महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,244

सिद्धेश्वर मंदिर, टोका

By Discover Maharashtra Views: 1858 4 Min Read

सिद्धेश्वर मंदिर, टोका, ता. नेवासा –

आडवाटांवर चालायची सवय लागली, की खेडोपाडी अनेक कोरीव मंदिरे भेटतात. त्यावरील शिल्पकाम, स्थापत्य थक्क करून सोडते. अहमदनगर ते औरंगाबाद दरम्यानच्या प्रवासात कायगाव टोका येथील सिद्धेश्वर मंदिर समूह असाच भेटतो. अद्याप दुर्लक्षित असे हे स्थळ स्थापत्य व शिल्पकलेची आवड असणाऱ्यांनी आवर्जून पाहावे असे आहे.

नेवासा तालुक्यातील नगर औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर नगर जिल्ह्यातून येणारी प्रवरा व नाशिकहून येणारी गोदावरी यांचा संगम झालेला असून या संगम तीरावर सिद्धेश्वर, रामेश्वर, घटेश्वर व मुक्तेश्वर ही प्राचीन मंदिरे आहेत. यातील सिद्धेश्वर मंदिर हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून गणले जाते. सर्व बाजूंनी तटबंदी असलेल्या पूर्वाभिमुखी मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेस असून प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे. मंदिराची रचना पेशवेकालीन नागर शैलीची असून मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला विष्णूचे व डाव्या बाजूला देवीचे अशी अजून दोन मंदिरे आहेत. ही तीनही मंदिरे शिल्पंसमृद्ध आहेत. यातील मूख्य शिवमंदिराची आपण या भागात माहिती घेणार आहोत.

मुख्य शिवमंदिर –

मुख्य मंदिराचे शिखर लहान लहान शिखरांनी बनलेले असून नंदीमंडप, सभामंडप, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपातील वितानावर कृष्णाच्या विविध रासलीला  कोरलेल्या दिसतात. मंदिराचे गर्भगृह प्रशस्त असून आत शिवलिंग स्थापित आहे. शिवमंदिरा समोर देखणा नंदी आहे. नंदीच्या पाठीवरील सुबक नक्षीकाम अती सुंदर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल असून मंदिराच्या बाजूस ओसऱ्या आहेत.

मंदिराच्या सर्व बाजूंच्या भिंतीवर रामायण, महाभारत व इतर पुराणातील प्रसंग कोरलेले आहेत. तर मंदिराच्या समोरील बाजूस अतिशय देखणी दशावतार पट्टीका कोरलेली आहे. मूख्य मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतीवर एक एक शिल्पपट कोरलेला आहे. या व्यतिरिक्त बाळकृष्णाचे गोकुळातील प्रसंग, अर्जुनाचे गर्वहरण, भीमाचे गर्वहरण, अशोक वनातील हनुमान सीता दर्शन भेट तशीच काही अनोखी शिल्पे आहेत. इथल्या पट्टीकेवर स्त्रियांच्या विविध भावमुद्रा, नृत्यमुद्रा, टाळ, मृदुंग वाजवताना, केशसंभार करताना कोरलेल्या आहेत.

विष्णू मंदिर –

विष्णू मंदिरा बाहेर थोडय़ा अंतरावर एक गरुडमूर्ती हात जोडून बसलेल्या अवस्थेत आहे. हे मंदिर आकाराने मुख्य मंदिरापेक्षा लहान असून त्यावर प्रत्येक दिशेला अष्टदिक्पालांच्या सुबक मुर्त्या आहेत. पश्चिम दिशेचा स्वामी वरुण, त्याचे वाहन हत्ती. वरूणाचा पाश आणि त्याची गदा सुद्धा यात कोरलेली आहे. आग्नेय दिशेचा स्वामी अग्नी त्याचे वाहन एडका आहे. दक्षिण दिशेचा स्वामी यम त्याचे वाहन रेडा आहे, नैऋत्य दिशेचा स्वामी निऋती. हा नेहमीच क्रूर दाखवलेला असतो. याचे प्रमुख शस्त्र खड्ग असून याने हातात शत्रूचे कापलेले मुंडके पकडलेले आहे. वायव्य दिशेचा स्वामी वायू हातात ध्वज घेऊन उभा आहे. त्याचे वाहन बहुधा बैल आहे.

पूर्व दिशेचा स्वामी देवराज इंद्र त्याच्या ऐरावत हत्तीसह उभा आहे. ईशान्य दिशेचा स्वामी ईशाण हाती त्रिशूळ, डमरू, कमंडलू आणि नाग धारण करून वाहन नंदिसह उभा आहे. उत्तर दिशेचा स्वामी कुबेर त्याचे वाहन मकरासह उभा आहे. वरील दिक्पालांपैकी अग्नी, कुबेर आणि वरूणांच्या वाहनांमध्ये विविध पुराणांमध्ये वेगवेगळी वाहने दिली आहेत. काही ठिकाणी अग्नी चे वाहन बैल तर वरूणाचे मगर असे दाखवले आहे. गाभाऱ्यात मध्यवर्ती जागी त्रिविक्रम विष्णूची काळ्या दगडातील मूर्ती आहे.

देवी मंदिर –

मूख्य मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या देवी मंदिराची रचना विष्णू मंदिरासारखीच असून बाह्य भिंतीवर अष्टमातृकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. चामुंडेंची मूर्ती हाती शस्त्र धारण करून असुराचा नाश करत आहे. वराहारूड वाराही, मातृकांमधील एक माहेश्वरी हाती त्रिशूल, डमरू, खड्ग ही शस्त्रे धारण केलेली नंदीवर आरुढ आहे. हाती कमंडलू धारण केलेली कौमारी, एका हातात बीजपूरक धारण केले आहे जे नवनिर्माणाचे मांगल्याचे प्रतिक आहे. कमळावर बसलेली महालक्ष्मी. सिंह हे वाहन असलेली नारसिंही. हत्ती हे वाहन असलेली इन्द्राणी. गरुड वाहन असलेली वैष्णवी अशा वैविध्यपूर्ण सुबक मूर्ती आहेत. गर्भगृहात देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज आसनस्थ मूर्ती आहे. मंदिराचा कळस हत्ती व गुलाब पुष्पांच्या कलाकुसरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

Rohan Gadekar

Leave a Comment