गुलामांची खरेदी विक्री आणि शिवाजी महाराज –
गुलाम…. जेव्हा आपण हा शब्द ऐकतो तेव्हा नक्की काय येत आपल्या मनात? ज्या माणसाला स्वतःचं असं काहीच अस्तित्व नाही, आपल्या आयुष्यातले कोणतेच निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य नाही, ज्याला त्याचा मालक सांगेल ते पटत असो वा नसो करावंच लागतं, तो गुलाम.(गुलामांची खरेदी विक्री आणि शिवाजी महाराज)
फार पुरातन काळापासून ही कुप्रथा अख्ख्या जगात सुरु आहे. या गुलामांना अन्न, वस्त्र, निवारा असल्या मूलभूत सोयी देण्यासाठीसुद्धा त्यांचे मालक बांधील नसत. शिळं, उरलेलं जेवण, फाटके कपडे, थंडी, ऊन, पावसात गोठ्यात किंवा उघड्यावर झोपायला गलिच्छ जागा हेच या गुलामांच्या नशिबी असायचं. आयुष्यात मर मर राबून करावी इतकी कामं तर असत पण त्याच्या बदल्यात कोणताही मोबदला मिळत नसे. थोडक्यात एखाद्या माणसाला वस्तूप्रमाणे विकत घेण्यासाठी एकदाच पैसे भरायचे आणि मग निष्काळजीप्रमाणे त्या माणसाला जास्तीत जास्त वापरून घेऊन, त्याच्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्याला पिळवटून घेणं म्हणजे ‘गुलामी’.
हा लेख विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
इतक्या जुन्या काळापासून चालत आलेल्या या प्रथेला कोणत्याच राजाने विरोध नाही केला? आज याविषयी थोडं गुगल केलं तर फ्रांस, इंग्लंड, डेन्मार्क अश्या काही देशांची नावं ‘गुलामगिरीला’ बेकायदेशीर ठरवणाऱ्या देशांच्या यादीत दिसतात. पण इंग्लंडच्या बाबतीत यातपण एक मेख आहे, आपल्या सगळ्या कॉलोनीजमध्ये म्हणजे जगातल्या सगळ्या वसाहतींमध्ये ‘गुलामांची खरेदी विक्री’ बंद करायचा कायदा करणाऱ्या इंग्रजांनी ‘भारतीय’ उपखंडात म्हणजे भारत आणि श्रीलंकेत आणि आफ्रिकेतल्या सेंट हेलेना या तीन ठिकाणी मात्र ‘गुलामांची खरेदी विक्री’ कायदेशीर ठरवली.
पण मग जगाचं जाऊद्यात भारतात इतके मोठे मोठे आणि महान राजे होऊन गेले तर त्यांच्यातल्या एकालाही ही गुलामीगिरीची अन्यायी पद्धत बंद करावी असं वाटलं नाही का? तर पुन्हा एकदा यामुळेच आपल्या शिवरायांचं वेगळेपण दिसून येतं. आणि हो संभाजी महाराजांनीसुद्धा गुलामांच्या खरेदी विक्री विरोधात काय केलं हे ऐकायचं असेल तर विडिओ शेवटपर्यंत पहा. तर गोष्ट आहे इसवि १६७७ ची, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या ‘दक्षिणदिग्विजयाच्या’ मोहिमेवर दक्षिणेत गेले होते. यावेळी त्यांचा मुक्काम जिंजीजवळ म्हणजे आत्ताच्या तामिळनाडूमध्ये होता. यावेळी २ डच राजदूत डचांचा व्यापार वाढावा यासाठी शिवरायांकडून काही सवलती मिळाव्यात याउद्देश्याने त्यांना येऊन भेटले. हर्बर्ट जागीर आणि निकोलस क्लेमन या दोघांमार्फत डचांनी शिवाजी महाराजांबरोबर तह केला आणि या तहात शिवाजी महाराजांनी आठवणीने डचांना ‘गुलामांच्या खरेदी विक्री करण्यावर बंदी घातली’. याबद्दल खालील पत्रात जास्त माहिती मिळते. यात महाराज डचांना उद्देशून म्हणतात
‘पूर्वी मुसलमानांच्या राज्यामध्ये तुम्हास कर्नाटकातून पुरुष आणि स्त्रियांना गुलाम म्हणून खरेदी करण्याची परवानगी होती. तुम्ही त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय इतरत्रही पाठवू शकत होता. (अर्थातच हे युरोपियन लोकं गुलामांना विकत घेऊन त्यांच्या दुसऱ्या देशातल्या वसाहतींमध्ये काम करायलासुद्धा पाठवत असत) परंतु जोपर्यंत मी या जागेचा आता राजा आहे तोवर तुम्हाला हे करता येणार नाही. पुरुष किंवा महिलांना गुलाम म्हणून खरेदी तर करता येणारच नाही पण त्यांना इतरत्र पाठविता सुद्धा येणार नाही.’ महाराज या डचांना चांगलेच ओळखून होते त्यांना माहित होतं की ‘लाथोंके भूत बातोसे नाही मानते’ म्हणून पुढे महाराज म्हणतात ‘हे सगळं ठरूनसुद्धा तुम्ही गुलामांची विक्री किंवा त्यांना इतरत्र न्यायचा प्रयत्न केलात तर माझे लोक तुम्हाला विरोध करतील आणि ते तुम्हाला तुमच्या घरीसुद्धा गुलाम ठेऊ देणार नाहीत.’
