ठित निंबाळकर कुटूंबीय सिद्धेश्वराची मनोभावे सेवा करीत असून त्यांनी हा ठेवा प्राणपणाने जपला आहे.

सिद्धेश्वर मंदिरापासून अगदी काही अंतरावर गावातील मध्यवर्ती भागात भक्कम दगडी तटबंदीत ग्रामदैवत कोरेश्वराचे सुंदर राऊळ आहे. उजव्या बाजूला जवळच पुरातन पंचमुखी महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचे सध्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. मंदिर परिसरात आपल्याला काही वीरगळ व इतर भग्नावशेष नजरेस पडतात. दरवर्षी नारळी पौर्णिमेला निघणारी कोरेश्वर महाराजांची रथयात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. त्यावेळेस मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील भाविक कोरेश्वराचे भक्तिभावाने दर्शन घेतात.
कोरेश्वर मंदिरापासून काही अंतरावर एका नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरातील श्री वीरभद्राची मूर्ती आवर्जून पहावी अशी आहे. दुर्मिळ अशी ही अष्टभुजा मूर्ती शिल्पंकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. ही कला निर्माण करणारी माणसं जरी आता मागे पडली असली तरी त्यांच्या खाणाखुणा वारसा म्हणून आपल्याबरोबर आहेत. फक्त गरज आहे ती हा वारसा अन् त्यांचा इतिहास जपण्याची.

– रोहन गाडेकर

Leave a Comment