गडाचे नाव ठेविले सिंधुदुर्ग –
लखम सावंतांचा बंदोबस्त करुन महाराजांनी अकस्मात खुदावंद पुरावर धाड घातली. मार्गेसीर्षे मासी खुदावंदपूर राजेश्रींनी वसुली.. तिथली मिळकत घेऊन राजे मालवणला आले. असेच महाराज मालवण बंदरावर उभे होते. समोर सिंधुसागर खळाळत होता. तेवढ्यात महाराजांचे लक्ष नैऋत्येकडे सुमारे दीड मैलावर डोके वर काढलेल्या बेटाकडे गेले…गडाचे नाव ठेविले सिंधुदुर्ग.
जवळच उभ्या असलेल्या कृष्णा सावंत देसाई व भानजी प्रभू देसाई यांचंकडे चौकशी करता ते कुरुटे बेट असल्याचे समजले. मनाच्या कोपऱ्यावर काही बेत शिजत होते कुठे तरी समुद्राच्या लाटा भिंतींवर खळाळुन आदळताना दिसत होत्या. राजेश्री समुद्राच्या खोलपणात जाऊन विचार करीत असल्यासारखे भासत होते. तिन्हीसांजेच्या तिरप्या कोवळ्या उन्हात राजेंची मुद्रा अधिकच उजळून निघाली होती. मावळत्या सूर्यनारायणास नमन करून राजे आपल्या शामियान्याकडे परतले…
दुसऱ्या दिवशी कुरटे बेट पाहण्यासाठी राजे जातीने बेटावर आले. महाराजांची नजर स्थापत्यविशारदाची दुर्गबांधणीशास्त्र त्यांस पूर्णपणे अवगत राजांच्या शोधक नजरेने सागरी राजधानीचा ठाव घेतला. शुद्ध खडक, उत्तम स्थल, विस्तीर्ण, आटोपासारिखे, चहूबाजूस समुद्रमार्ग, कठीण सर्पाकार तरांडी मात्र चालते. सभोवार अवघे खडक ठाण मांडून बसलेले. शत्रूची तरांडी येण्यास तीन कोसापर्यंत गती नाही चौर्यांशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही…
राजे मनीमन समाधान पावले आणि त्यांचे मावळे देखील. इथेच शिवलंका उभारण्याचा संकल्प राजेंनी सोडला. महाराजांचे खासे पंडितराव व उपाध्ये ज्योतिषी ज्योतिषी सोबत होतेच…
त्यांनी लगबगीने शुभ मुहूर्त शोधून काढला- श्रीनृपशालिवाहन शके १५८६ ची मार्गशीष बहुल द्वितीया..! (शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर १६६४) मालवण मधील जानभट अभ्यंकर व दादंभट बिन पिलंभट यांसकडून चिराबांधणी सोहळ्याचे पौरोहित्य करून घेण्यात आले. वेदमंत्रांच्या उद्घोषात मुहूर्ताचा चिरा. भूमीत बसविण्यात आला आणि जलदुर्गाचे काम सुरु झाले…
गडाचे नाव ठेविले “सिंधुदुर्ग”….🚩
माहिती : आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
फोटोग्राफी : सौरभ भट्टीकर