आजूबाजूचे सर्व ‘सो कॉल्ड’ बादशाह म्हणजे औरंगजेब,आदिलशहा, कुतुबशहा हे सगळे गुलामांच्या खरेदी विक्रीला अधिकृत मान्यता देत असत. जंजिऱ्याचे सिद्दी तर जेव्हा जेव्हा कोकणावर हल्ला करत तेव्हा बायका-मुलांना, पुरुषांना पकडून नेऊन गुलाम म्हणून विकत. खुद्द शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजींच्या बायकोला आणि तीन मुलांना सिद्ध्यांनी असं गुलाम म्हणून विकायला काढलं होतं. इंग्रज, डच, पोर्तुगीजांसारखे युरोपियन या गुलामांना विकत घेऊन आपल्या दुसऱ्या देशांमधील वखारींमध्ये नेवून या गुलामांना तांबडवुन घेत. येऊन जाऊन हे सगळेच शासक परकीयच होते. एतद्देशियांबद्दल त्यांना ना सहानभूती होती ना जिव्हाळा.
पण अश्या वेळी शिवाजी महाराजांवर झालेले संस्कार आणि ते या इतर शासकांहून वेगळे का आहेत? का ‘जाणता राजा’ आहेत तेच पुन्हा एकदा दिसून येत. शिवाजी महाराजांनी कित्येक वेळा शत्रू मुलखावर हल्ला केला पण कधीच शत्रू मुलखातून माणसं पकडून आणून त्यांना गुलाम म्हणून बाळगल्याचा किंवा विकल्याचा एकही ऐतिहासिक उल्लेख नाही. आणि ऐतिहासिक उल्लेख मिळत नाहीये म्हणून महाराजांना क्लिन चिट मिळतेय असं नाही तर महाराजांनी ही असली हीन दर्जाची कामं कधीच केली नाहीत. केली असती तर आजूबाजूच्या सर्व बादशाहांचे दरबारी इतिहासकार हे लिहून ठेवायला टपूनच बसले होते. महाराजांनी स्वतः तर ही असली गलिच्छ कृत्य केलीच नाहीत पण जे युरोपीय हा गुलामांच्या खरेदी विक्रीचा व्यापार करत त्यांनासुद्धा महाराजांनी वर दिले त्याप्रमाणे तह करून ‘गुलामांच्या खरेदी’ विक्रीपासून वंचित केलं.
बरं गोष्ट इथेच संपत नाही हा, संस्कार एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे जातात ते इथे दिसून येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या या तहाच्या बरोब्बर ७ वर्षांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजांशी १६८४ मध्ये २ तह केले. यात मुंबईसाठी एक तह केला आणि कर्नाटकासाठी दुसरा. या दोन्ही तहांमध्ये मुंबईच्या तहातलं १८ व कलम आणि कर्नाटकातल्या तहाच ७ कलम सांगत ‘माझ्या प्रदेशातून कोणताही माणूस गुलाम म्हणून खरेदी करू नये किंवा त्याला ख्रिश्चन करू नये.’
ज्या शिवरायांनी ‘स्वराज्याच्या’ या छोट्याश्या रोपट्याबरोबर, उच्च संस्कारांची मुळीपण या महाराष्ट्रात पेरली त्याच शिवरायांच्या छाव्याने, शंभूराजांनी ती मुळी पुढे अजून वाढवली. भले एकोणिसाव्या शतकात इंग्रजांनी ‘गुलामगिरीवर’ बंदी घातली असेल पण आमच्या दोन्ही छत्रपतींनी जवळ जवळ त्यांच्या सव्वाशे वर्ष आधीच त्यांच्या राज्यातून या असल्या अभद्र प्रथांना तडीपार केलं होतं. शिवाजी महाराजांनी रयतेला औरंगजेब, आदिलशाह, सिद्दी यांच्या गुलामगिरीतून तर सोडवलच पण त्याहीपुढे जाऊन या जाणत्या राजाने ‘गुलामांच्या’ खरेदी विक्रीच्या प्रथेलाच सुरुंग लावला. महाराज थोर आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे, पण त्यांच्या थोरवीला इतके पैलू आहेत हे वेगवेगळ्या वेळी पुन्हा पुन्हा अगदी स्पष्टपणे दिसून येतं. धन्यवाद.
संदर्भ:
१. Xenophobia in Seventeenth-Century India
२. ज्वलज्वलंतेजस संभाजी राजा: लेखक: डॉ. सदाशिव शिवदे
३. चिटणीसांच्या वाका
Suyog Sadanand Shembekar