महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,257

सिदोजीराव नाईक निंबाळकर

By Discover Maharashtra Views: 3335 7 Min Read

सिदोजीराव नाईक निंबाळकर –

‘ वणंगपाळ बारा वजीराचा काळ ‘ अशी ज्या  घराण्याची ख्याती ते  घराणे म्हणजे फलटणचे नाईक निंबाळकर घराणे होय .इ.स.१६४१ साली मुधोजीराव नाईक निंबाळकर यांनी साबाजी नाईक  निंबाळकर यांची स्थापना वैराग ता बार्शी जि.सोलापूर  येथे करून  तो महाल आणि त्याखालील मुलुख याचा कारभार त्यांना दिला.दुसरे पुत्र जगदेवराव यांची स्थापना भाळवणी ता. पंढरपूर जि.सोलापूर येथे केली.तिसर्या कन्या सईबाईसाहेब यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी झाला व कनिष्ठ पुत्र बजाजी नाईक निंबाळकर यांच्या कडे फलटणचा कारभार ठेवण्यात आला.(सिदोजीराव नाईक निंबाळकर)

मराठी मुलखातील प्राचीन घराण्यापैकी नाईक-निंबाळकर यांचे घराणे आहे.छत्रपती शिवरायांची जशी फलटण ही सासुरवाडी तशीच, शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे सुद्धा या नाईक निंबाळकर यांचे जावई होते. म्हणजे शहाजीराजांचे हे आजोळ घराणे आहे. शहाजी राजांच्या मातोश्री दीपाबाई याही फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या  होत्या. फलटण हे शिवरायांची सासुरवाडी म्हणून जसे मराठी  मुलखात ज्ञात आहे, तसेच शहाजीराजे यांचे आजोळ व जिजाऊ साहेब यांचे ही आजोळ फलटण  मराठा मुलुखाला ज्ञात आहे.

अशा या  फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील वैराग व भाळवणी या ठिकाणी वास्तव्यास आलेली दोघा भावांची घराणी ,मराठी इतिहासात पुढील शंभर, दीडशे वर्ष आपल्या पराक्रमाने, शौर्याने तळपत राहिली आहेत. या पराक्रमी पुरूषांना त्यांचे अंगचे,  पराक्रम आणि निष्ठेने सेवा करण्याच्या वृत्तीने फार मोठा मान-मरातब मिळत असे .छत्रपती  शिवाजीराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या हालचाली पुणे, सुपे,या त्यांच्या जहागिरीत चालू झाल्या तरीही हे  निंबाळकर घराणे आदिलशाही सलतनिशी एकनिष्ठ राहून त्यांची सेवा इमाने इतबारे करत राहिले. भाळवणी आणि वैराग येथील नाईक-निंबाळकरांचे  घराण्यात अनेक वीर पुरुष एकामागून एक निर्माण होऊन आपल्या पराक्रमाने त्यांनी, ज्यांच्या पदरी ते राहिले त्यांची प्राण पणाला लावून सेवा बजावली.

भाळवणी शाखेचे मूळ पुरुष जगदेवराव नाईक निंबाळकर ! यांचे पुत्र शिदोजी हे शिवरायांशी एकनिष्ठ राहून स्वराज्यनिर्मीतीच्या कामी सहभागी झालेले दिसून येतात. शिवरायांनी त्यांना पंचहजारी सरदाराचा मानमरातब दिला होता. यावरून छत्रपती शिवरायांच्या दरबारात नाईक निंबाळकर यांना  किती  मोठा मान होता याची प्रचीती येते.

सिदोजीराव नाईक निंबाळकर यांनी छत्रपती  शिवरायांच्या सेवेत आल्यानंतर पुढे  आदिलशाही सरदार बहलोलखान इ.स.१६७२ मध्ये स्वराज्यावर चालून आला. त्यावेळी शिवरायांनी प्रतापराव गुजर आणि आनंदराव या सेनानीला बोलावून त्यांचा बंदोबस्त करण्यास सांगितले. शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे हे दोघेजण टाकोटाक बहलोल खानावर चालून गेले. बहलोलखानाचा तळ कुठे पडला आहे त्याची खबर घेऊन गुप्त वाटेने ते निघाले. उमराणीजवळ बहलोलखानाचा तळ पडला होता. त्याने जवळ असलेल्या पाण्याची सोय पाहिली होती. उमराणीस पाण्याचा तलाव होता. तो हत्ती, घोडे, उंट यांची पाण्याची गरज भागवित होता. प्रतापरावांच्या नेतृत्वाखाली मराठी फौजेने रातोरात प्रवास करून बहलोलखानाच्या पाणी साठ्यावर कब्जा मिळवला. याचा पत्ता त्या आदिलशाही सैन्याला लागला नाही. सकाळी खाणाचे हत्ती पाणी पिण्यासाठी या जलाशयाकडे आले तेंव्हा पाण्याचा साठा शत्रू सैन्याच्या ताब्यात आहे हे लक्षात आले. त्याचवेळी  प्रतापराव गुजर घोड्यावरून दौडत तेथे पोहोचले.आदिलशाही सैन्यात एकच गोंधळ उडाला ,घबराट माजली.

एवढ्यात आनंदरावानी आदिलशाही सैन्याच्या पिछाडीवर हल्ला चढिवला. तीन घटका उभय सैन्यात युद्ध झाले . या गोंधळात आदिलशाही सैन्यातील हत्ती बिथरला. त्यांने साखळदंड तोडला. शत्रु सैन्यात त्याचे धावत सुटल्याने आणखीनच गोंधळ उडाला.घबराट माजली.  एवढ्यात आनंदरावाने आदिलशाही सैन्याचे पिछाडीवर हल्ला चढवला. तीन घटका उभय सैन्यात युध्द झाले.या गोंधळात आदिलशाही सैन्यातील हत्ती बिथरला.त्याने साखळदंड तोडला.शत्रू सैन्यात हत्ती  धावत सुटल्याने आणखीनच गोंधळ उडाला. या हत्तीवर ताबा मिळवण्यासाठी आदिलशाही माहूत धावून आले. त्यांच्यावर सिद्दीहिलाल,शिदोजी नाईक निंबाळकर,   रुपाजी भोसले, सोमाजी मोहिते  यांनी हल्ला चढवला. सायंकाळपर्यंत घनघोर युद्ध झाले.सिदोजी नाईक निंबाळकरांनी विजापूरकराचा मोकळा  सुटलेला हत्ती वळवून मराठ्यांच्या तळावर आणला. महंमद बर्की हा सिद्धी सरदार ठार झाला. त्यामुळे आपण पुनः तुमचे वाटेस जाणार नाही असे बहलोलखानाने कबूल करून शरणागती पत्करली व त्याने विजापूरकडे माघार घेतली.

रायगडावर त्यावेळी राज्याभिषेकाची लगबग चालू होती. गडावर मोठे उत्साहाचे आणि चैतन्यमय वातावरण पसरले होते .सिधोजी नाईक निंबाळकर यांनी या स्वारीत केलेला पराक्रम पाहून शिवरायांनी सिधोजी नाईक   निंबाळकर यांना शाबासकी दिली.

सिधोजी नाईक निंबाळकरांनी साॅल्हेरच्या युद्धातही पराक्रम गाजवून आपले शौर्य दाखवले.साॅल्हेरच्या युद्धात महाराजांना प्रचंड विजय प्राप्त झाला.इख्लास खान ,मियाना व मुहकमसिंह चंद्रावत जखमी होऊन मराठ्यांच्या हाती लागले.व्दारकोजी भोसलेही कैद झाले. त्यांचे सहकारी मराठ्यांशी लढताना ठार झाले. साॅल्हेरच्या मैदानावर उघड्यावर झालेली ही मोगल आणि मराठे यांची पहिली लढाई आहे. एवढी प्रचंड लढाई यापूर्वी कधीच झाली नव्हती.   युद्धात प्रतापराव व मोरोपंत खास लढले.त्यांच्या सोबत सिदोजीराव नाईक निंबाळकर,  आनंदराव, मकाजी ,व्यंकोजी, दत्तो ,रुपाजी भोसले, खंडोजी जगताप, गोदाजी जगताप ,संताजी जगताप ,मानाजी मोरे या सर्वांनीच पराक्रमाची शर्थ केली. याच लढाईत सूर्यराव काकडे गोळा लागून ठार झाले. शिवरायांच्या आदेशाने मराठ्यांनी मोगलांशी उघड्या मैदानावर लढाई करून प्रचंड मोठा विजय मिळवला. महाराजांना मिळालेल्या यशाचे कौतुक वाटले तसे रामजी पांगेरा यांच्या मृत्यूचे दुःख ही महाराजांना झाले .ही लढाई सन १७७२ च्या फेब्रुवारी महिन्यात झाली.या लढाईत सिधोजी निंबाळकर पराक्रमात आघाडीवर होते.

यानंतर शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक झाला त्यावेळी ,पंच हजारी हुद्दा असलेले सिधोजीराव नाईक निंबाळकर राज्याभिषेक सोहळ्याला गडावर हजर होते. सिधोजीराव नाईक निंबाळकर यांनी केलेला पराक्रम पाहून महाराजांना अतिशय आनंद झाला होता. छत्रपती शिवरायांनी सन १६७९ महिन्यात जालना शहराची लूट केली. त्यांच्याबरोबर दहा हजाराची फौज होती व राजांचे पंचहजारी सरदार सिधोजी नाईक निंबाळकर हे महाराजांच्या बरोबर होते.अत्यंत श्रीमंत अशा जालना शहरात छत्रपती शिवरायांना सोने ,रूपे ,हत्ती-घोडे व अगणित मालमत्ता सापडली .

या सर्व लूटीसह महाराज परत फिरले तेव्हा मोगलांचे सरदार हजाराची फौज घेऊन महाराजांवर चालून आले. मोगली सरदाराने महाराजांना गाठून कठीण प्रसंग आणला. त्यावेळी  शिदोजी नाईक निंबाळकर महाराजांच्या बरोबर होते.लूटीचे सामान हत्ती, घोडे ,उंट यावर लादलेले आणि सोने-चांदी, रत्ने, माणके असे अपार द्रव्य हत्तीच्या उंटाच्या पाठीवर होते. यावेळी महाराज अत्यंत अडचणीत आले. शिवरायांच्या सोबत असलेली मराठी फौज सततच्या दौडीमुळे शिणलेली होती.अशा प्रसंगी सिधोजीराव नाईक निंबाळकर यांनी मोगल सरदारांना थोपवून धरण्याचा मनसुबा महाराजांना बोलून दाखवला. त्याप्रमाणे चार पाच हजाराचे सैन्य बरोबर घेऊन ते शत्रूला सामोरे गेले. काही निवडक सैन्य सिदोजीराव यांना देऊन बाकीच्या सैन्यास घेऊन आणलेली लूट बरोबर घेऊन छत्रपती शिवाजीराजे पट्टा किल्ल्याकडे निघाले. मोजक्या लोकांच्या मदतीने सिधोजी नाईक निंबाळकरांनी मोगलांशी सतत तीन दिवस प्रखर झुंज दिली. शत्रूला थोपवून धरण्यात ते यशस्वी झाले.छत्रपती शिवराय पट्टा किल्ल्यावर ता.२२ नोव्हेंबर १६७९ ला  महाराज पट्टा किल्ल्यावर पोहोचले.

मात्र मोगली सैन्याला तोंड देत असताना सिधोजी नाईक निंबाळकर २२ नोव्हेंबर १६७९ ला  धारातीर्थी पडले. एका शुर विराची प्राणज्योत युद्धभूमीवर मालवली. ही खबर ऐकुन शिवरायांना परम दुःख झाले.सिधोजी नाईक निंबाळकर यांचे पट्टा किल्ल्याचे परिसरात स्वराज्यासाठी दिलेले बलिदान पुढील घराण्यात मार्गदर्शक ठरले. पुढील पिढ्यातील शूर आणि पराक्रमी पुरुषांनी स्वराज्य कार्यासाठी आपले प्राण अर्पण केल्याची नोंद इतिहासात झालेली आहे.

स्वराज्यासाठी नाईक निंबाळकर घराण्यातील शूर योद्ध्यांनी ( स्री पुरूष ) एकापेक्षा एक सरस कामगिरी करूण आपले योगदान दिले.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment