पन्हाळ्याचा वेढा…
राजमाता जिजाऊ साहेब ग्रंथमाला भाग १९…
पन्हाळ्याचा वेढा – प्रत्येक ठिकाणी जिजाऊंनी आपण विरांगना आहे असा रयतेला व शिवरायांना जणू काही संदेशच दिला होता.प्रतापगडावरील शिवरायांचा पराक्रम व अफजलखानाचा वध झालेला पाहून आदिलशाही दरबाराला जोरदार धक्काच बसला होता. अफजलखानाचा अशा रितीने वध झाल्यापासून आदिलशहा सैरभैर झाला होता.त्यामुळे आदिलशाहाची भिती वाढली होती. शिवाजीराजांनी अफजलखानास मारले .रुस्तमिजमानचा पराभव केला व पन्हाळागड घेऊन विजापूरच्या मुलखात हवी तशी लूट करण्याचा सपाटा चालवला. हे सर्व कळल्यानंतर आदिलशहाची पाचावर धारणच बसली. शिवाजीराजांचा बंदोबस्त कसा करावा ? हा सर्व दरबाराला विचार पडला .
अफझलखानाच्या वधानंतर तोफेच्या इशार्यासरशी छत्रपती शिवाजी राजांचे सैन्य त्यांच्यावर तुटून पडले होते .अफजलखानाच्या सैन्याला पळता भुई थोडी झाली होती. हत्तीच्या सोंडा कापल्या गेल्या. दात तोडले गेले,उंट मारले,अमाप लूट मिळाली. दारुगोळा, तोफा हस्तगत केल्या . खानाचा मोठा मुलगा फजलखान निसटून गेला; पण त्याचे दोन मुलगे,फितूर मराठे सरदार व ईतर बरीच मंडळी कैद झाली. बायका – मुलांना सोडून देण्यात आले .गाय, स्त्री आणि ब्राह्मण यांना उपद्रव द्यायचा नाही असे महाराजांचे ब्रिद होते.
खानाच्या वधामुळे मराठी जनतेला धीर
आला व शिवाजीराजांचे सामर्थ्य वाढले. विजापूरकर व दिल्लीकर मोगल या दोघांना महाराजांच्या वाढत्या पराक्रमाने व हालचालींनी भय उत्पन्न केले. खाना सारख्या अनुभवी व पराक्रमी सरदारास शिवाजीराजांनी जीवे मारून शिवाय त्याच्या फौजेची लांडगेतोड करावी ; ही गोष्ट विजापूरकरांना फार लागली .तशातच त्यांना आणखी एक बातमी कळली की, शिवाजीराजांनी लगोलग पन्हाळा जिंकला. मग मात्र फाजलखानाने जोरदार मोहीम आखली.सिध्दी जोहरकडे स्वारीचे नेतृत्व देण्यात आले.
अफझलखानाच्या वधामुळे चिडलेले फाजलखान, रुस्तमखान ,सादात खान वगैरे सरदार भली मोठी फौज घेऊन सिद्दीजोहरला मिळाले.महाराज यावेळी पन्हाळा किल्ल्यावर होते. महाराजांकडे फौजही थोडी होती. सिद्धी जोहरच्या प्रचंड फौजेने २ मार्च १६६० रोजी पन्हाळ्याला वेढा दिला.यावेळी एक नव्हे तर दोन शत्रू शिवाजीराजांच्या छोट्याशा स्वराज्यावर येऊन ठेपले होते. आदिलशहाकडून फाजलखान , तर औरंगजेबाच्यावतीने त्यांचे मामा शाहिस्तेखान, प्रचंड फौजेनिशी पुण्यात येऊन दाखल झाले. शिवाजीराजांचे पुणे आपल्या ताब्यात आलेले पाहून खानाला वेगळाच माज चढला होता .शिवाजीराजांच्या लाल महालातच शाहिस्तेखान तळ ठोकून बसला होता. महाराजांचा राहता वाडा , जिजाऊंचा आवडता लाल महाल खानाने पूर्णपणे बाटवून टाकला होता.लहानपणी ज्या लाल महालात आई साहेबांनी आपल्या लाडक्या शिवबावर संस्कार केले , त्याच लाल महालात शराब आणि हुक्याचे दर्प येऊ लागले . पुण्यावर हिरवे निशाण फडकू लागले होते. राजगडावर आईसाहेब चिंताक्रांत झाल्या होत्या. पन्हाळ्याला फास पडला होता.
तिकडे नेताजी पालकरांचा पराभव झाला होता.मोगलांनी स्वराज्याला गिळंकृत करण्याचा घाट घातला . आईसाहेबांना अत्यंत अडचणी ,निराश करणारे प्रसंग, सैन्याची कमतरता ,वतनासाठी स्वराज्य सोडणारे सुभेदार, केवढी बिकट परिस्थिती.अशा परिस्थितीत सुद्धा आईसाहेब स्वराज्याची आणि गड किल्याची राखण करत होत्या. शाहिस्तेखानाच्या संकटाला न जुमानता,न डगमगता खिन्न मनाने स्वराज्याची पाठराखण करत होत्या. मोगलांचे क्रूर अत्याचार सहन करायला शिवबाची आईच व्हायला पाहिजे. एकुलत्या एक मुलावर जीवघेणी संकटे कोसळत असताना शांत राहणे कोणत्या माऊलीचे काम असेल ?तरी सारे ताण-तणाव सहन करत आपल्या मुलाच्या भेटीची आस बाळगून आईसाहेब बसल्या होत्या. आपल्या मुलाला वाचवणारे, सोडविणारे तेवढ्याच हिमतीचे व जोखमीचे कोणीच दिसत नव्हते.
सिद्धीजोहर हा विजापुरकरांच्या दृष्टीने कावेबाज सरदार होता ; शिवरायांच्या बंदोबस्तासाठी त्याला पाठवले गेले होते. जवळजवळ साडेतीन महिने सिद्धीजोहर मोठ्या चिकाटीने पन्हाळ्याचा वेढा घट्ट करून बसला होता. शिवाजीराजे खूप मोठ्या संकटात सापडले होते. सुटकेचा काहीच मार्ग दिसत नव्हता. महाराष्ट्राचा राजा शत्रूच्या मिठीत सापडला होता. जिजामातेचा जीव टांगणीला लागला होता. त्यांचे सर्व लक्ष पन्हाळ्याकडे लागले होते. शत्रू हटेना व महाराज शरण येईनात. किल्ल्यावरील दारुगोळा व अन्नसाठा हळूहळू संपत आला होता. शत्रूचे सामर्थ्य अफाट होते. महाराज व त्यांचे सैन्य मोठ्या विवंचनेत पडले होते. बाहेरून मदत मिळण्याची काहीच शक्यता नव्हती .
शिवाजीराजांच्या गैरहजेरीत स्वतः जिजाऊ
स्वराज्याचा कारभार पाहात होत्या. राजगडावर जिजाऊंचा मुक्काम होता. राजगडावर राहून पन्हाळ्यात बंदिस्त होऊन पडलेल्या आपल्या पुत्रास कसे सोडवायचे, याचाच विचार त्या रात्रंदिवस करत होत्या. शिवबाच्या चिंतेने व्याकुळ झाल्या होत्या. सिद्धीजोहरचा वेढा उठवून किंवा तो फोडून राजांना निसटून जाण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता .स्वस्त बसून ,हताश बनून संकट कसे टळणार ? काही तरी केलेच पाहिजे.
मग एके दिवशी या वीरमातेला विलक्षण स्फुरण चढले व त्या लढाईच्या गोष्टी करू लागल्या.आपण स्वतःच काही फौजेनिशी जाऊन पन्हाळ्याचा वेढा देऊन बसलेल्या सिद्धी जोहरवर तुटून पडावे आणि शत्रूचा वेढा फोडून आपल्या शिवबास घेऊन यावे असे जिजाऊंच्या मनाने घेतले. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली. गडावर होते नव्हते ते सैन्य जमवून जिजामाता स्वतः शस्त्रसज्ज होऊन पन्हाळ्याकडे निघाल्या. तिकडे महाराज पन्हाळ्यावर अडकून पडलेले ,नेताजी पालकर यांना समजले .त्यांनी विजापूरवर हल्ला चढवला. पण खवासखानाने त्यांना सहा कोस दूर सारले .त्यामुळे नेताजी पालकरांनी विजापूरचा नाद सोडून राजगडावर मातोश्री जिजाऊंना भेटण्यासाठी आले. कारण जिजाऊ एकट्यात स्वराज्याचे रक्षण करत आहेत ,म्हणून त्यांनाच प्रथम भेटून ख्याली खुशाली घ्यावी म्हणून नेताजी पालकर राजगडावर आले.
