द्वारपाल | सिद्धेश्वर मंदिर, वालूर –
वालूर (ता. सेलु, जि. परभणी) हे अतिशय प्राचीन वारश्याने संपन्न असे गाव. या गावातील सिद्धेश्वर मंदिरावरील हे द्वारपाल. वेरूळच्या कैलास लेण्यांतील द्वारपालांवर नुकतंच लिहिलं होतं. त्याच्या साधारण ५०० वर्षानंतरचा या मंदिराचा कालखंड असावा. द्वारपालांचे मुकुट, पाठीमागची प्रभावळ, अलंकरण यादवांच्या काळातील समृद्धी दर्शवते. उत्तर यादवांच्या काळातील मंदिरं आणि बारवा या परिसरांत प्रामुख्याने आढळतात. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, चालूक्य आणि यादव या राजघराण्यांची समृद्धी या भागातील प्राचीन वारशावरून स्पष्ट होते.
या दोन्ही द्वारपालांचे दरवाजाच्या दिशेचे पायाचे पंजे आत वळलेले आहेत आणि विरूद्ध दिशेचे सरळ समोर आहेत. म्हणजे आतून काही आज्ञा आली की आत वळायचेच आहे. या शिल्पांत उभं राहण्याची ललित मूद्रा मोहक आहे. मंदिराचा जो भाग शिल्लक आहे त्यावर फारसे शिल्पांकन नाही. इथेच एक मैथून शिल्पाची शिळा निखळून पडली आहे. त्यावरून आणि या द्वारपालांवरून कोसळलेल्या भागात काही शिल्पे असावीत याचा अंदाज येतो.
या मंदिराच्या प्रदक्षिणा पथावर वाळवणं घातली आहेत. भिंतींना खिळे ठोकून दोर्यांवर कपडे वाळत घातले आहेत. मंदिराच्या बाजूने गटार वहाते आहे. मंदिराच्या भिंतीला लागुन चुली मांडल्या आहेत पाणी तापविण्यासाठी. त्याची काजळी भिंतींवर चढत आहे. मंदिराच्या छतावर गवत वाढले आहे. काय अनास्था आहे कळत नाही. अशा उकिरड्यात हे शिल्पसौंदर्य पडलेलं आहे.मंदिराच्या छतावर गवत वाढले आहे. काय अनास्था आहे कळत नाही. अशा उकिरड्यात हे शिल्पसौंदर्य पडलेलं आहे.
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद