महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,554

सिंघण प्रथम किंवा सिंहराज | यादवकालीन खानदेश भाग ९

By Discover Maharashtra Views: 2530 4 Min Read

सिंघण प्रथम किंवा सिंहराज | यादवकालीन खानदेश भाग ९ –

सेऊणचंद्र द्वितीय त्यानंतर येणारा दुसरा राजा म्हणजे सिंघण प्रथम किंवा सिंहराज हा राजा झाला. तो आयरमदेवाचा भाऊ होता असे प्रशस्ती वरून दिसते. नवभारत ऑगस्ट १९७० मध्ये ब्रह्मानंद देशपांडे यांनी आंबेजोगाई जवळ चनई या गावी सिंहणदेव प्रथम यांचा शिलालेख  प्रसिद्ध केला. आणि आंबेजोगाई येथील संगीत मशिद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मशिदीतील लेख तसेच हा सिंगणदेवाचा आहे, हे सुद्धा सप्रमाण दाखवून दिले आहे, हा लेख प्रतिष्ठान मे १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला. हे दोन लेख तसेच वृत्त खंडातील राज्य प्रशस्तीचा उतारा आणि यादवांच्या काही  ताम्र शासनातून  येणारे सिंघण याच्या प्रशस्तीवरून  आपल्याला या राज्याची कल्पना येते.

आंबेजोगाई जवळ उपलब्ध झालेल्या शिलालेखात आंबेजोगाई पासून तीन किलोमीटर असलेल्या चेनई या गावी देवालयाचे आणि शिल्पखंडाचे अवशेष सापडली आहे. तसेच दोन हेमाडपंती शिवालये आणि एक पुष्करणी सुद्धा आहे. हा शिलालेख दोन मंदिरांपैकी सोमनाथ म्हणून मंदिर ओळखले जाते त्या मंदिरावर आहे. या लेखाच्या पाचव्या आणि सहाव्या ओळीत महाकुमार श्रीसिंघणदेवराणक असा उल्लेख आला आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात येते की या लेखातील सिंघणदेव तेव्हा सेऊनदेणकर सिंघणदेव प्रथम यादव हा असावा आणि सेऊणदेशकर यादवांची या संदर्भातील वंशावळ ही सेऊणचंद्र द्वितीयचे दोन पुत्र आयरमदेव  आणि सिंघणदेव सिंहराज असे म्हणता येईल.

सेऊणदेशकर यादव हे कल्याणी चालुक्यांचे मांडलिक होते. कल्याणी चालुक्यांचे राज्य ही बीड आणि उस्मानाबाद या भागात होते. त्यामुळे त्यांच्या मांडलीकांचे शिलालेख या भागात सापडणे स्वाभाविक आहे. तसेच या काळात सेऊणदेशकर सिंघणदेव हा बीड आंबेजोगाई भागात महाकुमार म्हणून काम पाहत होता हे लक्षात येते. कारण  तसाच उल्लेख लेखातही आहे.. या प्रदेशातील अजून दुसरा एक उल्लेख हा लीळाचरित्र या महानुभाव ग्रंथात आहे या गावाचा उल्लेख म्हणजे “खोल नायकाचे आंबे”  असा आहे. त्यावेळी हा गाव देवगिरीकर यादवांचा वैदर्भीय ब्राह्मण सेनापती खोलेश्वर याचे अधिकारात होता. सामंतांच्या नावावरून गावाचे नामकरण करण्याची रीत सर्वत्र आढळते. “बिज्जलाचे बीड” “अनंतपालाचे शिऊर” ही तशीच उदाहरणे आहेत.

आंबेजोगाई येथील खोलेश्वर मठ शिलालेखात आम्रपूर असाच उल्लेख केला आहे. सेऊणदेशकर यादवांचा हा खानदेशाबाहेरील पहिलाच शिलालेख असल्याने महत्वाचा आहे.त्यांचे ताम्रपट मात्र वसई, अश्वी  या कोकणातील गावात सापडले आहेत.

आंबेजोगाई या गावात अनेक मंदिरे आणि आवश्यक असल्यामुळे प्राचीन काळी तसेच यादव काळातही हा गाव भरभराट असलेला आणि समृद्ध होता असेच यादव सम्राट सिंघणदेव त्याचा सेनापती खोलेश्वर याचे शिलालेखावरून वाटते. या एकट्या गावात आतापर्यंत पाच शिलालेख सापडले आहे आणि ते सर्व प्रकाशितही झालेले आहेत.

सेऊणदेशकर यादव सिंघण प्रथम आणि कर्नाटकातील त्याचे सम्राट चालुक्य यांचे संबंध यादव महादेव यांच्या काळेगाव ताम्रपट आणि पैठण ताम्रपट यावरून लक्षात येतात. तसेच पैठण ताम्रपट यातील वंशावळ सिंघणदेव प्रथम याचे पासून सुरू होते. या लेखातून सिंघणाने कर्नाट नावाच्या राजाला वशीभूत केले तसेच हेमाद्री यांच्या प्रशस्तीत कर्पूर तिलक गज आणून चालुक्य सम्राट परमार्दि याचे कर्पुरव्रत पुर्ण केले असा उल्लेख आहे.

याच लेखातील अजून उल्लेख म्हणजे त्याने पांड्य राजाला शासन करून त्याची राज्यात विजयस्तंभ रोवला. तसेच होयसळ विष्णूवर्मन याची मदत करून चालुक्य राज्य उलथून टाकण्याचा प्रयत्न चालवला होता. यात त्यांना गोव्याचा कदंब जयकेशी द्वितीय, येलबुर्गा  येथील सिंद अच्छुगी द्वितीय यांनीही मदत केली होती. परंतु चालुक्य विक्रमादित्य सहावा याने सर्वांचे मनोरथ धुळीस मिळवले, याच युध्दात सिंघणाने भाग घेतला असावा. त्याने युध्दात गुर्जरांना हरवले, परंतु याबाबत अधिक माहिती मिळत नाही. या शूर कृत्यामुळे त्याला साहसांग ही पदवी मिळाली आणि तो चालुक्य सम्राट याचा कृपा पात्र बनला. (संदर्भ: गुलाम  याजदानी, अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन)

संदर्भ:
डॉ. शं.गो.तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीव लेख.
श्री ग.ह.खरे, दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने.
ब्रम्हानंद देशपांडे, देवगिरीचे यादव.

@ सरला भिरूड

Leave a Comment