महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,76,536

सिद्धेश्वर मंदिर, मांडवगण, श्रीगोंदा

Views: 1401
2 Min Read

सिद्धेश्वर मंदिर, मांडवगण, श्रीगोंदा, अहमदनगर –

सरस्वती नदीच्या तटावर वसलेले श्रीपुरनगर अर्थात श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गाव नगर शहरापासून ३० किमी अंतरावर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका हा साधुसंतांची भूमी असलेला आणि दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो, याच तालुक्यातील मांडवगण या गावात मांडव्य ऋषी ची तपोभूमी आणि संजीवन समाधी आहे म्हणून या गावाला मांडवगण असे नाव पडले.(सिद्धेश्वर मंदिर, मांडवगण)

१७६० साली आपली म्हणजेच मराठ्यांची निजाम राज्यकर्त्यां सोबत उदगीर येथे लढाई झाली, या लढाईत मराठ्यांनी विजय मिळवला, लढाईला जाताना नानासाहेब आणि भाऊसाहेब पेशवे वाटेत मांडवगण येथे सैन्यानिशी मुक्कामी थांबल्याचे कळते. इथल्या वेताळाच्या माळ्यावर लष्करी तळ, तंबू ठोकून युद्ध सैनिकांची सोय केली होती, पेशव्यांच्या खास स्वाऱ्या सिद्धेश्वर मंदिरात मुक्कामी थांबल्याचे कळते, निघण्यापूर्वी पेशव्यांनी सिद्धेश्वर मंदिरातील मुख्य शिवलिंगाला अभिषेक केल्याचे देखील सांगितले जाते.

मांडवगण गावातून कटाक्ष आणि वटाक्ष या दोन नद्या एकत्र येऊन संगम पावतात याच नद्यांच्या संगमावर असणाऱ्या वनात मांडव ऋषींची समाधी आणि स्वयंभू सिद्धेश्वराचे मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करताच साधारण ५० फूट उंची असलेली दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते, पुढे गेल्यावर भव्य नगारखाना आणि दोन्ही बाजूने जुन्या काळी बांधलेल्या देवड्या दिसतात, मंदिरात गेल्यावर आणखी दोन दीपमाळा आणि दोन्ही बाजूंनी भाविकांसाठी बांधलेल्या ओवऱ्या आहेत, तसेच इतर लहान मोठी पुरातन मंदिरे देखील आहेत.

सिद्धेश्वर व परिसरातील मंदिरांना रंगरंगोटी करून त्यांचा जीर्णोद्धार जरी केलेला असला तरी मंदिराच्या अंगोपांगावरील नाजूक शिल्पं कामावरून आपल्याला त्यांच्या प्राचीनतेची कल्पना येते. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात सिद्धेश्वराचे शिवलिंग स्थापित आहे. मंदिर परिसरात होळकरांचा वाडा, रामेश्वर मंदिर व पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले पुरातन लक्ष्मी नारायण मंदिर देखील आहे. मांडवगण ला एकदा अवश्य भेट द्यावी.

©️ रोहन गाडेकर

Leave a Comment