सिंहगड किल्ला
पुण्याच्या जवळच असल्यामुळे दरवर्षीच सिंहगड किल्ल्याची माझी भटकंती ठरलेली असते. पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख गडावरुन दिसतो. सिंहगड हा मुख्यतः प्रसिद्ध आहे तो नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे.
तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूनेवर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते. दरवर्षी माघ वद्य नवमीस येथे मंडळातर्फे नरवीर तानाजी मालुसरे यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो.
देवटाके : नरवीर तानाजी मालुसरे स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणि म्हणूनहोत असे व आजही होतो.
कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत.
तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पाय वाटेने तानाजीच्या कड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच नरवीर तानाजी मालुसरे मावळ्यांसह वर चढले होते.
राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाव्या अवघ्या ३० व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ.स. १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले.
टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.
कोंढणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.
श्री अमृतेश्वर भैरव मंदिर : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतश्वराचे प्राचीन मंदिर लागते.
गडावर छोटॆ हॉटेल्स यामध्ये जेवणाची सोय होते. इथे मिळणारी चविष्ट पिठलं भाकरी आणि दही याचा जबाब नाही. देवटाक्यांमधील पाणी पिण्यासाठी बारामहिने पुरते. गडावर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत गाडीने सिंहगडावर जाता येते तसेच गडाच्या पायथ्यापासून पायवाटेने गडावर जाता येते.
माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज