गायिका हिराबाई बडोदेकर –
दि. २९ मे १९०५ रोजी मिरज येथे हिराबाई बडोदेकर यांचा जन्म झाला. वडील अब्दुल करीम खाँ हे बडोद्याचे राजगायक असल्याने त्यांनी संगीताचे जन्मजात शिक्षण मिळाले. ख्याल, ठुमरी, मराठी नाट्यसंगीत, भजन या प्रांतात त्यांची हुकूमत होती. भारतीय शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्या भारतातील पहिल्या स्त्री गायिका आहेत ज्यांनी तिकीट लावून मैफिली गाजवल्या. हिराबाईंचे देश-विदेशात गायनाचे असंख्य कार्यक्रम झाले.
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी आकाशवाणीवर राष्ट्रगीत म्हणण्याचा बहुमान त्यांना मिळाला. १९४६ मध्ये सरोजिनी नायडूंनी त्यांना महात्मा गांधी यांच्याकडे नेलं, त्यांच्या गाण्याने मंत्रमुग्ध झालेले गांधींनी लिहिले ‘लोकांसाठी आजवर खूप गायलात, आता इश्वरासाठी गात चला’. संगीत नाटक अकादमी (१९६५), पद्मभूषण (१९७०), तानसेन पुरस्कार (१९८०), विष्णुदास भावे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
‘सुवर्ण मंदिर’, ‘प्रतिभा’, ‘जनाबाई’ इ. चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. हिराबाईंनी आपल्या स्वत:च्या उदाहरणाने स्त्रीयांचा नाट्यक्षेत्रात प्रवेश सुकर केला. दि. २० नोव्हेंबर १९८९ रोजी ही गानकोकिळा आपल्याला सोडून गेली. किराणा घराणे समृद्ध करण्यात आणि आपली स्वत:ची शैली निर्माण करून त्या आजही लोकांच्या मनात आहेत.
निवासस्थान – ‘स्वरविलास’, गल्ली क्र. ०७, प्रभात रस्ता, डेक्कन, पुणे.
– वारसा प्रसारक मंडळी