नेताजी पालकरांना राजगडावर पाहून जिजाऊ अत्यंत क्रोधित झाल्या, म्हणाल्या की ‘ शिवबा गेले कित्येक दिवस पन्हाळ्यावर अडकून पडला असता ‘ तुम्ही इकडे कसे आलात हे तुम्हाला शोभते का? तेव्हा मीच आता शिवबास सोडवून घेऊन येते ‘ रागावलेल्या आईसाहेबांसमोर जायची पाळी नेताजी पालकरांकडे आली होती.आई साहेबांपुढे बोलण्याची ,त्यांना थांबवण्याची हिंम्मत कोणाच्यातही नव्हती. भीत भीतच नेताजी आईसाहेबांच्यापुढे उभे राहिले होते. आईसाहेबांची नजर नेताजी पालकरांवर पडल्याबरोबर आई साहेब एकदम कडाडल्या ,”आपला राजा दुश्मनाच्या वेड्यात कोंडला गेला असताना गनिमांना भिऊन तुम्ही पळून आलात ना ? शाबास ! असे माघारी येताना तुम्हाला थोडासुद्धा संकोच वाटला नाही ना ? आता मीच जाते पन्हाळ्यावर जातीने. सिद्धीजोहरचे मुंडके छाटून माझ्या शिवबाला मीच सोडवून घेऊन येते. आता, शिवबावाचून क्षणभरही राहणे मला कठीण आहे. कारण पन्हाळ्याला वेढा पडून तब्बल तीन महिने झाले होते . महाराज काळजीत पडले होते. परंतु धीर खचला नव्हता.आईसाहेब देवापुढे धावा करत होत्या. पुणे व लाल महाल मोगलांनी गिळंकृत केला होता .तब्बल चाळीस दिवस झाले होते.खान लाल महाल सोडायला तयार नव्हता .पुण्यात मराठ्यांचे, स्वराज्याचे नाव निशाणही राहिले नव्हते. सारा मुलुख मोगलांनी भुईसपाट करून टाकला
महाराजांच्या स्वभावातील अत्यंत महत्वाचा
गुण म्हणजे वेळप्रसंगी, संकटकाळी राजे स्वतः हातात तलवार घेऊन पुढे होत असत. त्यामुळे राजांवर कित्येकांची निष्ठाच नव्हे तर आपले शीर हातात घेऊन राजांना मदत करण्यास केव्हाही आणि कोणीही तयार होत असत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे ज्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, ते हिरडस मावळचे बांदल देशमुख व लखुजीराजे यांचे वंशज शंभूसिंह जाधवराव ,बाजीप्रभू देशपांडे .राजे पन्हाळ्यावरुन निसटले तेव्हा विशाळगडावर पोहोचेपर्यंत आणि तोफेचे पाच आवाज ऐकेपर्यंत स्वतःच्या छातीची ढाल करून खिंडीचा रस्ता अडवून ठेवला. शिवाजीराजांनी शंभूसिंह जाधव रावांना, कृष्णाजीराजे नाईक बांदल,बाजी बांदल, फुलाजी बांदल, रायाजी बांदल यांना सांगितले होते की, शत्रू तोंडावर आला आहे. मीही तुमच्याबरोबर थांबून शत्रूबरोबर लढतो; तेव्हा शंभूसिंह जाधवराव व बांदल देशमुख म्हणतात,’राजे लाख मरो पण लाखांचा पोशिंदा न मरो!’केवळ जिजाऊंच्या मार्गदर्शनामुळे शिवाजीराजांनी उत्तम लोकसंग्रह केला होता.
पन्हाळ्यास एवढा मोठा शत्रूचा विळखा पडला असता त्यातूनही शिवाजीराजे निसटू शकले. त्यास अनेक सबळ कारणे होती. ती म्हणजे आई भवानी देवीचा आशीर्वाद शंभूसिंह जाधवराव ,बाजीप्रभू देशपांडे, बांदल देशमुख,तिनशे बांदल सेना ,महाराजांचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचे प्राण देणारे शिवा काशिद यांच्यासारखे वीर आणि स्वतःची आहुती देणारे सेवक आणि स्वतःच्या पुत्रास अत्यंत कठीण संकटातून बाहेर काढणारी राजमाता जिजाऊ हेच खरे स्वराज्याचे रक्षक होते”
लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे